15 December 2017

News Flash

जायचं, पण कुठं? : गोकर्ण

कर्नाटकातील या देवभूमीत अजूनही काही मठ तसेच घरातून संस्कृत शिकवले जाते.

सोनाली चितळे | Updated: July 19, 2017 6:40 AM

Gokarna Tourism,

गोकर्णचा शब्दश: अर्थ गायीचा कान. कर्नाटकातील गंगावली आणि अघनाशिनी नद्यांच्या संगमावर गोकर्ण आहे. सहज पाहता त्याचा आकार कानासारखा दिसतो. हा परिसर हिंदूंचे देवस्थान आहे. इथे अनेक छोटय़ा-छोटय़ा मंदिरांचा समूह आहे. अतिप्राचीन महाबळेश्वर मंदिरात शंकराच्या आत्मिलग स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक इथे येतात. हे आत्मिलग साक्षात शिवशंकराने रावणाला दिले होते, असा समज आहे. त्याच्या बाजूलाच गणेश मंदिर आहे.

कर्नाटकातील या देवभूमीत अजूनही काही मठ तसेच घरातून संस्कृत शिकवले जाते. विद्यार्थी गुरुगृही राहून ज्ञानार्जन करीत असतात. देवदर्शनासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध असलेले गोकर्ण; साधारणपणे गेल्या दहा वर्षांपासून पर्यटन केंद्र  म्हणून विकसित होत गेले. अतिशय शांत, स्वच्छ असलेले समुद्रकिनारे आणि अघनाशिनी नदीकिनारचा नयनरम्य परिसर प्रथम विदेशी तरुणांनी हेरून ते कमी खर्चात मजेत इथे येऊन राहात असत. नंतर हळूहळू अन्य पर्यटक येऊ लागले.

येथील कुढे बीचवर तर भारतीय लोकांपेक्षा विदेशी लोकं जास्त दिसतील. अनेक शांत समुद्रकिनारे, खरखरीत वाळू, शंख-िशपले, नारळ-केळीच्या बागा, यामुळे गोकर्ण आता समुद्र-पर्यटनासाठी जास्त ओळखले जाते. आपण गोव्यात तर नाही ना असे नक्की एकदा तरी इथे वाटून जाते. या ठिकाणी सर्फिग शिकण्याचे केंद्र आहे; ज्यामुळे समुद्रात सर्फिगची मजा अनुभवता येते. योग केंद्र, ओम बीच, पॅराडाइज बीच, मिर्जन किल्ला आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. सगळ्या गडबडीत गोकर्णातील मूळ नीरव, शांत वातावरण कुठे तरी हरवत चालल्यासारखे वाटते.

कसे जाल?

मॅंगलोर, बेंगळूरु, हुबळी, मडगाव तसेच अन्य ठिकाणाहून बससेवा उपलब्ध आहेत. अंकोला हे  जवळचे रेल्वे स्थानक आहे.

sonalischitale@gmail.com

First Published on July 19, 2017 2:16 am

Web Title: gokarna tourist places