News Flash

आडवाटेवरची वारसास्थळे : गिरवीचा गोपालकृष्ण

काही ठिकाणे अगदी छोटीशी जरी असली तरी ती त्या ठिकाणच्या काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टींमुळे महत्त्वाची ठरतात.

काही ठिकाणे अगदी छोटीशी जरी असली तरी ती त्या ठिकाणच्या काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टींमुळे महत्त्वाची ठरतात. मग त्या गोष्टी म्हणजे काही नैसर्गिक चमत्कार असतात किंवा एखादी दंतकथा असते किंवा एखादी देखणी आणि आगळीवेगळी मूर्ती तरी असते. अगदी असंच आहे गिरवी या गावाचं. इथे असलेल्या गोपालकृष्ण मंदिरातील कृष्णाची मूर्ती अत्यंत सुंदर तर आहेच; परंतु तिच्या पाठीमागे, म्हणजे ती मूर्ती तयार होण्यामागे एक कथा आहे. आणि म्हणूनच फलटणच्या जवळ असलेले हे ठिकाण मुद्दाम भेट देण्याजोगे आहे. फलटणपासून दक्षिणेला १२ किलोमीटरवर असलेल्या कदमची गिरवी गावात प्राचीन असे गोपालकृष्णाचे सुंदर मंदिर आहे. इथले वैशिष्टय़ म्हणजे इथली श्रीकृष्णाची धेनुसहित असलेली देखणी मूर्ती. मंदिराभोवती दगडी चुनेगच्ची असलेला तट व त्या सभोवतालच्या ओवऱ्यांवर आदिलशाही वास्तुरचनेची छाप दिसते. मंदिरातील मूर्ती धेनुसहित गोपाळकृष्णाची असून ती एकाच अखंड शिळेतून घडवलेली आहे. या मूर्तीचा इतिहास मोठा रंजक आहे. देशपांडे घराण्यातील सत्पुरुष श्री. बाबुराव देशपांडे यांना एका अद्भुत घटनेद्वारे या मूर्तीचा लाभ झाला. त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार माढा गावात जमिनीतून मिळालेला पाषाण गिरवी या गावी आणण्यात आला. परंतु मूर्ती घडवण्यासाठी कोणी कारागीर मिळेना. एके दिवशी त्यांच्याकडे दोन कारागीर आले आणि त्यांनी मूर्ती घडवण्याचे मान्य केले. एक कारागीर आंधळा होता तर दुसरा हात नसलेला होता. बाबुराव बुचकळ्यात पडले. पण निदान कार्य तरी मार्गी लागेल म्हणून त्यांनी त्या कारागिरांना मूर्ती घडवण्याचे काम सोपवले. त्या दोघांची अट एकच होती की त्यांना स्वतंत्र जागा देण्यात यावी, त्यांचे जेवण ते स्वत: तयार करतील आणि मूर्ती तयार होईपर्यंत ती पाहायला कोणीही येऊ नये. ही अट अर्थातच मान्य करण्यात आली. कोठेही जोड न लावता चार फूट उंचीची अप्रतिम मूर्ती घडवली गेली.
एका पायावर कृष्ण उभा असून दुसरा पाय देहुडा आहे. सदर मूर्ती साकारल्यावर ते दोन्ही कलाकार आंघोळ करून येतो असे सांगून जे गेले ते गायब झाले. परत आलेच नाहीत, अशी दंतकथा आहे. असे हे सुंदर मूर्ती असलेले मंदिर फलटणच्या अगदी जवळ आहे. ही मूर्ती आणि मंदिर खास बघण्याजोगे आहे.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 6:32 am

Web Title: gopala krishna temple
Next Stories
1 लोक पर्यटन : चारठाण्याचे वारसा वैभव
2 वर्षां भटकंती
3 सौंदर्य दीपमाळांचे
Just Now!
X