News Flash

वाघाच्या पलीकडले…

जंगल भटकंती म्हणजे वाघ आणि वाघ म्हणजेच जंगल अशी आपल्या वन्यजीव पर्यटनाची व्याख्या झाली आहे.

सर्व छायाचित्रे - अभिजीत आवळस्कर 

जंगल भटकंती म्हणजे वाघ आणि वाघ म्हणजेच जंगल अशी आपल्या वन्यजीव पर्यटनाची व्याख्या झाली आहे. वाघ दिसला की अजि म्या ब्रह्म पाहिले, अशीच आपली धारणा होते. पण त्यापलीकडेदेखील जंगल उरतेच. यंदाच्या जंगल भटकंतीत हे आपण नक्कीच पाहायला हवे.

जंगल हे काही एका प्राण्याने बनत नाही. वाघ, सिंह, हत्ती ह्य़ाशिवायदेखील जंगलात अनेक प्राणी असतात. जर कोणत्या जंगलात वाघ-सिंह हे प्राणी नसतील तर ते जंगल जंगलच राहत नाही का? जंगलाची शोभा कमी होते का? अनेक वर्षे जंगलात फिरल्यावर माझं असं पक्कं मत झालंय की, जंगल ते असते जेथे मन मंगल होते. जीवसृष्टीचा चैतन्यमय मुक्त विहार आपल्या मनाला हळुवारपणे जवळून स्पर्श करून जातो तेच खरे जंगल!

आपला देश बहुविध जंगलांनी नटला आहे. इतकी वैविध्यता एकाच प्रदेशात सापडणं तसं दुर्मीळच म्हणावं लागेल. पश्चिम घाट आणि ईशान्य प्रदेश सदाहरित जंगलांनी आणि धबधब्यांनी नटलेला असतो. हिमालयात गेलात तर सूचिपर्णी आणि खुरटय़ा वनस्पतींचे जंगल आढळते. तराईच्या परिसरात नद्या आणि चिखल असल्याने वृक्ष कमी असून हत्तींचे कळपच्या कळप लपतील असे दोन-तीन मीटर उंचीचे गवत असते. दख्खनच्या पठारावर आणि सौराष्ट्रात अफ्रिकेतील सवाना जंगलासारखे छोटेसे गवत आणि विरळ असे काटेरी बाभळीचे वृक्ष असतात. समुद्रकिनाऱ्याजवळ खाडींमध्ये तिवरांची आणि केवडय़ाची बने असतात. तर समुद्राखाली प्राणिसमूहाचे वेगळेच विश्व नांदत असते.

अंदमान आणि लक्षद्वीपच्या नितळ सागरात स्नोर्केलिंग आणि स्कूबा डायव्हिंग करताना दिसणारे प्रवाळ, कासवं, डॉल्फिन आणि हजारो रंगबिरंगी मासे ह्य़ांच्या अद्भुत सौंदर्याची तुलना कशाशी करणार? बर्फाच्छादित डोंगरावरील सकाळच्या सोनेरी किनारीवर स्वच्छंदी भरारी घेणाऱ्या लॅमरगिअर गिधाडांचे सौंदर्य आणि मोनाल पक्ष्यांचे मन मोहून टाकणारे नवरंगी नृत्य हे मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पात कोठून दिसणार?

कित्येक जंगलांमध्ये दुर्मीळ हरणं, सुसरी, सारस क्रेन, मासे, वटवाघळ सापडतात. परंतु प्रत्येक जंगलाचे वैशिष्टय़ त्यात सापडणाऱ्या वृक्षवेली, वनस्पतींमुळेच असते. एकदा का तुम्ही कोकणातला गारंबीचा वेल पाहिलात किंवा मेघालयातील झाडांच्या मुळांनी तयार झालेला लिव्हिंग रूट ब्रिज पाहिलात, की ती नैसर्गिक मोहकता कायमची मन:पटलावर कोरली जाते. तरीही आपण कासच्या पठाराची आणि उत्तराखंडातील भियुंधार या फुलांच्या दरीची तुलना करू पाहतो. जंगलातील खडक म्हणा, पाण्याचे साठे, स्थलांतरित पक्ष्यांची निवासस्थाने, मधमांश्यांचं पोळं, मुंग्या आणि वाळवीची किल्लासदृश घरं अशा अनेकविध घटकांनी जंगलाची शोभा वाढवलेली असते. तेव्हा ह्य़ा वर्षीच्या सुट्टीमध्ये वाघाच्या पुढे एक पाऊल टाकत जंगलाचा आनंद घेऊ या.

जंगल भटकंतीचे आयोजन

आपण जेथे जाणार आहात त्या जंगलासंदर्भातील पुस्तकं, ब्लॉग, वेबसाइट्स वाचाव्यात.

 • त्या ठिकाणच्या एखाद्या अनुभवी स्थानिक मार्गदर्शकाला जंगल भ्रमंतीसाठी सोबतीला घ्यावे. तो आपणास जंगलातल्या अनेक रंजक गोष्टी सांगेल.
 • शक्य असेल तर त्या जंगलाचे नकाशे, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती आणि प्राण्यांची चेकलिस्ट इंटरनेटवरून डाऊनलोड करा. अनेक वेबसाईट्स आणि ग्रुप्सवर ती सहज उपलब्ध असते. जंगलाचा नेमका आवाका त्यामुळे कळू शकेल.
 • जंगल सफारी किती असणार त्याचे नियोजन आधीच करा. बहुतांश अभयारण्यांमध्ये सफारीचे ऑनलाइन बुकिंग केले जाते.
 • जंगल सफारीबरोबरच त्या अभयारण्याच्या हद्दीच्या बाहेर एखादे उत्तम नैसर्गिक ठिकाण असू शकते. तेथे अनेक प्रकारचे पक्षी, वनस्पती, फुलपाखरं दिसतात. अशा ठिकाणांना आवर्जून भेट द्या. अशा भेटीचे नियोजन आधीच करा.
 • त्याचबरोबर काही ठिकाणी धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणंदेखील असतात. त्याची माहिती आधीच घ्या आणि नियोजन करा.

हे लक्षात ठेवा

 • दुर्बिण आणि संबंधित जंगलानुसार आवश्यक अशी पुस्तकं बरोबर असावीत.
 • जंगलातील अनोळखी फळं, मशरूम्स किंवा पानांना हात लावू नये, खाऊ नये.
 • सुवासिक परफ्यूम, भडक अथवा अति उजळ कपडे आदींचा वापर टाळावा.
 • सफारीदरम्यान आपल्या वाहनातून उतरून पायी जंगलात फिरू नका.
 • चित्रविचित्र आवाज, मोबाइलवर गाणी, संगीत आणि पक्ष्यांचे आवाज वाजवू नका.
 • जंगलात शक्यतो मार्गदर्शकाशिवाय जाऊ नका.
 • धूम्रपान, मद्यपान तसेच उग्र गंधाचे खाद्यपदार्थ संपूर्णपणे टाळावेत.
 • तेथे कार्यरत असणाऱ्या एनजीओज्ना भेट द्या. स्थानिकांच्या अल्प बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकत घ्या.
 • किमान प्राथमिक औषध असणारे प्रथमोपचार किट सोबत असावे.

zans_kar@yahoo.co.uk

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2016 10:29 am

Web Title: forest wandering 2
टॅग : Forest
Next Stories
1 नेपाळची साद!
2 दुचाकीवरून : दुमडणारी सायकल
3 गोदापात्रातील मुद्गलेश्वर
Just Now!
X