News Flash

वन पर्यटन : तानसा अभयारण्य

मुंबई-ठाणेकरांप्रमाणे जंगलातील वन्यजीवांची तहान भागवण्याचे कामही याच जलाशयाच्या माध्यमातून

Tansa-Sanctuary
तानसा अभयारण्य

पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात काय आहे, असं जर कुणी विचारलं तर ‘जो जे वांछिल तो ते लाभो’ असं भरभरून देणाऱ्या साऱ्याच गोष्टी महाराष्ट्रात आहेत. इथे साहसी खेळ प्रकारासाठी असंख्य ठिकाणं आहेत.. गावरान मेवा उपलब्ध करून देणारे आणि नानाविध खाद्यप्रकार आहेत.. इथं आहेत स्वत:च्याच श्वासांची लय जाणवून देणारी आणि आकाशाला गवसणी घालणारी वने.  इथे आहेत खळाळत, फेसाळत कोसळणारे धबधबे, इथे आहेत कष्टकरी.. पावसात अर्ध्या ओल्या छत्रीखाली पुठ्ठय़ानं वारा घालत गरम गरम मक्याचं कणीस भाजून देणारे हातगाडीवाले.. धुंद करणारे वातावरण आणि सर्वाच्या सोबतीने निसर्गभ्रमणाचा आनंद द्विगुणित करणारा आपल्या जिवलगांचा सहवास.. याच आनंदाचा भागीदार व्हायचं असेल, वेळेची कमी असेल तर फार दूर जाण्याची गरज नाही. मुंबई-ठाण्याच्या अगदी जवळच वसलंय तानसा अभयारण्य. तानसा.. मुंबई-ठाणेकरांची तहान भागवणारं.. वन्यजीवांची तृष्णा भागवणारं.. तानसा..

घनदाट जंगल, विलोभनीय जलाशय आणि दुर्मीळ दर्शनाने मनाला वेड लावून जाणारे वन्यजीव.. मोकळ्या आरोग्यसंपन्न श्वासांसाठी मुंबईकरांचे फुप्फुस.. वाडा, शहापूर, मोखाडा तालुक्यांत वसलेलं एक समृद्ध जंगल.. महानगरीय माणसासाठी हक्काचं विरंगुळ्याचं ठिकाण. वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवास. मनात थुईथुई नाचणारा मोर प्रत्यक्षात नाचताना पाहण्याचा आनंद देणारं, मनाला शांती प्रदान करणारं ठिकाण तानसा.. मुंबईपासून अवघ्या ९० किमी अंतरावर असलेलं आणि ३०२.८१० चौ. किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेलं विलोभनीय जंगल.. तानसा. १६ सप्टेंबर १९८५ रोजी या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. दुर्मीळ वनौषधींबरोबर असंख्य वन्यजीवांना संरक्षण मिळालं. हिरव्यागार वनश्रीनं नटलेला हा सुंदर निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आवडला नसता, त्यांची पावलं तिकडे वळाली नसती तर नवलच.

मुंबई-ठाणेकरांप्रमाणे जंगलातील वन्यजीवांची तहान भागवण्याचे कामही याच जलाशयाच्या माध्यमातून होते. स्वप्ननगरी मुंबईत येऊन त्यासाठी राब राब राबणाऱ्या कष्टकऱ्या आणि निसर्गवेडय़ा मुंबईकरांना विरंगुळा देणारं त्यांच्या घराच्या जवळ असणारं असं हे वन आहे. त्यांचा कोंडलेला श्वास या जंगलात येऊन मोकळा होतो. कळंब, बांबू, खैराची झाडं त्यांच्या स्वप्नांना अधिक उंची प्रदान करतात, त्याच्या पूर्ततेसाठी पंखात नवं बळ देतात. घनदाट वृक्षराईने नटलेल्या या अरण्यात ५४ वन्यजीव प्रजाती, २०० प्रकारचे पक्षी आहेत. साहसाची आवड असणाऱ्या आणि रानोमाळ भटकंती करणाऱ्या ट्रेकर्सना हे अरण्य साद घालतं. माहुली किल्ला यासाठी त्यांना आव्हान देत राहतो. येथे प्राचीन शिवमंदिरही आहे. त्याच्या मागच्या बाजूने असलेला सूर्यमाळेचा प्रदेश पर्यटकांना खूप आवडतो. येथे ब्रिटिशकालीन डाकबंगला आहे. जिथे राहण्याची सोय होऊ शकते. इथल्या रानवाटा अजून फारशा गर्दीने रुळलेल्या नाहीत. जंगलात साग, ऐन, शिसव, बिब्बा, खैर, सावर यासारख्या पानझडी वृक्षांबरोबरच निलगिरीची झाडंही दिसून येतात. भेकर, तरस, मोर, ससे, रानडुक्कर, वानर, माकड, खार, चितळ, घुबड, खंडय़ा, पाणकोंबडय़ा, भारद्वाज, कोकिळा, साळुंकी, रानकबूतर, खोकाटी, सुतार पक्षी, पोपट, हळद्या, चिमण्या, पारवे, वटवाघूळ, बगळे, दुर्मीळ होत चाललेले गरूड, गिधाड असे अनेक प्राणी आणि पक्षी तानसा अभयारण्याची श्रीमंती वाढवतात. दक्षिण उष्ण कटिबंधीय आद्र्रतायुक्त वनाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी नोव्हेंबर ते मे असा आहे. अभयारण्याबरोबर पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण माहुली किल्ला असून किल्ल्यावर नेणाऱ्या वाटा ट्रेकर्सना कसरत करायला भाग पाडतात. तहान भागवणारं तानसा. निसर्गाच्या संगीताला सुरेल साथ देणारं तानसा. बांबूच्या वनामधून गोड शीळ फुंकणारं तानसा. पक्ष्यांच्या किलबिलाटानं पहाट जागवणारं तानसा. गर्दीच्या कोलाहलात मनाला शांती प्रदान करणारं तानसा. शहरात राहून एका दिवसात रानवाटांवर भ्रमंतीचा आनंद देणारं तानसा. अशा विविध रूपातून तानसा तुमच्या- माझ्यासमोर येत राहातं. गरज आहे एकदा तिथं जाऊन त्याची भेट घेण्याची. पावसाळा सुरू आहे. हिरवाईनं डोंगरमाळ सजला आहे.. चिंब भिजणाऱ्यांसाठी रानवाट खुणावत आहे.

कसे जाल?

अभयारण्य मुंबईपासून ९० किमी

अंतरावर आहे. रस्त्याने जाणार असाल तर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनने शहापूरहू येथून जाता येते. जवळचे रेल्वे स्थानक आटगाव रेल्वेस्टेशन आहे. वन विभागाच्या विश्रामगृहाबरोबरच सूर्यमाळ येथे निवास सुविधा उपलब्ध आहेत.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 1:49 am

Web Title: forest tourism tansa wildlife sanctuary
Next Stories
1 चिंब भटकंती : वरंध आणि नेकलेस
2 रानावनातल्या श्रावणसरी
3 समुद्र बिलोरी ऐना.. 
Just Now!
X