News Flash

वन पर्यटन : काटेपूर्णा

८ फेब्रुवारी १९८८ ला या वनाला राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला.

काटेपूर्णाचा विस्तीर्ण जलाशय, मावळतीचा सूर्य, त्याचं पाण्यावर पडलेलं प्रतिबिब आणि लाल केशरी रंगाने न्हाऊन निघालेला आसमंत तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडतो. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं हे नितांतसुंदर रूप आपण डोळे भरून मनात साठवतानाच सोबतीचा पक्ष्यांचा किलबिलाट आपला आनंद द्विगुणित करतो. निसर्गाचं एक अदृश्य संगीत तुमच्या कानातून मनात साठत जातं. झाडांच्या पानांमधून पाण्यात उतरणारं हे िबब इतकं देखणं दिसतं की, आपण तहानभूक विसरून त्याकडे पाहत राहतो.

शांत जलाशयावर डोलणारं हे सूर्यिबब मग हळूहळू दिसेनासं होतं. तरी पुन्हा ते सारखं सारखं डोळ्यांसमोर असावं असं वाटू लागतं. उगवतीच्या आणि मावळतीच्या सूर्याबरोबर तुम्हाला काटेपूर्णा ओढ लावतं ते इथल्या समृद्ध जैवविविधतेने.

८ फेब्रुवारी १९८८ ला या वनाला राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला. एकूण ७३.६९० चौ.कि.मी.चं हे क्षेत्र काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य म्हणून अस्तित्वात आलं. अकोला जिल्ह्य़ात काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेलं हे अभयारण्य आपल्याला निसर्गपर्यटनाचा मनमुराद आनंद देणारं वन आहे. जैवविविधतेने संपन्न आहे आणि अकोला शहरापासून साधारणत: ३५ कि.मी. अंतरावर असल्याने (बार्शी टाकळीमाग्रे हे अंतर तर फक्त ३२ कि.मी. आहे) एक दिवसाच्या छोटेखानी सहलीसाठी स्थानिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. पावसाळी पर्यटन हे इथलं खास आकर्षण. महादेव मंदिराच्या बाजूने असलेला महादेव धबधबा आणि पर्यटक यांचं एक अनोखं नातं इथं निर्माण झालं आहे. इथला हिरवाकंच निसर्ग, निसर्गवाटा मनाला साद घालत राहतात. पावसाळ्यातलं अभयारण्याचं रूप मंत्रमुग्ध करणारं आहे.

काटेपूर्णा जलाशयावर पक्ष्यांचा मुक्त वावर असल्याने पक्षीप्रेमींसाठीही हे ठिकाण एक आकर्षणाचा भाग राहिलं आहे. अभयारण्यात प्रवेश करताच वाघा निसर्ग परिचय केंद्र आपलं स्वागत करतं. पाच दालनांमध्ये विभागलेल्या या केंद्रात अभयारण्यातील वन्यजीव, वृक्ष-वेली, पक्षी, इथली स्थानिक लोकसंस्कृती सचित्रपणे रेखाटण्यात आली आहे. पुढे साधारणत: दोन कि.मी.ची सुंदर अशी निसर्ग पायवाट आहे. पक्षीनिरीक्षणासाठी येथे उंच मनोरे उभे करण्यात आले आहेत. पाऊलवाटेला लागून असलेला भलामोठा जलाशय आपलं लक्ष वेधून घेतो. हा जलाशय आणि लागून असलेली वृक्षदाटी यामुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे मनोहारी दर्शन आपल्याला होतं. हा जलाशय आणि येथील पाणथळ जागा पक्ष्यांचे आश्रयस्थानच बनल्या आहेत. जवळपास दीडशे प्रजातींचे पक्षी येथे आढळून येतात. स्वर्गीय नर्तक, नवरंग, मोर, घुबड, तितर, खंडय़ा, पाणकोंबडी, टकाचोर यांसारखे अनेक पक्षी आपण इथं पाहू शकतो. काटेपूर्णा ही नदी अभयारण्याच्या मध्यातून वाहते.

हे वन दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीची वने या प्रकारात मोडते. वनात जवळपास ६० टक्के सागाचे वृक्ष आहेत, तर उर्वरित ४० टक्क्यांमध्ये इतर वृक्षसंपदा आहे. पिवळवेल, धामणवेल, गुळवेलसारखी वेलवर्गीय प्रजाती, तर मारवेल, कुसळी, पवन्या, कुंदा अशा गवत प्रजातीदेखील येथे आढळतात. अभयारण्यात बिबटय़ा, अस्वल, खवले मांजर, लांडगा, रानमांजर, तडस, कोल्हा, रानडुक्कर, नीलगाय, भेडकी मसन्या उद, चौसिंगा, चिंकारा अशा वन्यजीवांचं दर्शनही घडतं. पावसाळ्यात अभयारण्याचं रूप विलक्षण मोहून टाकतं. प्राचीन महादेव मंदिराशेजारी असलेला महादेव धबधबा पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे. घारीचा आसोडा, चौफुला यांसारख्या ठिकाणी गेल्यानंतर वन्यप्राण्यांचं दर्शन मिळण्याची शक्यता अधिक वाढते. येथे दोन लपणगृहे आहेत.

काटेपूर्णा अभयारण्यात आता नेचर ट्रेलला जंगल सफारीची जोड मिळत आहे. कासमार, चाका लपणगृह, रिव्हर व्ह्य़ू, चिचबन फेट्रा, पांडव लेणी पॉइंट, रिव्हर पॉइंट, चौफुला अशी जवळपास २० कि.मी.ची जंगल सफारी अभयारण्याची समृद्धता दाखवणारी आहे. हे वनपर्यटनाचे एक उत्तम ठिकाण आहे. काटेपूर्णा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, तेथे वावरणारे पक्षी यामुळे इथल्या इको टुरिझमला खूप चालना मिळत आहे. काटेपूर्णा अभयारण्यातील वनपर्यटनाला उत्तम सेवा व सुविधा देण्यासाठी वाघा, फेट्रा, धोतरखेडा, रुई, देवदरी, गावांतील ग्राम परिसर विकास समितीचं सहकार्यही महत्त्वाचं आहे.

कसे जाल? केव्हा जाल?

  • सर्वात जवळचं विमानतळ नागपूर. जवळचं रेल्वे स्टेशन अकोला- साधारणत: ४० कि.मी. अंतरावर.
  • भेट देण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते जून.
  • मचाण अ‍ॅडव्हेंचर नावाची एक कल्पना येथे राबविली जाते. जंगल नाइट इन ब्ल्यू मून लाइट असं तिचं वर्णन केलं जातं.

drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:19 am

Web Title: katepurna dam katepurna wildlife sanctuary
Next Stories
1 भुवनेश्वरची देखणी मंदिरे
2 वन पर्यटन : लोणार वन्यजीव अभयारण्य
3 फेस्टिव्ह टुरिझम : राजस्थानचे महोत्सव
Just Now!
X