लडाखी संस्कृतीचे खरे रंग अनुभवायचे असतील तर तिथल्या अतिथंड हिवाळ्यातील गोम्पा महोत्सवांना नक्की भेट द्यायला हवी. हिमालयातल्या बर्फाच्या पांढऱ्या कॅनव्हासवर उमटणाऱ्या या फेस्टिवल्सच्या गहिऱ्या रंगांना कशाचीच सर नाही. लडाखच्या पर्यटन हंगामाच्या अगदी विपरीत अशा हिवाळ्यात उणे १८ च्या थंडीत लेहच्या जवळच्या स्टोक आणि माठो या दोन गोम्पांचे महोत्सव आयोजित केले जातात. गोम्पाच्या मुख्य चौकात केल जाणारे मुखवटा नृत्य हा त्याचा एक महत्त्वाचा भाग.