12 December 2017

News Flash

वन पर्यटन : हत्ती बेट (देवर्जन)

उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे | Updated: September 27, 2017 4:49 AM

हत्ती बेट (देवर्जन)

लातूर जिल्ह्य़ाच्या उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे. हत्ती बेटाला पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झालं आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्पं मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिलं नाही असा इतिहास इथं सांगितला जातो. हत्ती बेटावर दत्ताचं मंदिर आहे तसेच गंगाराम महाराजांची समाधी आहे. लोकांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या या ठिकाणाला आसपासच्या गावांतून तसेच शेजारच्या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात भाविक भेट देत असतात. पौर्णिमेला इथं भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

हत्ती बेट पूर्वी उजाड आणि बोडका डोंगर होता. इथली जमीन निकृष्ट दर्जाची असल्याने नैसर्गिक झाडं डोंगरावर नव्हती. हे वन क्षेत्र मौजे हणमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी आणि देवर्जन या गावांच्या सीमेलगत असून त्याचं क्षेत्र ४१ हेक्टर एवढं आहे. लोकांनी ठरवलं, प्रशासनाला लोकांनी आणि गावकऱ्यांनी साथ दिली तर किती उत्तम काम होऊ शकतं याचं हत्ती बेट हे एक उत्तम उदाहरण आहे. या सर्वानी मिळून या उजाड बोडक्या डोंगरावर हिरवाई फुलवली आहे. त्याचं रूपडंच पालटून टाकलं आहे.

वन विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत या ठिकाणी रोपवन भाग एक अंतर्गत सुमारे १५ हेक्टरवर सावली देणाऱ्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली होती, त्यामुळे आज हत्ती बेटाचा डोंगर हिरवागार होण्यास तसेच परिसराला सौंदर्य प्राप्त होण्यास मदत झाली आहे.

पूर्वी उघडा दिसणारा परिसर आज नैसर्गिक सौंदर्याने नटला आहे. खवल्या मांजर, सायाळ जिला आपण साळिंदर असं म्हणतो ते, लांडगा, तरस यांसारख्या अनेक प्राण्यांचा वावर या भागात आहे. पर्यटकांसाठी तसेच लहान मुलांसाठी अनेक उपक्रम येथे करण्यात आले आहेत. हत्ती बेट (देवर्जन) वन क्षेत्रातील निरीक्षण पॉइंटवरून चोहोबाजूंनी दिसणारे लहान-मोठे तलाव, दूरदूपर्यंत दिसणारी शेती, गावं याचं विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ पाडणारं आहे. मृद आणि जलसंधारणाच्या कामांनी कधी काळी उजाड बोडकं असलेलं हत्ती बेट आता हिरवगार झालं आहे एवढंच नाही तर आता बेटावर भरपूर पाणीही उपलब्ध आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून झालेलं हे परिवर्तन महत्त्वाचं आहे. डोंगरावर वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आल्याने त्यांचे गावाकडील स्थालांतर कमी झालं आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com

First Published on September 27, 2017 4:49 am

Web Title: forest tourism hatti bet dewarjan