News Flash

दुचाकीवरून : लेह-लडाखमधील सायकलिंग

काश्मीरमधील लेह-लडाख हा प्रदेश सामान्य पर्यटकांसोबतच सायकलस्वारांनाही खुणावू लागला आहे.

भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील लेह-लडाख हा प्रदेश सामान्य पर्यटकांसोबतच सायकलस्वारांनाही खुणावू लागला आहे. पश्चिम घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये सायिलग केल्यानंतर हिमालयात सायकलिंग करणे आणि त्यातही लेह-लडाख परिसरात सायकलिंग करणे हे प्रत्येक सायकलस्वाराचे जणू स्वप्नच झाले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये या भागात एकटय़ाने आणि गटाने सायकलिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज या प्रदेशातील सायकलिंगबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
इतर वेळी भरपूर थंडी आणि बर्फाळ असलेल्या या प्रदेशात सायकलिंग करण्यासाठी जून ते सप्टेंबर हा सर्वात योग्य कालावधी आहे. परंतु, या काळातही येथील हवामान दुपारी बारा वाजल्यानंतर कुठल्याही क्षणी बदलू शकते. त्यामुळे सकाळी लवकर सायकलिंगला सुरुवात करून दुपापर्यंत कॅम्पवर पोहोचणे सर्वात उत्तम. या प्रदेशात सायकलिंग करणे ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक कसोटीही आहे. तुम्ही शरीराने थकलात तरी त्या क्षणाला किंवा त्या दिवशी सायकलिंग थांबवून आराम करून पुन्हा सायकलिंगला सुरुवात करू शकता. मात्र, तुम्ही मनाने थकलात तर तुम्हाला तुमची संपूर्ण सायकल मोहीम गुंडाळून घरचा रस्ता धरावा लागू शकतो. मनालीपासून अनेक जण सायकलिंगला सुरुवात करतात. मनाली हे साधारणपणे साडेसहा हजार फुटांवर असून लेह हे साडेअकरा हजार फुटांवर आहे. मनाली ते लेह या जवळपास पाचशे किलोमीटरच्या अंतरामध्ये अनेक चढउतार येतात.

मनाली ते लेह : सायकलिंग करण्यासाठी हा जगातील सर्वात कठीण मार्गांपैकी एक आहे. या वाटेवर येणारे चढ-उतार आणि सतत बदलणारे हवामान यामुळे केवळ नवोदितांसाठीच नाही तर मुरलेल्या सायकलपटूंसाठीसुद्धा येथे सायकलिंग करणे आव्हान ठरते. रोहतांग, बारालाचा, नकिला, टांगलांगला यांसारखे चौदा ते सतरा हजार फुटांवरचे पासही या वाटेवर पार करावे लागतात.

श्रीनगर : झेलम नदीच्या किनारी वसलेल्या श्रीनगरला जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी म्हटले जाते. तसेच पूर्वेकडचे व्हेनिस म्हणूनही त्याचा नावलौकिक आहे. हाऊसबोटसाठी प्रसिद्ध असलेले दाल लेक याच मार्गावर आहे. समुद्रसपाटीपासून साडेपाच हजार फुटांवर असलेल्या या प्रदेशात वेगवेगळ्या वाटांवर दोनशे ते अडीचशे किलोमीटर सायकलिंग सहज होते.

मनाली : सहा हजार सातशे फुटांवर असलेल्या हिमाचल प्रदेशातील कुलू व्हॅलीमधील मनालीला थंड हवेच्या ठिकाणांची राणी असे म्हटले जाते. एका बाजूने वाहणारी बियास नदी आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच देवदार वृक्ष यामुळे या प्रदेशात सायकलिंग करणे ही एक पर्वणी ठरते.

लेह-सोमोरी-सोकर : लेह ते सोमोरी लेक यांमधील अंतर हे साधारणपणे २२० किलोमीटर आहे. या प्रदेशातील सुमडो आणि सोकर यांच्यामधील रस्ता हा लडाखमधील सर्वात अवघड रस्ता समजला जातो.

लेह-लामयुरू : वेगवेगळ्या संस्कृतींनी नटलेल्या वाटेवर सायकलिंग करण्याची मजा काही औरच आहे. सिंधू नदीच्या बाजूने जाणारा रस्ता विविध बौद्ध मॉनेस्ट्रीकडे तुम्हाला घेऊन जातो. याच रस्त्यावर तुम्हाला जगप्रसिद्ध मूनलॅन्ड हा प्रदेशसुद्धा लागतो.

खारदुंगला : जगातील सर्वात उंचावरचा रस्ता म्हणून खारदुंगलाचा उल्लेख केला जातो. लेह ते खारदुंगला हे अंतर फक्त चाळीस किलोमीटरचे असले तरी चढ मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक सायकलस्वारासाठी ते एक आव्हान ठरते.

प्रशांत ननावरे
prashant.nanaware@expressindia.com
Twitter – @nprashant

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 6:35 am

Web Title: cycling in leh ladakh
Next Stories
1 आडवाटेवरची वारसास्थळे : गिरवीचा गोपालकृष्ण
2 लोक पर्यटन : चारठाण्याचे वारसा वैभव
3 वर्षां भटकंती
Just Now!
X