18 November 2017

News Flash

चिंब भटकंती : वरंधची घळ

सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे.

आशुतोष बापट | Updated: August 16, 2017 2:04 AM

सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे.

वर्षांऋतूमधे नेहेमीच्या ठिकाणांपेक्षा जर एखादे नवीन, अनोखे, देखणे ठिकाण मिळाले तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. असेच एक ठिकाण म्हणजे शिवथरघळीच्या जवळ असलेली वरंधची घळ. वरंध घाटातून जो रस्ता शिवथरघळीला जातो त्याच रस्त्याने जाऊन शिवथरघळ फाट्यावर न वळता तसेच सरळ जायचे की आपण एका मोठ्या मंदिरापाशी पोचतो. तिथले लोक त्याला सुंदरमठ म्हणतात. तिथून अर्धा तास डोंगर उतरून गेले की एक पायवाट काहीशी पुढे पुढे जाते आणि आपण त्या घळीच्या खाली येतो. तिथून दगडात कोरलेल्या काही पायरया चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. घळीच्या दाराशी एक लोखंडी सरकते दार बसवले आहे. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळ जवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. याचा दुसरा रस्ता, वरंध गावातून आतमध्ये जातो. आत गेल्यावर अंदाजे चार कि.मी. अंतरावर ही घळ आहे. ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे.

पेबचा किल्ला

सर्वसामान्य जनांना सहज जाता येईल आणि ऐन पावसळ्यात धुक्यात बुडालेल्या डोंगराची मजा अनुभवता येईल असे ठिकाण म्हणजे माथेरानच्या अगदी शेजारी असलेला पेबचा किल्ला अथवा बिकटगड. पुणे आणि मुंबई पासून अंदाजे सारख्याच अंतरावर असलेले माथेरान हे गिरीस्थान खास करून मुंबईकरांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. माथेरानवरून रेल्वेमार्गाने अंदाजे दीड ते दोन कि.मी. चालत यावे. डावीकडे एक कमान लागेल तिथे रेल्वेमार्ग सोडून द्यावा आणि पायवाटेने खाली उतरावे. पायवाट जरी अरुंद असली तरीसुद्धा खूप छान आहे. ही पायवाट आपल्याला माथेरान आणि पेबचा किल्ला यांच्या िखडीत आणून सोडते. किल्याची उंची माथेरान पेक्षा कमी असल्यामुळे आपण चालायला लागल्यापासून हा किल्ला आपल्याला काहीसा खालच्या अंगाला दिसत असतो. साधारणत आपल्याला किल्ल्यावर चढून जावे लागते. परंतु इथे आपल्याला डोंगर उतरून किल्यावर जायचे असते. किल्ला मोठा सुंदर आहे. वाटेत एके ठिकाणी मोठा खडक आहे त्यावर चढून जाण्यासाठी लोखंडी जिना बसवलेला दिसतो. माथ्यावर एक आश्रम असून दत्ताच्या पादुका तिथे ठेवलेल्या आहेत. यंदा पाऊस खूप महामूर झाल्यामुळे हा सगळा परिसर हिरवागार आणि विविध फुलांनी नटलेला असतो. सकाळी सकाळी जर आपण माथेरानवरून या किल्यावर जायला निघालो तर पानाफुलांवर पडलेले दविबदू फारच सुंदर दिसतात. किल्ला बघून आपण दुपापर्यंत परत माथेरानला येऊ शकतो. इथून दिसणारा आसमंत, सह्याद्रीचे रौद्र रूप फारच देखणे आणि रांगडे दिसते.

भोरांडय़ाचे दार

आडवाटेवरची निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यात खरी मजा आहे. त्यातही ऐन पावसाळ्यात अशा ठिकाणी जायला मिळाले तर फारच सुंदर. पर्यटकांच्या लोंढ्यापासून वाचलेली तरी पण आपल्या जवळ असणारी अशी ठिकाणे मुद्दाम जाऊन पाहण्यासारखी आहेत. धुवाधार पावसात जीवधन नाणेघाट परिसर ओलाचिंब होऊन गेलेला असतो. याच नाणेघाटाच्या जवळ असूनही अपरिचित असलेले हे ठिकाण आहे. सह्याद्रीतून देश व कोकण जोडणारे मार्ग म्हणजे घाट. एका बाजूला सातवाहनांचा नाणेघाट आणि दुसरीकडे माळशेज घाट यांच्या मधोमध आहे भोरांड्याची नाळ. अंजनावळे गावापासून जवळच असलेल्या या घाटमाथ्यावरील ठिकाणापाशी डोंगराला एक नैसर्गिक दार पडले आहे. हेच ते भोरांड्याचे दार. या प्राचीन घाटवाटेने खाली कोकणात भोरांडे या गावी उतरता येते. समोरच भरवगडाचे रौद्रभीषण कडे आपल्याला दर्शन देतात. देवदांड्याच्या डोंगरात असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याची टाकी, प्रचंड घेराचे वृक्ष यांचे अनाघ्रात सौंदर्य पाहण्यासाठी वाट वाकडी करून आवर्जून भेट द्यावी. पावसाळ्यात कधी संपूर्ण आसमंत ढगांनी आच्छादिलेला असतो. याठिकाणाहून दिसणारा मोरोशीच्या भरवगडाचा सुळका छातीत धडकी भरवतो. सध्या तर सर्वत्र भात लागवड झालेली दिसते. समोरच देवदांड्याचे डोंगर हिरवा शालू पांघरून बसलेले, त्यावरून वाहणारे असंख्य धबधबे आणि त्यातून जाणारी नागमोडी वाट, हे सारेच दृश्य एकदा तरी अनुभवायला हवे. १९६८ साली अलिटालिया कंपनीचे विमान याच देवदांड्याच्या डोंगराला आदळून कोसळले होते त्याच्या आठवणी स्थानिक अजूनही सांगतात. हाटकेश्वरपासून निघालेली ही डोंगररांग हडसर, निमगिरी हे किल्ले सामावून घेत याठिकाणी येऊन संपते.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

First Published on August 16, 2017 2:04 am

Web Title: famous place to visit in maharashtra