वैशाख वणव्यानंतर चराचराला सुखावणारी मृदगंधाची पहिली अनुभूती घ्यायचीय, गडद भरून आलेल्या नभांचे सौंदर्य सर्वात प्रथम न्याहाळायचंय, मान्सूनचं भारतभूमीवरच पहिलं कोसळणं अनुभवयाचं तर त्याच्या स्वागताला थेट भारताच्या वेशीवर अंदमानला जावे लागेल आणि त्याच्यासोबत केरळ, कर्नाटकात यावे लागेल. त्याची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी.

पोळून काढणारा, अस्वस्थ करणारा, सुट्टय़ा देणारा उन्हाळा संपता संपता आंबे खाऊन पोट कितीही तृप्त झालं असलं तरीही मनाला हुरहुर लागते ती पावसाची. मे महिन्याच्या शेवटाला जरा आकाशाला गडद छटा आली की, मग येता-जाता आज पाऊस पडेल का, असं स्वत:लाच आणि इतरांना सतत विचारात राहायचं आणि मुहूर्त मिळालाच तर वर्षांवृष्टीच्या लहानातल्या लहान शौकिनानंही एखादा थेंब मुद्दामहून झेलायचा असं होतंच मग. त्यात आपल्यासारखे मुंबई-पुण्यातले लोक पावसाच्या वेळापत्रकाला सारावलेले असतात. १०-१२ जूनपर्यंत पावसाचे आगमन होणार असे ठरलेलेच असते. पहिल्या पावसाची मजाच काही और; पण खरं सांगायचं तर भारतातला पहिला पाऊस याआधीच केरळच्या किनारपट्टीला येऊन पोहोचलेला असतो. भारतातील पावसाला म्हणजेच मान्सूनला एक विशिष्ट प्रकारचे वेळापत्रक असते. अर्थात आजकाल प्रदूषण आणि बदलत्या हवामानामुळे जगातील वातावरणाचं गणितच चुकायला लागलंय, पण तरीही भारतातील पावसाला स्वत:ची एक लय असते. ही लय त्याला मिळते ती तापमान आणि हवेच्या दाबाच्या बदलामुळे. समुद्र आणि जमीन यांच्यामधील हवेच्या दाबाच्या फरकामुळे मान्सून वाऱ्याच्या प्रवाहांचा जन्म होतो. नर्ऋत्य-ईशान्य दिशेने प्रवास करणाऱ्या मान्सूनच्या हवेमुळे पावसाचे भारतभर वेगवेगळ्या दिवशी आगमन होते आणि जर तुम्हाला या पावसासह त्याच्या गतीने प्रवास करायचा असेल, तर मग काय, पहिल्या पावसाचे तुम्ही अनेक अद्भुत अनुभव घेऊ शकता! प्रत्येक ठिकाणी पावसाचे रूप वेगवेगळे होते, त्याचे स्वागतही वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि म्हणूनच पावसाचा वेगळा आनंद घेता येतो. केरळच्या हिरवळीमधून टपटपणारे थेंब आणि पूर्व किनाऱ्यांच्या वादळी वाऱ्यांपासून ते चेरापुंजीच्या संततधारेपर्यंत!
भारतात सगळ्यात पहिला पाऊस येऊन धडकतो तो अंदमान-निकोबार बेटांवर आणि मग केरळमध्ये. जगातील या दोन अतिशय सुंदर जागा पावसाळ्यात अजूनच मोहक होतात. निसर्गसौंदर्याचा आनंद घेत पावसाचे स्वागत करायला या जागा उत्तमच. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला गरज लागेल ती फक्त थोडंसं भिजण्याच्या तयारीची. अर्थात प्रवासात छत्री, रेनकोट किंवा पावसात फोटो काढणाऱ्यांसाठी पोन्चो या गोष्टी बरोबर नेणं गरजेचं आहे; पण त्याशिवाय फार काही लागत नाही, पायात फ्लोटर्स किंवा
रबरी चपला आणि मस्त आरामदायक कपडे चढवले की झालं.
