सायकलिंग हा हल्ली लोकप्रिय होत असलेला प्रकार हौशी उपक्रम असला तरी अशा उपक्रमांच्या सविस्तर नोंदी असणारं लिखाण होणं गरजेचं आहे. तसं झालं तर या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी ते नक्कीच उपयोगी पडू शकते.

कोणत्याही गोष्टींचं दस्तावेजीकरण करून ठेवण्याची आपल्याकडे खूप वानवा आहे. त्यातच एखादं हौशी किंवा सामाजिक काम असेल तर पाहायलाच नको. मग सायकलिंग त्याला कसं अपवाद ठरेल. हल्ली सायकलिंगला बरे दिवस येत आहेत. छोटय़ा राईडसह लांब पल्लय़ाच्या सायकलसफरी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे, परंतु अशा सर्वाच्याच अनुभवांच्या नोंदी फारशा सापडत नाहीत. हल्ली सोशल मीडिया किंवा ब्लॉगवर काहीजण आपलं अनुभवकथन करतात. पण अपवाद वगळता तो अनुभव सेल्फीच्या पुढे सरकत नाही. पद्धतशीरपणे माहिती संकलन करणाऱ्यांची संख्या आजही कमीच आहे. युरोप आणि अमेरीकेत त्याची उणीव नाही. मराठीत तर या विषयावर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच पुस्तक आहेत.
अरुण वेढीकर यांनी १९७९ साली केलेल्या सायकल सफरीची कहाणी ‘मुंबई ते काश्मीर सायकल सफर’ या पुस्तकात आहे. ते त्यांच्या सायकलच्या कॅरीअरवर बसवून आपल्यालादेखील या भन्नाट प्रवासाला घेऊन जातात. त्यांच्या लिखाणात एकाच वेळी विलक्षण प्रवास वर्णन आहे, मार्गावरील जनजीवनाचे शब्दचित्रण आहे आणि जोडीला स्वत: रेखाटलेली रेखाचित्रेदेखील आहेत. अनायासेच हे पुस्तक २० दिवसांच्या २५७७ किलोमीटर सायकलिंगच्या दस्तावेजाबरोबच ललित अंगाने जाणारे चांगले साहित्यदेखील ठरते.
अशीच एक जगावेगळी सायकलसफर शब्दबद्ध झाली ती सुमेध वडावाला-रिसबूड यांच्यामुळे. संस्कृती, समाज, भाषा, खाद्यपदार्थ, निसर्ग अशा जगाभरातील भिन्नतेवर मात करत ३२० दिवसांची २४ देशांची सायकल सफर या पुस्तकात अनुभवता येते. पुस्तक वाचल्यावर जगाची एक वेगळीच ओळख तर होतेच, पण सायकलविश्वाची आव्हानेदेखील स्पष्ट होतात. येथे एक सांगावे लागेल की सतीश आंबेरकर, महेंद्रकुमार आणि मख्खनसिंग यांनी २५ वर्षांपूर्वी ही मोहीम केली होती. पण कागदावर उतरली नव्हती. त्यामुळे मध्यंतराच्या काळात कोणाला जर असं काही भटकायचं असतं तर आत्तापर्यंत मराठीत यावर काहीच नव्हतं.
अहमदाबाद ते जम्मू या १९०० किलोमीटर सायकल सफरीची माहिती देणारं पुस्तक म्हणजे ‘ दोन चाकं आणि मी’. या प्रवासात भेटलेली माणसं आणि अनुभवलेले प्रसंग यामुळे लेखकाच्या विचारसरणीत काय बदल झाले हे या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे केवळ ललित प्रवासवर्णन न राहता स्थलकालानुसारच्या अनुभवांची जोड मिळते.
सांगण्याचा उद्देश हाच की, जगण्याचा एक वेगळा समृद्ध अनुभव अशा लिखाणातून घेता येतो. फक्त लांबच्या सफरीचं नाही तर तुम्ही रोज शहरात किंवा शहराच्या जवळपास सायकलिंगला जात असाल तर त्यातून मिळणारं मानसिक समाधान, व्यायाम, भेटणारे लोक, धुंडाळल्या जाणाऱ्या नव्या वाटा, नव्याने शोध लागलेले खाण्याचे अड्डे, प्रवासात आपल्याच सायकलीबद्दल कळलेली नवी माहिती या सर्व गोष्टी कुठेतरी शब्दबद्ध होऊन पुढच्या टप्प्यावर संक्रमित व्हायला हव्यात. त्यात्या काळानुसार त्यातील काही संदर्भ बदलतील, पण अनुभवांची शिदोरी कायम उपयोगी पडेल. सुमित पारिंगे याच्या पनवेल ते सियाचेन या सायकल प्रवासावर आणि सचिन गावकर याच्या एकटय़ाच्या सायकल भ्रमंतीवर येणाऱ्या आगामी पुस्तकांमुळे नवी पिढी ही उणीव काही प्रमाणात दूर करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.अशा लेखनातून केवळ त्या उपक्रमाशी संबधितांनाच माहिती मिळते असे नाही तर इतरांना ते लेखन प्रेरणादायी ठरू शकते. उत्तेजक औषधे सेवनाच्या कबुलीनंतर जगप्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला असला तरी त्याच्यावर लिहिली गेलेली ‘आर्मस्ट्राँग वल्र्ड्स ग्रेटेस्ट चॅम्पियन’, ‘लान्स आर्मस्ट्राँग परफॉर्मन्स प्रोग्राम’, त्याचे आत्मचरित्र ‘इट्स नॉट अबाऊट बाईक : माय जर्नी बॅक टू लाईफ’ किंवा डॅन कॉयल यांच्यासारख्या पत्रकाराने लिहिलेलं ‘लान्स आर्मस्ट्राँग वॉर’ ही पुस्तके हेच आपल्याला दाखवून देतात.
सायकलिंगवरील वाचण्यासारखी इंग्रजी पुस्तके
वाईड आय अँड लेगलेस – जेफ कॉनर, अ रफ राईड – पॉल किमेज, किंग ऑफ द रोड – रॉबिन मॅगोवन, द डेथ ऑफ मार्को पॅनतानी – मॅट रेन्डेल, द एस्केप आर्टिस्ट – मॅट सिटॉन, फ्रेंच रेवोल्यूशन्स – टिम मूर.
prashant.nanaware@expressindia.com