18 January 2018

News Flash

सिंहलद्वीपावरील जाफना किल्ला

एकूण ५५ एकर क्षेत्र व्यापणारा जाफना फोर्ट श्रीलंकेतला दुसरा मोठा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.

सुदर्शन कुलथे | Updated: June 14, 2017 4:10 AM

एकूण ५५ एकर क्षेत्र व्यापणारा जाफना फोर्ट श्रीलंकेतला दुसरा मोठा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतीयांच्या मनातला श्रीलंका म्हणजे रावणाची राजधानी. परंतु, श्रीलंकेतल्या हिरव्या निसर्गसौंदर्यात राहणारी शांत, आतिथ्यशील आणि शिस्तप्रिय माणसे भेटली की श्रीलंकेविषयी असलेली आसुरी भावना निघून जाते आणि तिथली पर्यटनस्थळे खुणावू लागतात. त्यातलेच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे जाफना किल्ला.

भारताच्या दक्षिण भागापासून अगदी थोडक्याच अंतरावर सुटावलेले एक स्वतंत्र मोठे बेट म्हणजेच श्रीलंका देश. भारतीयांच्या मनातला श्रीलंका म्हणजे रावणाची राजधानी. परंतु श्रीलंकेतल्या हिरव्या निसर्गसौंदर्यात राहणारी शांत, आतिथ्यशील आणि शिस्तप्रिय माणसे भेटली की श्रीलंकेविषयी असलेली आसुरी भावना निघून जाते! विषुववृत्तीय भागात येण्याने वर्षभर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे सदाहरित जंगलांनी आच्छादित हा देश गुगल मॅपवरून बघताना संपूर्ण गर्द हिरवा दिसतो. म्हणूनच लंकेला ‘पाचूचे बेट’ असेही संबोधतात. ६५,६१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेला श्रीलंका म्हणजे आकाराने महाराष्ट्राच्या मराठवाडय़ाएवढा. पण इतक्याशा भूभागात छोटे-मोठे असे सुमारे २५ हजार तलाव, ३५० जलप्रपात, पाच लाख एकरांवर चहाच्या बागा, ६१ वन्यजीव अभयारण्ये, २६ राष्ट्रीय उद्याने, सुमारे ४००० प्रजातीच्या वनस्पतींनी सजलेली आणि ३०० एकर परिसर व्यापणारी बॉटॅनिकल गार्डन्स् आणि १३४० किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे.

‘श्रीलंका’ हे नाव सन १९७२ पासून प्रचलित झाले. त्याआधी ‘सिलोन’ नाव असणाऱ्या या बेटाचा इतिहासही प्राचीन आहे. ठळकपणे सापडणाऱ्या इतिहासात भारत आणि सिलोनचे अनेक धागे जुळताना दिसतात. इ.स. पूर्व ५४३ मध्ये बंगालच्या रार प्रांतातून विजय सिंह नावाच्या राजपुत्राने श्रीलंकेत ‘सिंहला’ राजवंशाची परंपरा सुरू केली. सुमारे १९० राजांनी ही वंशपरंपरा चालविली ती थेट इ.स. १८१५ पर्यंत. ब्रिटिशांनी ही राजवट संपवली. त्यानंतर ४ फेब्रुवारी १९४८ साली सिलोन ब्रिटिशांच्या आधिपत्यातून स्वतंत्र झाला. दरम्यान, सम्राट अशोकाचा पुत्र अरहन्त मिहदा (मिहद्र) आणि पुत्री संघमित्रा यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्म आणला. त्यामुळे प्रथम हिंदू असणारी ही राज्ये इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून बौद्ध प्रभावाखाली आली. आज बेटावर प्राचीन बौद्ध लेणी, शिल्प, मंदिरे आणि भल्यामोठय़ा आकाराचे स्तूप जागोजागी बघायला मिळतात. येथे उत्तमरीत्या जतन आणि संवर्धन केलेली अशी एकूण आठ युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसास्थळे आज पर्यटकांच्या यादीत अग्रक्रमाने येतात.

श्रीलंकेतील उत्तर प्रांतात ‘जाफना’ म्हणून महत्त्वाचा भाग आहे. जाफना हे जिल्ह्यचे ठिकाण असून मुख्यत तामिळी-हिंदू लोकांचे या भागात प्राबल्य आढळते. भारतीयांनी कुख्यात प्रभाकरनच्या ‘एलटीटीई’च्या (लिट्टे) माध्यमातून जाफना हे नाव या न् त्या कारणाने ऐकलेले असते. या जाफना भागात समुद्राला लगटून एक किल्ला आहे. हा जलदुर्ग जाफन्याचा ‘डच फोर्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. इ.स. १६१९ मध्ये पोर्तुगीजांनी ‘जाफनापट्टनम्’ भागात किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. पोर्तुगीजांकडून जाफना किल्ला बांधून पूर्ण होत नाही तो इ.स. १६५८ साली डचांनी तो जिंकला. त्या वेळी पोर्तुगीजांचा गव्हर्नर ‘युवआन डिमेलो’ याच्या ताब्यातून डच सेनेचा मेजर ‘इयान वान्डरलाण्ट’ याने एकही गोळी न झाडता हा किल्ला अलगद ताब्यात घेतला. डचांनी त्यांच्या पद्धतीने किल्ल्याच्या संरचनेत बदल केले. अनेक वास्तूंची त्यात भर घातली. पंचकोनी चांदणीचा आकार असणाऱ्या या किल्ल्याच्या तटात अजून काही त्रिकोणाकार तटबंदी घालून मजबुतीकरणाचे काम केले. डचांनी इ.स. १६८० मध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर हा किल्ला ‘डच फोर्ट’ म्हणून नावारूपास आला.