जर तुम्हाला पाऊस पाहायला अंदमानला जायचं असेल तर अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यांवरून आणि दाट जंगलातून पावसाचा आनंद घेता येईल. अंदमानला जाण्यासाठी चेन्नईवरून विमानसेवा उपलब्ध आहेत. पोर्ट ब्लेअर या अंदमानच्या मुख्य शहरात राहण्यासाठी चांगल्या सोयी आहेत. अंदमानचा निळा-हिरवा लखलखता समुद्र आणि पांढरीशुभ्र वाळू यांना तोड नाही. अशा ठिकाणी पहिल्या पावसाचा अनुभव घेणं अद्वितीयच. लाँग आयलंड, हॅवलॉक आणि मायाबंदर हे समुद्रकिनारे हे अशा कारणासाठी उत्कृष्ट आहेत. या तिन्ही ठिकाणी पोर्ट ब्लेअरहून प्रवासासाठी बोटी आणि गाडय़ा मिळतात. यातला मायाबंदरचा प्रवास (पोर्ट ब्लेअरहून २३० किमी) हा पूर्णपणे जमिनीवरचा आहे आणि रस्त्यात बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. हॅवलॉकसाठी मात्र छोटय़ा जहाजातून प्रवास करावा लागतो, पण त्याचेही बुकिंग पोर्ट ब्लेअरहून सहज करता येते. समुद्राशिवाय इथे पाहण्यासारखे अजून बरेच काही आहे. इतिहासात रस असणाऱ्यांना सेल्युलर जेलचा साऊंड आणि लाइट शो नक्कीच आवडेल. जरा साहसी व्यक्ती स्कूबा डायिव्हग करू शकतात. पाणी आणि निसर्ग आवडणारे लोक स्नॉर्कलिंग करून प्रवाळातील विविधरंगी मासे आणि इतर समुद्रातील प्राण्यांना बघू शकतात. यासाठी काचेचे तळ असलेल्या बोटीही वापरता येतात. याशिवाय इतर प्रेक्षणीय स्थळं आहेतच. एवढं सगळं बघायला असूनही अंदमानला पर्यटकांची गर्दी होत नाही आणि म्हणूनच पाऊस आणि त्या जागेचा आनंद अगदी आरामात घेता येतो. अंदमान आणि निकोबार बेटांच्या मागोमागच जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस केरळच्या आसपास पोहोचतो.
कड्डक कॉफीचे घोट घेत नारळाच्या झावळ्यामधून होणारी पाण्याची टपटप बघणं याचा विचार करूनच मस्त वाटतं. केरळमधला पाऊस खूप शांत असतो. मुंबईतल्यासारखा थोडी दादागिरी करणारा अखंड पाऊस इथे पडत नाही. केरळमध्ये जूनच्या सुरुवातीला ऊन-पावसाचा खेळ चालतो. त्यामुळे फिरताना पावसाचा त्रास होत नाही, पण मज्जा मात्र वाढते. पावसाळ्याच्या काळात इथे महिनाभर ओणम सणाशी संबंधित विविध उपक्रम चालू असतात. खास केळीच्या पानावरचे जेवण, नृत्याचे वेगवेगळे कार्यक्रम आणि अल्लेप्पीची प्रसिद्ध स्न्ोक बोट शर्यत अशा गोष्टी पावसाळ्यात जास्त अनुभवायला मिळतात. या वेळची बोटीची शर्यत ऑगस्ट महिन्यात आहे, पण तरीही तिची तयारी काही महिने आधीपासूनच सुरू होते. लोकांच्या गर्दीपासून दूर जावेसे वाटल्यास, अल्लेप्पीजवळ एक शांत समुद्रकिनाराही आहे. अर्थातच केरळची वारी हाऊसबोटमध्ये राहिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
