09 August 2020

News Flash

जर्मनीचे कलाप्रेम

कासेल या पश्चिम जर्मनीमधील एका छोटय़ाशा शहरात गेली अनेक दशके डॉक्युमेंटाचा प्रभाव आहे.

परदेशी पर्यटनात चाकोरी मोडून कलाकृतींचा आनंद घ्यायचा असेल तर जर्मनीतील दोन प्रदर्शनं खास आहेत.

परदेशी पर्यटनात चाकोरी मोडून कलाकृतींचा आनंद घ्यायचा असेल तर जर्मनीतील दोन प्रदर्शनं खास आहेत. कासेल येथील ‘डॉक्युमेंटा’ हे समकालीन कलेवर आधारित आणि दुसरे म्युन्स्टर येथील ‘स्कल्प्चर प्रोजेक्ट’ हे शिल्पकलेवर आधारित. ही दोन्ही प्रदर्शनं जर्मनीच्या कलाप्रेमाचे प्रतीक आहेत.

विविध औद्योगिक प्रदर्शनांच्या निमित्ताने जर्मनीला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण त्याच जोडीने कला प्रदर्शनांना भेट देणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. मात्र, नेहमीच्या पर्यटनात या ठिकाणांचा तितका समावेश नसतो. जर्मन कलाप्रेमाचे प्रतीक असणारी दोन प्रदर्शने हमखास पाहावी अशी असतात. कासेल येथील ‘डॉक्युमेंटा’ हे समकालिन कलेवर आधारित आणि दुसरे म्युन्सटर येथील ‘स्कल्प्चर प्रोजेक्ट’ हे शिल्पकलेवर आधारित. दोन्ही प्रदर्शने जवळपास १०० दिवस सुरू असतात आणि जगभरातून पर्यटक येथे येत असतात.

कासेल या पश्चिम जर्मनीमधील एका छोटय़ाशा शहरात गेली अनेक दशके डॉक्युमेंटाचा प्रभाव आहे. दर पाच वर्षांनी हे प्रदर्शन भरते. कलाक्षेत्रातील प्रसिद्ध तसेच काहीशा अपरिचित कलाकारांची कला पाहण्याची ही अनोखी संधी. शहरातील वेगवेगळ्या वास्तुसंग्रहालयांमध्ये त्याचबरोबर उद्याने, प्रदर्शनी, सार्वजनिक स्थळे या ठिकाणी या कलाकृती मांडल्या जातात. इतिहास, समाजकारण, राजकारण, आत्ताचे जागतिक कलह, स्थलांतरण यांसारख्या अनेक विषयांवर जागतिक स्तरावर भाष्य करणाऱ्या कलाकृती येथे दिसून येतात. कला हे विविध सामाजिक-राजकीय विषयांवर भाष्य करणारे एक प्रभावी माध्यम आहे याची प्रचीती यातून येते.

१९५५ मध्ये आर्नोल्ड बोडे याने या प्रदर्शनाला सुरुवात केली. पेशाने चित्रकार, शिक्षक, क्युरेटर असलेल्या बोडेला जर्मनीतील आधुनिक कलेचे पुनरुज्जीवन करायचे होते. नाझी काळात आधुनिक कलेला आश्रय नसल्याने या कलेला काहीशी मरगळ आली होती. त्यामुळेच या कलेला पुन्हा गती मिळावी या उद्देशाने बोडेने हे प्रदर्शन भरवले. १९५५ मध्ये कासेलमध्ये झालेले हे प्रदर्शन तेव्हाच्या उद्यान आणि फलोत्पादन इत्यादींशी संबंधित प्रदर्शनाचा भाग होते. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे प्रदर्शन पुन्हा करण्याचे ठरले आणि मग ही परंपरा सुरू झाली.

आज जगभरातून अनेक लोक हे प्रदर्शन पाहण्यासाठी येतात. दरवर्षी या प्रदर्शनाला कलारसिकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. एकूण १०० दिवस हे प्रदर्शन सुरू असते. यंदाचे या प्रदर्शनाचे १४वे वर्ष. यावर्षी १० जून ते १७ सप्टेंबर २०१७ या दरम्यान कासेलमध्ये हे प्रदर्शन संपन्न झाले. या वर्षी या प्रदर्शनाचा पूर्वरंग ८ एप्रिल ते १६ जुलै २०१७ दरम्यान अथेन्स या ग्रीसमधील शहरात लोकांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

कलेची विविध अंग, नवीन संकल्पना या प्रदर्शनात दिसतात. डॉक्युमेंटामधील काही कलाकृती शहरात नंतरही बघायला मिळतात. कासेल ट्रेन स्थानकाबाहेरील जोनाथन बोरोफ्सकीचे ‘मॅन वॉॅकिंग टू द स्काय’ (१९९२), हाऊस रुकर आणि कंपनी यांचे Rahmenbau (१९७७) ही काही उदाहरणे.

त्याशिवाय कासेलचे वैशिष्टय़ म्हणजे इथले बेर्गपार्क विल्हेल्म्सह्य़ोहे हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ. डोंगरउतारावर पसरलेले हे युरोपमधील सगळ्यात मोठे अशा प्रकारचे उद्यान आहे आणि बहुधा जगातले दुसरे असे मोठे उद्यान असावे. इथला Wasserspiele हा पाण्याचा खेळ बघण्यासारखा आहे.