एकूण ५५ एकर क्षेत्र व्यापणारा जाफना फोर्ट श्रीलंकेतला दुसरा मोठा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूने समुद्राला लागून आहे. संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीभोवती पाण्याचा खंदक फिरवलेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आजही सुस्थितीत असून त्यावर १६८० साल ठळकपणे दिसून येते. मुख्य प्रवेशद्वारात पोर्तुगीज पद्धतीची पहारेदाराची चौकी दिसते. अशा चौक्यांना ‘बाíतझन’ असे म्हणतात. आतमध्ये पंचकोन आकारातली जाड आणि उंच अशी तटबंदी बांधलेली असून त्याच्या पाचही कोनांवर बाणाकृती त्रिकोणी आकाराचे पाच बुरूज आहेत. अगदी तंतोतंत पंचकोनी भौमितिक लेआऊट असलेला यासारखा दुसरा किल्ला श्रीलंकेत बघायला मिळत नाही. आकाराने मोठे आणि काळ्या रंगाच्या प्रवाळाचे चिरे बनवून तटबंदीच्या कामात वापरलेले दिसून येतात. किल्ल्याच्या आतमधल्या तटबंदीवरून गस्त घालण्यासाठी रुंद असा मार्ग आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अजूनही काही द्वारे आहेत. खंदकाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या कोटाच्या रचनेत तटाच्या आतून जाणारी पाच भुयारे आहेत. ही भुयारांची रचना शत्रूला चकविणे आणि थांबण्यासाठी महत्त्वाची ठरत असे. आजही या भुयारांमधून हिंडताना कमालीचा रोमांच वाटतो. डच काळात महाराणीचा महाल, राजाचा महाल, चर्च, दारूगोळ्याचे कोठार, सनिकांच्या बराकी, उद्यान, सनिकी मदान अशा अनेक वास्तू आणि ठिकाणे जुन्या नकाशावरून आजही ओळखता येतात. परंतु यातली एकही इमारत आज पूर्णपणे अस्तित्वात नाही. श्रीलंकेतील दीर्घकाळ चाललेल्या अंतर्गत युद्धामध्ये किल्ल्यातील सर्व वास्तूंची पडझड आणि नासाडी झाली आहे. किल्ल्याच्या बाहेरच्या आवारात राजवाडासदृश एक जुनी डच इमारत तत्कालीन वास्तुस्थापत्याची झलक दाखवत आजही उभी आहे. किल्ल्याच्या जवळच असलेले हल्लीचे नल्लूर कंडास्वामी मंदिर आणि जाफना पब्लिक लायब्ररी हे आवर्जून भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.

अनेक हुकमती पाहिलेल्या जाफना किल्ल्याला इ.स. १७९५ मध्ये ब्रिटिश राजवटीने त्यांच्या अखत्यारीत घेतला. इ.स. १९४८ ला ब्रिटिशांकडून स्वतंत्र श्रीलंका सरकारने किल्ल्याचा ताबा घेतला; परंतु सन १९७५ पासून स्वतंत्र तामिळ प्रदेशाची मागणी करणाऱ्या लिट्टे संघटनेने जाफना परिसरात त्यांची हुकमत आणि कारवाया सुरू ठेवल्या. सन १९८३ ते १९९५ या काळात लिट्टेनी जाफना किल्ल्याला केंद्र बनवून लंका सरकारविरोधी दहशतवादी कृत्ये केली. सन १९९५ ला श्रीलंका सन्याने तब्बल ५० दिवस जाफना किल्ल्याला वेढा घातला आणि या निर्णायक लढय़ात लिट्टेचा पराभव केला. या धामधुमीत किल्ल्याचे वास्तुवैभव नष्ट झाले. अनेक राजवटींनी आधिपत्य गाजवले आणि निघून गेले. परंतु त्यांच्या आठवणी सांगत आज उरलाय तो स्वतंत्र ‘जाफना फोर्ट’.

सुदर्शन कुलथे sudarshan.kulthe@gmail.com

First Published on June 14, 2017 4:10 am

Web Title: jaffna fort built by the portuguese in sri lanka
  1. M
    MAHESH
    Jun 27, 2017 at 12:40 pm
    छान माहिती. धन्यवाद.
    Reply