उकाडा संपून मस्तपकी पावसाला सुरुवात होत आहे. असं असलं तरी ऊन परवडलं पण पाऊस नको म्हणून पावसाळ्यात सायकिलग पूर्णपणे बंद, असा विचार जर तुम्ही केला असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. आपल्याकडे जेमतेम चार महिने पावसाचे असतात. त्यातही जेमतेम दोन महिने चांगला पाऊस पडतो. त्या दोन महिन्यांमध्येही संपूर्ण दिवसभर पाऊस न पडता दिवसातले काही तास किंवा कधी कधी फक्त रात्रीच पडतो. हे पाहता, पावसाळ्यात सायकिलग बंदचा विचार बाजूला सारून या दिवसातही सायकिलगचा आनंद मनसोक्तपणे लुटता येऊ शकतो. तो लुटताना काय काळजी घ्यावी यासाठी काही टीप्स येथे देत आहोत.
’ रेनकोट, टोपी : हलक्या पावसात तुम्ही रेनकोटचा वापर करू शकता. डोक्यावर हेल्मेटच्या आतमध्ये पावसाळी टोपी जरूर घाला. त्याचे दोन फायदे आहेत. पहिलं, तुमचं डोकं भिजणार नाही आणि दुसरं, टोपीच्या समोरील फ्लॅपमुळे पावसाचे पाणी डोळ्यांवर येणार नाही. तसंच पायांमध्ये पाणी आत जाण्यापासून संरक्षण करणारे जोडे जरूर वापरा. तुमच्या पाठीवर बॅग असेल तर त्यालाही पावसाळी कव्हर लावा, जेणेकरून बॅगमधील वस्तू भिजणार नाहीत. सायकिलग करताना छत्रीचा वापर करणं कटाक्षानं टाळा. एका हाताने छत्री धरून सायकल चालवण्याने अपघाताला निमंत्रण मिळू शकतं.
’ मडगार्ड : सायकलच्या चाकामुळे चिखल उडू नये म्हणून त्यावर लावण्यात येणाऱ्या मडगार्डमुळे तुम्ही पावसाच्या दिवसांत सायकिलग करताना कोरडे आणि स्वच्छ राहू शकता. पुढच्या आणि मागच्या चाकावर मडगार्ड लावणं गरजेचं आहे. एकतर अंगावर आणि कपडय़ांवर पाणी व चिखल उडण्यापासून तुमचा बचाव होतो. दुसरा म्हणजे फक्त तुमच्याच नाही तर विशेषत: मागच्या चाकामुळे तुमच्या मागे सायकल किवा बाईक चालवणाऱ्यावरही पाणी, चिखल उडतो, त्याला मोठय़ा प्रमाणात आळा बसतो. सहज लावता आणि काढता येणारे मडगार्ड बाजारात उपलब्ध आहेत.
’ गॉगल : पावसाचे पाणी, टायरमुळे उडणारा चिखल, दगडांचे बारीक तुकडे आणि वाऱ्यामुळे उडून येणारा कचरा यांपासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण होण्यासाठी पांढरी, पिवळी किंवा केशरी रंगाची काच असलेला बंदिस्त गॉगल वापरा.
’ खड्डे आणि डबकी : खड्डे आणि डबकी ही सायकलस्वारांसाठी वाईट बातमी घेऊन येतात. खड्डे किंवा डबक्यामुळे तुमचा अपघात होण्याची शक्यता तर असतेच पण त्यामुळे तुमच्या सायकलच्या चाकाचं किंवा मोठा अपघात झाल्यास सायकलच्या इतर भागांचंही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये खड्डे आणि डबकी लक्षपूर्वक टाळा.
’ हवेचं प्रमाण : चाकातील टय़ूबमधील हवा नेहमीच्या दबावापेक्षा १०-१५ पीएसआयने कमी ठेवल्यास सायकलच्या चाकाला रस्त्यावर चांगली पकड मिळते. हवेचा दाब कमी केल्यामुळे तुमच्या सायकलचा वेग कमी जरूर होईल. परंतु वाईट हवामान आणि खराब रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण देण्यापेक्षा कमी वेगात जाणं केव्हाही चांगलं.
’ वेगावर नियंत्रण आणि ब्रेकिंग : पावसाळी वातावरणात कोणत्या वेगात सायकल चालवायची आणि ब्रेक कसे लावायचे याचा अंदाज असणं खूप महत्त्वाचं आहे. अचानक आणि करकचून ब्रेक लावणं टाळा. कारण त्यामुळे तुमचे सायकलवरचे नियंत्रण सुटून ती घसरण्याची खूप शक्यता असते. ब्रेक सहजतेने आणि हलकेच लावावा. ओल्या रस्त्यांवर सायकिलग करताना दुरूनच रस्त्याचा अंदाज घ्यायला शिकलं पाहिजे. सायकलचा वेग कुठे कमी करायचा किंवा ती कधी थांबवायची हे आधीच ठरवता येईल.
’ दिव्यांचा वापर : मोठय़ा पावसामध्ये तुम्ही सायकल चालवत आहात याची इतर वाहनांना जाणीव करून देणं अतिशय आवश्यक आहे. पाऊस पडत असताना दिवसादेखील ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असतो. अशा वेळी समोरचं दिसण्यासाठी हॅन्डलबारवर चांगला टॉर्च असावा. तो नसल्यास हेडटॉर्चही चालेल. तसंच तुमच्या मागच्या व्यक्तीला सिग्नल मिळण्यासाठी सायकलच्या सीटला किंवा हेल्मेटला सतत िब्लक होणारा दिवा असणं अत्यंत गरजेचं आहे.
’ सायकलची स्वच्छता : पावसामध्ये सायकिलग करताना तुमची सायकल धुऊन निघत असली तरी चिखल, माती चेन किंवा गिअरमध्ये जाऊन बसते. त्यामुळे पावसात सायकिलग करून आल्यानंतर ती पाण्याने आणि ब्रशने स्वच्छ करावी. पाण्यामुळे गंज पकडू नये म्हणून सायकलही सुक्या कपडय़ाने पुसून काढावी.
’ वळणांवर सावधान : सायकिलग करताना इतर वेळेसही वळणांवर सावधानता बाळगावी. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ती नेहमीपेक्षा थोडी अधिक बाळगल्यास उत्तम. वळणावर सायकलचा वेग कमी करून अगदीच कोपऱ्याने वळण न घेता थोडं लांबचं वळण घ्या. वळण घेताना तुमचा आतला पाय पेडलवरून काढून जमिनीच्या थोडा वर ठेवा आणि तुमच्या शरीराचा भार हलकेच त्या दिशेला टाका. जेणेकरून काही गडबड झालीच तर ताबडतोब तुम्हाला स्वत:ला आणि सायकललासुद्धा सावरता येईल.
’ सुरक्षित अंतर : जोराचा पाऊस, न दिसणारे खड्डे, गाडय़ा रस्त्यांवरून सरकणं यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. एखाद्या वाहनाने किंवा तुम्ही गटाने सायकिलग करत असाल तर त्या सायकलस्वाराने अचानक ब्रेक मारल्यासही अपघात होऊ शकतो. त्यामुळे मोठी वाहने आणि दोन सायकलध्येही सुरक्षित अंतर ठेवा.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com