भटकंतीमधले अवचित लाभलेले सवंगडी म्हणजे अनुभवाची नवी शिदोरीच. कोणतीही अपेक्षा न बाळगता पायथ्यापासून आपली साथसोबत करणारी ही पोरं कित्येक ट्रेकचे अविभाज्य भाग झाली आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत बसलं की अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं एक नवं निरागस तरीही रांगडं जग अनुभवायला मिळतं. आपल्या चालीहून थोडी अधिकच चपळ चाल, आपल्या पुढं पुढं राहून डोंगराच्या प्रत्येक कोपऱ्यात काय काय दडलंय हे कौतुकानं दाखवायची यांची हौस!

सहसा सुट्टीच्या दिवशी गुरांमागं फिरणारी ही पोरं आपल्यात कधी मिसळून जातील याचा नेम नाही. कधी जाळीतून ओंजळभर करवंदं पानांच्या द्रोणात आणून पुढय़ात ठेवतील तर कधी कुठं तरी लपवून अढीला लावलेले चार रसरशीत आंबे हातात देतील. फांद्यांना हिसके देऊन जांभळांचा पाऊस पाडतील तर कधी आंबोळ-तोरणांचा सडा घालतील. एखादी खास निवांत आरामाची जागा दाखवतील तर कधी एखादं मधुर पाण्याचं टाकं दाखवतील. एखादं रानफूल हातात देतील तर कधी चार काजव्यांच्या चांदण्या नितळ पिशवीत घालून आणतील. कधी पोळ्याचा ताजा मध तर कधी बिळांत काडय़ा घालून रसरसलेली खेकडं काढून भाजून खाऊ घालतील. बाप कुठं कामाला जातो, आय कशी पाठीत धपाटे घालते, शाळेतला मास्तर कसा डुलक्या काढतो, समोर दिसणाऱ्या प्रत्येक डोंगराचं नाव काय आहे, यंदाच्या जत्रेला काय काय मज्जा केली, अशी विषयांना कमी नसते. आपण फक्त त्यांना एकदा बोलतं करायचं. आपल्या आणलेल्या शिदोरीतून चार घास खाऊ घाला, अगर न घाला, पण हे मात्र आपल्या कोवळ्या अनुभवांची शिदोरी आपल्यासमोर सोडणार हे नक्की. चार पसे खाऊला दिले तर एक वेळ घेणार नाहीत, पण गोष्टींची पुस्तकं, एखादं नवं पेन, नवी कोरी वही, एखादं खेळणं, छान रंगीत चपला यांच्यासाठी आठवणीनं घेऊन जा.

जुन्नरजवळ पुणे आणि नगर जिल्ह्यच्या सीमेवरील किल्ले निमगिरी आणि हनुमंतगडाच्या भटकंतीदरम्यान असेच काही सवंगडी गड फिरून दाखवत असताना अमृतासमान पाण्याच्या टाक्याशी आणि ढगांनी भरलेल्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर टिपलेला एक क्षण.

pankajzarekar@gmail.com