09 August 2020

News Flash

वन पर्यटन : ज्ञानगंगा अभयारण्य

खळखळ वाहणाऱ्या निर्झरांनी अभयारण्यातून जाणारा घाटरस्ता आपल्याला आणखीच मोहून टाकतो.

ज्ञानगंगा अभयारण्य

सुट्टी लागली की आपण सहसा राज्याबाहेरील पर्यटनस्थळे पाहण्याला प्राधान्य देतो. पण वनांनी समृद्ध अशा महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्ये आहेत, ज्यांना भेट दिल्याशिवाय आपली भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही. या रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर या वनांमध्ये अधिवास करणाऱ्या विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते. ही निसर्गसंपदा आपल्याला सुखावून टाकते. आपल्या अशांत मनाला शांत करते. इथे रंगीबेरंगी फुलपाखरे आहेत, इथे वनांचा राजा सिंह, वाघोबा, गवा आणि हरणे असून, चिवचिवाट करणारे असंख्य प्रकारचे पक्षी येथे आढळतात. वाळलेल्या गवतावरून सरपटणारे प्राणीही आपले लक्ष वेधून घेतात. इथे खळखळाट करणाऱ्या नद्या आहेत. शोभेच्या झाडांबरोबर दुर्मीळ औषधी वनस्पतींचा सुंदर खजिना इथे आहे. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू.. सगळेच कसे मनोहारी आहे.. विदर्भ तर वन पर्यटनाची पंढरी आहे. महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यांतील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौ.कि.मी.च्या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. सहा व्याघ्र प्रकल्पांबरोबरच अनेक राष्ट्रीय उद्याने आणि राखीव वन क्षेत्रांचाही विदर्भात समावेश होतो. विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिले जाते तो बुलडाणा जिल्हाही वन पर्यटनात मागे नाही. ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार यांसारखी अभयारण्ये असून येथे वेगवेगळ्या प्रजातींचे असंख्य वन्य प्राणी अधिवास करतात.

बुलडाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला ९ मे १९९७ रोजी वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात बिबटय़ा, हरिण, काळवीट, रानमांजर, जंगली कुत्रे, तरस, लांडगा, रानडुक्कर, नीलगाय, चौिशगा, माकड, वटवाघूळ, अस्वल यांसारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात. साग, धावडा, बिजा मोहा, चारोळी, चिंच, आवळा, बेहडा, अंजन, बेल, सालाई यांसारख्या अनेक वृक्ष प्रजातींची गर्दी असलेल्या या अभयारण्यात निरगुडी, बोराडी, भराटी, यांसारख्या झुडूप प्रजाती तर तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदासारख्या गवत प्रजाती आहेत. स्थानिक तर काही स्थालांतरित पक्ष्यांच्या अशा एकूण १५० प्रजातींचे पक्षी अभयारण्यात विहार करतात. धरण परिसर, लाखाचा झिरा, नळकुंड, निसर्ग परिचय केंद्र, ब्रिटिशकालीन तलाव ही या अभयारण्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. लहान-मोठय़ा धबधब्यांनी आणि खळखळ वाहणाऱ्या निर्झरांनी अभयारण्यातून जाणारा घाटरस्ता आपल्याला आणखीच मोहून टाकतो. याशिवाय खामगाव-बुलडाणा मार्गावर बोथा शिवारात वन विभागाने निर्माण केलेले नक्षत्र वन पर्यटकांना आकर्षति करते. यामध्ये नक्षत्राप्रमाणे वृक्ष लावण्यात आले आहेत. इथली विविध वृक्ष प्रजाती आपले लक्ष वेधून घेते. प्रत्येक झाडावर त्याचे नाव आणि वैशिष्टय़े सांगणारी पाटी त्या झाडाची आणि आपली ओळख करून देते. नर्सरी, मुलांसाठी बांधलेला झोका, वनकुटी, बांबूपासून बनवलेले विश्रामगृह पाहण्यासारखे आहे. जानेवारी ते जून हा येथे येण्यासाठी उत्तम कालावधी आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यात वन्यजीवांचे मोठय़ा प्रमाणात दर्शन होते.

कसे जाल?

अभयारण्यात खामगाव आणि बुलडाणा येथून एसटीने जाता येते. खासगी वाहनांचा उपयोगही करता येतो. सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथील चिकलठाणा आहे.

खामगाव हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. रस्त्याने जाणार असाल तर बुलडाण्यापासून आठ किमी तर खामगावपासून २० किमी अंतरावर हे अभयारण्य वसले आहे.

जवळचे काय पाहाल?

लोणार सरोवराबरोबर वीरमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजालाही तुम्ही भेट देऊ शकतात. स्वामी विवेकानंद आश्रम आणि संत गजानन महाराजांचे मंदिर असलेल्या शेगावलाही आपण भेट देऊ शकतो. चिखलीचा सलानी बाबा दर्गा आणि नांदुऱ्याची उंच हनुमान मूर्ती पाहण्यासारखी आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे – drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2017 3:03 am

Web Title: dnyanganga wildlife sanctuary buldana
Next Stories
1 भूतानची साद!
2 चिंब भटकंती : वरंधची घळ
3 लोक पर्यटन : कचारगड गुंफा
Just Now!
X