म्युन्स्टर हे पश्चिम जर्मनीमधील शहर जर्मनीची सायकल राजधानी म्हणून ओळखले जाते. म्युन्स्टरच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे १६व्या शतकात आनाबाप्टिस्ट या एका पुरोगामी ख्रिस्ती गटाविरुद्ध झालेली क्रांती. त्यांनी १५३४ मध्ये शहराचा ताबा घेतला होता. पण वर्षभरातच त्यांचा पाडाव करण्यात आला. या गटाच्या तीन नेत्यांना देहदंड देण्यात आला आणि ती मृत शरीरे पिंजऱ्यात ठेवून ते पिंजरे शहरातील लॅम्बर्ट कॅथ्रेडलच्या मनोऱ्यावर सर्वाना दिसावे असे लटकवण्यात आले. आजही ते रिकामे पिंजरे तिथे लटकलेले दिसतात. या लॅम्बर्ट कॅथ्रेडलचं अजून एका वैशिष्टय़ म्हणजे इथले रक्षक मनोरा (टॉवर गार्ड).  या रक्षकाचे काम गावात सगळे आलबेल आहे ना बघणे आणि कुठे आग अथवा इतर संकट दिसताच शिंग वाजवून त्याचा इशारा देणे. साधारण १४व्या शतकात सुरू झालेली ही परंपरा म्युन्स्टरमध्ये अजूनही बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे सध्या एक महिला या रक्षकाची भूमिका निभावत आहे. तिचे काम म्हणजे रोज रात्री (मंगळवार वगळता) या चर्चच्या ३०० पायऱ्या चढून मनोऱ्यावर जाणे आणि तीन दिशांना रात्री तीन वेळा शिंग वाजवून सर्व ठीक असल्याची सूचना देणे. पूर्व दिशेला शिंग वाजवले जात नाही, कारण तिथे दफनभूमी असल्याने त्या दिशेला आवाज करू नये अशी दंतकथा. गंमत म्हणजे ही मनोरा रक्षक स्त्री ब्लॉग आणि फेसबुकच्या माध्यमातून तिच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असते.

तर या म्युन्स्टरमधील ‘स्कल्प्चर प्रोजेक्ट’ची सुरुवात १९७७ मध्ये झाली. त्याची कथा डॉक्युमेंटापेक्षा काहीशी निराळी आहे. १९७७ मध्ये शहरात काही शिल्पे उभारायची ठरली, तेव्हा तिथल्या स्थानिकांनी याला विरोध केला. म्हणून क्लाऊस बुसमान या वेस्टफालिया स्थानिक संग्रहालयाच्या संचालकाने इथे कलाशिक्षण सुरू केले आणि त्यातूनच स्कल्प्चर प्रोजेक्टचा जन्म झाला. दर १० वर्षांनी भरणारे हे प्रदर्शन पाहायला जगभरातून लोक येतात. यंदा १० जून ते १ ऑक्टोबर २०१७ या दरम्यान हे प्रदर्शन सुरू  आहे. प्रदर्शन संपल्यावर यातली काही शिल्पे शहर प्रशासन विकत घेईल आणि इतर काही जुन्या शिल्पांबरोबर ती शहराची शोभा वाढवतील.

कासेल आणि म्युन्स्टर ही दोन्ही शहरे जर्मनीमधील इतर शहरांशी ट्रेनने जोडली गेली आहेत आणि फ्रँकफर्ट या शहरापासून साधारण २-३ तासांच्या अंतरावर आहेत. ही दोन्ही शहरे, विशेषत: ही प्रदर्शने कलारसिकांसाठी पर्वणी आहे. ज्यांना वेगळ्या प्रकारच्या पर्यटनात रस आहे त्यांनी आणि विशेषत: कलारसिकांनी त्यांच्या पर्यटनस्थळाच्या यादीत कासेल आणि म्युन्स्टरचा समावेश करायला हरकत नाही.

मार्ता मिनूयीनची  The Parthenon of Books  ही लिखाणावर बंदी आणि लेखकांचा छळ याविरुद्ध आवाज उठवणारी एक प्रतीकात्मक कलाकृती. फ्रिड्रिचप्लाट्झ या कासेलमधील चौकात ही कलाकृती उभारण्यात आली आहे. कासेलमध्ये नाझी काळात याच ठिकाणी पुस्तके जाळण्यात आली होती, जी पुस्तके नाझी विचारसरणीत बसणारी नव्हती. शेजारीच असलेल्या Fridericianum मधील लायब्ररीतील जवळपास साडेतीन लाख पुस्तके दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बहल्ल्यात नष्ट झाली. या कलाकृतीसाठी जवळपास एक लाख अशी पुस्तके वापरण्यात आली आहेत, ज्या पुस्तकांवर पूर्वी किंवा सध्या बंदी आणण्यात आली आहे. लोकांना ही पुस्तके आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रीसमधील पाथ्रेनॉन हे प्रथम लोकशाहीचे प्रतीक आणि म्हणूनच या कलाकृतीच्या माध्यमातून लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करण्यात आला आहे. १० ते १७ सप्टेंबर दरम्यान या प्रदर्शनाच्या शेवटच्या आठवडय़ात ही पुस्तके परत लोकांमध्ये वाटली गेली.  अशी कलाकृती १९८३ मध्ये अर्जेन्टिनामध्ये प्रथम साकारण्यात आली. अर्जेन्टिनामधील हुकूमशाही संपुष्टात आल्यानंतर उभारण्यात आलेल्या या कलाकृतीमध्ये मार्ताने हुकूमशाहीमध्ये बंदी असलेली पुस्तके वापरली होती.

श्रद्धा भाटवडेकर shraddha.6886@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 4:17 am

Web Title: documenta 2017 in kassel and sculpture projects munster in germany
Next Stories
1 वन पर्यटन : कोका अभयारण्य
2 चिंब भटकंती : कावनई तीर्थ
3 वाळवंटी नंदनवन
Just Now!
X