मानवी ऊर्जेवर चालणारं आणि गेल्या दोन शतकांहून अधिक काळ जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं वाहतुकीचं साधन म्हणजे सायकल. कुठल्याही इंधनावर सायकल अवलंबून नाही, त्याची दुरुस्तीही सोप्पी. त्यामुळेच रस्ता नसलेली वाट, डोंगररांगा, घनदाट जंगल किंवा साचलेलं पाणी अशा अनेक ठिकाणी जिथे माणसाला केवळ चालत जाणं शक्य आहे त्या ठिकाणीही फक्त आणि फक्त सायकलच पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते.

कार्ल ड्रेस या जर्मन संशोधकाने १८१७ मध्ये लौफमशीनचा (चालणारे यंत्र) शोध लावला. आजच्या दुचाकीचे (सायकल आणि मोटरसायकल) ते पहिले रूप. विशेष म्हणजे या पहिल्या दुचाकीला कुठलंही यंत्र सोडा, साधे पायडलसुद्धा नव्हतं. दोन चाकं आणि पायांच्या मदतीने ही दुचाकी पुढे दामटवली जात असे. आजघडीला हीच सायकल आधुनिक झाली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सायकलींना आधुनिक का म्हणतात, याची आपण यापूर्वीच्या अनेक भागांमध्ये सविस्तर माहिती घेतली आहे.  सायकल बनविणाऱ्या अनेक मोठय़ा कंपन्यांनी त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, भविष्यातील सायकल कशी असेल, याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. अनेक कंपन्यांनी भविष्यातील सायकलींची प्रारूपे सादर करून सायकलस्वारांना आपल्या कौशल्याने केवळ आश्चर्यचकित केले नसून, त्यांची उत्सुकता शिगेला नेऊन ठेवली आहे.

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Newspaper hack
Kitchen Hack : फ्रिजमध्ये ठेवा रद्दी वृत्तपत्र अन् पाहा काय होईल कमाल, Viral Video येथे बघा
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

अत्याधुनिक सायकल ही तंत्रज्ञान आणि कला यांचा उत्तम संगम असेल यात शंका नाही. चालवायला आरामदायक असणारी भविष्यातील सायकल दिसायलाही आकर्षक असेल असा निर्मात्यांचा दावा आणि प्रयत्न आहे. पायाभूत सुविधांचा उत्तरोत्तर सुधारत जाणारा दर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन शोध याचाही फायदा सायकलला अत्याधुनिक बनवण्यासाठी होणार आहे. सर्वाधिक मेहनत हे सायकलचं डिझाइन आणि तिच्या एरोडायनॅमिकपणावर घेतली जातेय. सायकलस्वाराला सायकल चालवताना ती कशा प्रकारे आरामदायी असेल याबाबतही विचार केला जात आहे. त्याचप्रमाणे सायकलस्वाराच्या शरीरयष्टीनुसारच त्याची सायकल डिझाइन केली जाईल. त्यामुळे ती अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. सायकलचा वेग वाढवण्यासाठीच्याही अनेक उपाययोजना अत्याधुनिक सायकलमध्ये करण्यात येत आहेत. त्यासाठी चाकांचे हब, स्पोक्स आणि ड्राइव्ह ट्रेन पूर्णपणे काढून त्याची उपाययोजना नव्या पद्धतीने करण्यावर संशोधन केलं जात आहे. गिअर बदलणे आणि ब्रेक सिस्टममध्येही आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत.

कार्बन फायबर आणि टायटॅनियम हे मटेरियल आजघडीला महाग असलं तरी भविष्यात उत्पादन आणि मागणीनुसार त्याच्या किमती कमी होऊ शकतात. त्यामुळे भविष्यातील प्रत्येक सायकल ही वजनाने हलकी असू शकते. त्यामुळे सायकलचा केवळ वेग आणि सायकलची मजबुतीही वाढणार आहे. अंधारात सायकल चालवताना वापरावे लागणारे रिफ्लेक्टर्स आणि लाइट्स वापरण्याची गरज कदाचित भविष्यात लागणार नाही. कारण सायकलच्या चाकांमध्ये आणि फ्रेममध्येच त्याची सुविधा केलेली असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक सायकलच्या टायरमध्ये हवासुद्धा भरण्याची गरज भासणार नाही, असा संशोधकांचा दावा आहे. सध्या फोल्डी सायकलला अनेक मर्यादा आहेत. परंतु, भविष्यातील फोल्डेबल सायकलला आत्तासारखे र्निबध नसतील असं त्यांचं डिझाइन आणि निर्मिती केली जात आहे. या सर्व गोष्टींमुळे सायकल कुठल्याही वातावरणात आणि प्रदेशात चालवणं अधिक सोप्प होईल.

अत्याधुनिक सायकल ही डिजिटल असेल. सायकलचा वेग तपासणे, रस्ता रेकॉर्ड करणे, किती अंतर कापले, चढ-उतार यांची नोंद ठेवणे, कॅलरीज बर्न झाल्याची नोंद यांसारख्या असंख्य गोष्टी सायकलला असलेल्या डिजिटल मशीनमध्येच रेकॉर्ड होतील. अत्याधुनिक सायकली नेमक्या कधी बाजारात येतील हे अद्याप निश्चित नाही. मोठय़ा सायकल कंपन्यांच्या प्रदर्शनांमध्ये किंवा इंटरनेटवर फोटो किंवा व्हिडीओ स्वरूपात त्याची झलक पाहायला मिळते. तरी नजीकच्या भविष्यात त्या प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसतील आणि आपल्याकडेही ती असेल अशी आशा करायला हरकत नाही.

prashant.nanaware@expressindia.com