X

जायचं, पण कुठं? : धाराशीव लेणी

ती लेणी धाराशीव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी एकूण ११ लेणी या परिसरात आहेत

लेणी आणि संपन्न व्यापारीमार्ग यांचे घट्ट नाते आहे. प्राचीनकाळी पठण, तेर या शहरांमधून विविध प्रकारचा माल पश्चिम किनाऱ्यावरील भडोच, शूर्पारक(सोपारा), कल्याण, चौल आदी बंदरात व्यापारी मार्गाने जात असे. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरामार्फत परदेशाशी होणाऱ्या या व्यापारामुळे व्यापाऱ्यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व राजाश्रयामुळे महाराष्ट्रात अनेक लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे, व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात या लेण्या मुख्यत्वे करून आढळतात. या लेण्यांचा धार्मिक कार्यासाठी आणि व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थाने म्हणून उपयोग होऊ लागला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानातून या लेण्यांचा दैनंदिन खर्च चालत असे, अशी परस्पर पूरक व्यवस्था समाजातल्या या दोन्ही घटकांच्या सोयीची होती.

पठण, तेर (तगर) नगरांपासून जाणारा व्यापारी मार्ग धाराशीव (म्हणजे आजचे उस्मानाबाद) या प्राचीन शहरातून जात असे. या व्यापारी मार्गावर धाराशीव शहरानजिक सहाव्या शतकात बालाघाट डोंगररांगेत लेणी खोदण्यात आली. ती लेणी धाराशीव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी एकूण ११ लेणी या परिसरात आहेत. याशिवाय येथे एक समाधी मंदिर आहे. त्याच्या बांधकाम शैलीवरून ते सतराव्या शतकात बांधले असावे.

उस्मानाबाद शहरापासून ७ किमीवर धाराशीव लेणी आहे. जेथे रस्ता संपतो तेथून लेण्यांपर्यंत खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने पुढे गेल्यावर ठरावीक अंतरावर ३ हिंदू लेणी पाहायला मिळतात. त्यातील दुसऱ्या लेण्यात रामायण, महाभारत आणि हिंदू पुराणातल्या कथांवर आधारित शिल्पपट कोरलेले पाहायला मिळतात. हिंदू लेणी पाहून परत पायऱ्यांपाशी येऊन खाली उतरल्यावर आपण बौद्ध लेण्यांपाशी पोहोचतो. यातील दुसरे लेणे भव्य असून त्याला दगडात कोरलेले कमानदार प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस व्दारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेल्या स्तुपाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी सुरुवातीच्या काळात बौद्ध लेणे होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्यातल्या मूळ मूर्तीना आज वेगळ्याच देवतेच्या नावाने पुजलेले पाहायला मिळते.

स्तुपाचे अवशेष पाहून पायऱ्या चढून लेण्यात प्रवेश करताना ओवरीच्या खालच्या बाजूस भार्गव कोरलेले पाहायला मिळतात. लेण्याची रचना ओवरी, सभामंडप, त्याच्या दोन्ही बाजूला असलेले विहार आणि गर्भगृह अशी आहे. आज ओवरी नष्ट झालेली आहे. सभामंडप २० खांबांवर तोललेला आहे. या खांबावर खूप सुंदर नक्षीकाम होते. लेण्याची दुरुस्ती करताना ते नष्ट झाले. आता फक्त उजव्या बाहेरच्या कोपऱ्यातल्या खांबावर नक्षीकाम पाहायला मिळते. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ७ खोल्या आहेत. गर्भगृहात पाश्र्वनाथाची मूर्ती आहे. या लेण्यासमोरच मराठा सरदाराचे समाधी मंदिर आहे. त्याची रचना मराठेशाहीतील वाडय़ाप्रमाणे आहे. गाभाऱ्यात शिविपडीची स्थापना केलेली आहे. गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस कमानदार ओवऱ्या आहेत. गाभाऱ्यासमोर असलेल्या दारातून आणि कळसातून फक्त पिंडीवर प्रकाश पडेल अशी योजना केलेली आहे. मंदिरासमोर वीरगळ आणि तीन समाध्या आहेत.

नेहमीच्या गडबडीपासून लांब असलेल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात लेणी आणि मंदिर पाहता पाहता आपला काही शतकांचा कालप्रवास होतो. तुळजापूर, धाराशीव लेणी आणि तेर ही तीनही ठिकाणे खासगी वाहनाने एका दिवसात पाहून होतात.

अमित सामंत amitssam9@gmail.com

24
READ IN APP
X