तिकडच्या प्रसिद्ध बॅकवॉटर्समध्ये पाण्याच्या संथ प्रवाहातून प्रवास करताना निसर्गसौंदर्य आणि केरळी पद्धतीचे चवदार खाद्यपदार्थ यांचा आनंद द्विगुणित होतो. हा झाला केरळचा समुद्राजवळचा भाग, पण केरळमध्ये पावसाचा आनंद लुटायला डोंगर-दऱ्या आणि धबधबे भरपूर आहेत. चहाच्या मळ्यामधून नागमोडी वळणे घेत केरळ बघण्याची एक वेगळीच मजा आहे. वायनाडचा भाग आणि मुन्नारचे प्रसिद्ध हिल स्टेशन हा तिकडच्या गच्च हिरवळीसाठी, चहा-कॉफीसाठी, धबधब्यांसाठी आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. इकडे पाऊस पाहता पाहता चहा प्यायची हुक्की आलीच (आणि ती येणारच) तर, पर्रम पोरी म्हणजेच केळय़ाची भजी नक्की खाऊन बघा.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस कर्नाटकमध्येही पोहोचतो. कर्नाटकमध्ये पावसाळ्यात मुद्दामहून बघण्यासारखा अजून एक भाग म्हणजे अगुम्बेचं जंगल. या भागात एवढा पाऊस असतो की अगुम्बेची ‘दक्षिण भारतातली चेरापुंजी’ अशीही ओळख आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगची आणि जंगलात भटकण्याची आवड असेल तर अगुम्बे तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे धबधबे मागाल तेवढे मिळतील, त्यातले अब्बी, बरकणा आणि कुडळू तीर्थ अगदी बघण्यासारखे. इथून जवळपास बघण्यासारखी इतर ठिकाणं म्हणजे श्रींगेरीच्या जुन्या देवळाच्या आजूबाजूचा प्रदेश, कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आणि सोमेश्वरचे अभयारण्य. अगुम्बे प्रसिद्ध आहे ते इकडे होणाऱ्या वन्यजीव संशोधनासाठी. विशेषत: जगातील सर्वात मोठा विषारी साप, किंग कोब्रा म्हणजेच नागराजाच्या संवर्धनासाठी इथे बरंच काम केलं जातं. एक महत्त्वाची बाब म्हणजे, इकडच्या संशोधकांद्वारे भारतातील सर्वप्रथम स्वयंचलित हवामान मोजणारे केंद्र अगुम्बेला स्थापित केले गेले आहे. इकडच्या अगुम्बे रेनफॉरेस्ट रीसर्च स्टेशनमध्ये भटक्यांसाठी राहण्याची व्यवस्थाही होते. त्याचप्रमाणे होम स्टेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला दाट जंगलं आणि धबधब्यांच्या सान्निध्यात पावसाचे आगमन बघायचे असेल आणि त्याचप्रमाणे वन्यजीव संशोधनात रस असेल तर दक्षिणेच्या चेरापुंजीला पावसाळ्यात जायलाच हवं.
कर्नाटकमध्ये कुर्ग (कोडागु जिल्हा) नावाचे एक सुंदर ठिकाण आहे, कावेरी नदीचे उगमस्थान. मला स्वत:ला इथूनच पहिल्या पावसाचे स्वागत करायला आवडेल. बंगळुरू, म्हैसूर आणि मंगलोरवरून इथे जाण्यास बसचे बरेच पर्याय आहेत, लोकल प्रवासासाठी मात्र स्वत:ची गाडी असणं किंवा भाडय़ाने घेणं इथे जास्त सोयीचं. बसही मिळते, पण ठिकाणं दूर असल्यामुळे आणि बसचं प्रमाण कमी असल्यामुळे प्रवासात खूप वेळ जाऊ शकतो. इकडच्या काही जंगलात असलेल्या कॉफी इस्टेटमध्ये होम स्टेची सोय होते. तशी इथेही बघण्यासारखी खूप ठिकाणं आहेत आणि मुख्य म्हणजे पर्यटकांची फारशी गर्दी नाही. मडिकेरीचं हिल स्टेशन, जवळ असलेलं दुबारेचं जंगल आणि त्यातला हत्तींसाठीचा कँप, बलकुप्पेची बौद्ध मोनास्ट्री आणि विलक्षण सुंदर धबधबे; पण उंच झाडांच्या सावलीत उभे राहून पावसाची वाट बघणं, जवळूनच वाहणाऱ्या छोटय़ाशा धबधब्याचा आवाज आणि पावसाच्या नंतरच्या उघडिपीनंतरची पक्ष्यांची किलबिल या काही साध्या, पण खास गोष्टींचा अनुभव घ्यायला या जागेला पावसाळ्यात नक्कीच एकदा तरी भेट द्यायलाच हवी. चला तर मग पाऊस पाहायला, ट्रॅफिक जॅम आणि गर्दीपासून थोडंसं दूर आणि पावसाच्या जास्त जवळ!

हे जरूर अनुभवा..
