१८८० च्या दरम्यान पहिल्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि नंतर संपूर्ण युरोपमध्ये आवश्यकतेनुसार सायकलसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उभारल्या गेल्या. अलीकडच्या काळात तर सायकलिंगचे वाढलेले महत्त्व लक्षात घेता सायकलसाठीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती हा शहराच्या नियोजनाचा भाग झाला आहे. सायकलस्वारांसाठी वेगळे ट्रॅक, सिग्नल व्यवस्था, पाìकग, नियम, कायदे आणि आवश्यक प्रशिक्षणाचा त्यामध्ये समावेश असतो. एवढेच नव्हे तर लहानपणापासूनच सायकलिंगबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. युरोप आणि अमेरिकेत गेल्यावर आपल्याला त्याचा पावलोपावली प्रत्यय येतो. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकलस्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पाìकगची आखणी केली जाते.

भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मात्र देशात सायकलसाठी म्हणून काही विशेष पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे फारसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. सायकलिंगबद्दलचे प्रेम वाढत आहे याबाबत शंका नाही. परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.

स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत.

नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणाऱ्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो.

टोकियो शहरामध्ये जमिनीखाली सायकल पाìकगतळाची निर्मिती करण्यात आली असून दोनशे सायकल पार्क करण्याची सुविधा आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा हा उपाय सरस आहे. जर्मनीमध्येही जुन्या रेल्वे ट्रॅकवर तब्बल नव्वद किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारणीचे काम सुरू आहे.

प्रशांत ननावरे

prashant.nanaware@expressindia.com