पावसाच्या सुरुवातीचा काळ हा काही गोष्टींसाठी आवर्जून अनुभवावा असा असतो. उन्हाळयाच्या उष्णतेला जेव्हा पहिल्या पावसाच्या सरी थंड करतात तेव्हा जो आनंद मिळतो तो खासच! या काळात आजूबाजूच्या वातावरणात अजूनही बरेच बदल होतात. वाळलेल्या जमिनीला हिरवे होताना बघण्याची हीच वेळ. भारतातील शेतकरी तर पहिल्या पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. पण प्राण्यांना पावसाची चाहूल आधीच लागते. चातक पक्षी तर यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाबरोबरच हा पक्षी आफ्रिकेतून भारतात पिल्लं घालण्यासाठी येतो आणि पावसाबरोबरच परत निघतो. या पावसाळ्यात जमल्यास चातक पक्षी नक्कीच बघा. पहिल्या पावसानंतर निघणारे कीटक खाण्यासाठी तर अस्वलं, उदरामांजरासारखे प्राणी अगदी बेधडक रस्त्यांच्या आजूबाजूला येतात, त्यामुळे जंगलात फिरताना अशा प्राण्यांना बघणे सोप्पे होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी कमी असते आणि निसर्ग नुकताच ताजातवाना झालेला असतो त्यामुळे भटकंती जास्त आनंदात होते.

पावसाळ्यातील  विशेष सवलती
पावसाळ्यातला प्रवास हा इतर ऋतूंपेक्षा खिशाला हलका असतो. पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी रिसॉर्ट आणि हॉटेलांमध्ये सवलती उपलब्ध असतात. बुकिंगपूर्वी या सवलतींची माहिती काढून मगच निर्णय घ्या. काही ठिकाणी खास मान्सून टूर पॅकेजेसही उपलब्ध असतात.

गोव्यातील पावसाळी उत्सव
केवळ हिवाळा आणि उन्हाळ्यातच पर्यटक गोव्याला भेट देतात असे नाही. गोव्याचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच बहरून येते. पावसात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि वाऱ्याच्या तालावर डोलणारी झाडे आणि त्याच्या जोडीला तेथे खास पावसाळ्यात साजरे
हाणारे उत्सव पर्यटकांना साद घालत आहेत. गोव्यातील महत्त्वाचे सहा पावसाळी उत्सव :
सान जाओ : ख्रिश्चन समुदायात महत्त्वाचा मानला जाणाऱ्या हा उत्सव मान्सूनच्या सुरुवातीला साजरा केला जातो. तलाव, नद्यांत डुबकी मारून चिंब भिजण्याची मजा या उत्सवात घेता येते. त्यात आबालवृद्धांपासून सर्वजण सहभागी होतात.
कधी? २४ जून. कुठे? सिओली.
फणस उत्सव : हा उत्सव सान जाओ उत्सवाच्या सोबतीनेच साजरा केला जातो. त्यात गोव्यातील फणस आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेता येतो.
कधी? २४ जून. कुठे? सोकोरो.
सांगोड : गोव्यातील स्थानिक मच्छीमार हा उत्सव साजरा करतात. सर्व मच्छीमारांच्या बोटी एकत्र बांधून मंच तयार केला जातो आणि त्यावर हा उत्सव साजरा होतो.
कधी? २९ जून. कुठे? गोव्यात सर्वत्र.
चिखल उत्सव : हा वार्षिक पारंपरिक उत्सव मार्सेल येथे साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी नागरिक चिखलात खेळण्याचा आनंद लुटतात.
कधी? जुलैअखेर. कुठे? मार्सेल.
काकडी उत्सव : तिसवाडी तालुक्यातील सेंट अ‍ॅन चर्च येथे हा उत्सव साजरा केला जातो. विशेषत: नवविवाहित जोडपी सेंट अ‍ॅन यांच्या आशीर्वादासाठी येतात. ते स्थानिक विक्रेत्याकडून तवसा (काकडी) विकत घेऊन सेंट अ‍ॅन यांच्या चरर्णी अर्पण करतात आणि ती खाण्यासाठी घरी नेतात.
कधी? २९ जुलै. कुठे? तिसवाडी
पाटोली उत्सव : साधारणपणे प्रजासत्ताकदिनी हा उत्सव साजरा केला जातो. गूळ आणि भाताने बनवलेल्या पाटोली नावाच्या हळदीच्या पानात गुंडाळलेल्या स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद या उत्सवात घेता येईल.
कधी? १५ ऑगस्ट. कुठे? सोकोरो
ओवी थोरात – ovthorat@gmail.com