News Flash

कोणार्कचे सूर्य मंदिर

सम्राट अशोकने कलिंग देशावर म्हणजे आताच्या ओरिसावर केलेल्या स्वारीला कलिंग युद्ध म्हटले जाते.

73-lp-konark-sun-templeओरिसा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते कोणार्कचं भव्य सूर्य मंदिर. तेराव्या शतकात हे मंदिर बांधण्यासाठी १२०० मजूर बारा वर्षे झटत होते. स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असं हे मंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे.

बंगालच्या उपसागरावर ४८५ किमी लांबीची किनारपट्टी असलेले भारताच्या २९ राज्यांपैकी पूर्वेकडील एक, असे ओरिसा राज्य. बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार यांच्याशीही सीमा जोडून आहे. ऐतिहासिक काळी हे कलिंग राज्य म्हणून प्रसिद्ध होते. सम्राट अशोकने कलिंग देशावर म्हणजे आताच्या ओरिसावर केलेल्या स्वारीला कलिंग युद्ध म्हटले जाते. पण त्यावेळी झालेला रक्तपात, जीवित हानी त्यामुळे अनाथ झालेली जनता पाहून त्याच्या मनावर परिणाम झाला व त्याने ख्रिस्तपूर्व २६१मध्ये बुद्ध धर्म स्वीकारला.

तद्नंतर ओरिसावर खारवेल या जैन राजाने राज्य केले. पुढे गंगा घराणे, बंगालची सुलतानशाही होती. इंग्रज कारकीर्दीत कंपनी सरकारने कटक येथे राजधानी केली. पण आपल्या स्वातंत्र्यानंतर राजधानी भुवनेश्वर येथे हलवली. तत्पूर्वी जर्मन स्थापत्यकाराने या शहराची आखणी केली होती. जमशेदपूर व चंदिगडप्रमाणे भुवनेश्वर हेदेखील एक प्लान्ड सिटी म्हटले जाते.

श्रीमद् आदि शंकराचार्यानी चार दिशांना स्थापलेल्या क्षेत्रांना धाम म्हणतात. ही चार धामं म्हणजे उत्तरेला बद्रीनाथ, पूर्वेला पुरी, द्वारका पश्चिमेला व दक्षिणेला रामेश्वर. यावेळी पुरीचे जगन्नाथ मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर अशी फेरी केली. ही मंदिरे १२व्या शतकातल्या कलिंगकालीन कृती आहे. एक सूर्य मंदिर सोडले तर इतर देवळांत हिंदू धर्माखेरीज कोणत्याही धर्माच्या लोकांना प्रवेश नाही. देऊळ पाहण्यासाठी बाहेर त्यांच्यासाठी गच्ची आहे. आवारापासूनच मंदिराचे फोटो घेण्यास मनाई असल्याने कोणत्याही देवस्थानाचे फोटो मिळाले नाहीत.

पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे विश्वकर्मा विष्णूचे तर श्रीकृष्ण त्याचा अवतार. आपला प्रवेश पूर्वेकडील सिंह द्वार येथून होतो. तिथेच कोणार्क सूर्य मंदिरातून आणलेला अरुण स्तंभ आहे. जगन्नाथ मंदिरात आपल्याला श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रा या भावंडांच्या खास अशा कडूनिंबाच्या झाडापासून बनलेल्या लाकडी मूर्ती पाहायला मिळतात. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे डोळे लाल, पांढरा व काळ्या रंगाचे आहेत, तर हात अगदी जिवणीच्या लगतच सुरू आहेत. श्रीकृष्णाच्या दोनही बाजूंना महालक्ष्मी म्हणजेच रुक्मिणी व सत्यभामा आहेत. मधे सुभद्रा व पुढे बलराम उभे आहेत.

आषाढ महिन्यात येथील रथयात्रा पाहण्यासाठी जगभरातून सर्वधर्मीय येतात. तीनही देवतांचे रथ वेगळे असतात. दरवर्षी नवा रथ असतो. तोसुद्धा लाकडी. यात्रा देवळापासून सुरू होऊन गुंडीच्या (मावशीच्या) देवळापर्यंत असते व दोन दिवसांनी परतात. दर बारा वर्षांनी सर्व मूर्ती नव्याने बनतात. जुन्या मूर्ती आवारात मागील बाजूस पुरतात.

भुवनेश्वरचे लिंगराज देऊळ शंकर व विष्णू या देवांचे आहे. देवळाच्या कळसावर शंख, चक्र, गदा व त्रिशूळ असे मिळून  चिन्ह आहे. हे स्वयंभू देवस्थान असल्याने गाभाऱ्यात जमिनीतून जरा वर असलेल्या काळ्या दगडाला शंकर ते त्यावरील उंचवटय़ाला विष्णू असे संबोधले आहे. ही दोनही देवालये दगडी असून लिंगराज देवळावरील कोरीव काम अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.

परंतु भुवनेश्वरचे सूर्य मंदिर मात्र अजूनही अप्रतिम आहे. या देवळाविषयीची कथा अशी आहे की, कृष्णाचा मुलगा संबा हा स्त्रियांच्या बाबत लंपट होता. श्रीकृष्णाच्या शापामुळे तो महारोगाने पीडित होता. कटक ऋषींनी त्याला सूर्यदेवाची उपासना केल्यास शापमुक्ती होईल असे सांगितले होते. त्या अनुसार राजपुत्र सांबाने चंद्रभागा नदीकिनारी मित्रवनात १२ वर्षे तप केल्याने शापमुक्त झाला. त्याला चंद्रभागा नदीत सूर्याची मूर्ती मिळाली होती, तिथे सूर्य मंदिराची स्थापना केली. शास्त्रीयदृष्टय़ा पाण्याची पातळी घटल्याने समुद्र मागे हटल्याने आता मंदिर किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे.

74-lp-konark-sun-templeआपण पाहतो ते सूर्य मंदिर १३ व्या शतकात गंगा घराण्यातील राजा नरसिंहदेवाने बांधले आहे. पूर्व-पश्चिम दिशेला सूर्याच्या रथाच्या मंदिराला सात घोडे असून ते आठवडय़ाचे दिवस दर्शवतात, चाकांच्या १२ जोडय़ा ज्या रथ ओढतात त्या वर्षांचे महिने, तर प्रत्येक चाकाला आठ आरे असून ते दिवसाचे आठ प्रहर दाखवतात. सूर्याचे पहिले किरण आऱ्याच्या मध्यावर पडून सावली वेळेनुसार प्रत्येक आऱ्यावर येते. त्यावेळेनुसार दिनचर्या कशी असावी ते दाखवले आहे. उदा. सकाळ ते दुपापर्यंतची कामे, थोडी वामकुक्षी, त्यानंतर विहार व दिवेलागणीनंतर रात्रीची कामे ह्य सर्वाचे कलात्मकरीत्या चित्रण केले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी त्याकाळी १२०० मजूर बारा वर्षे काम करत होते.

आवारात प्रवेश केल्यावर थोडय़ा पायऱ्या चढून आपण नट मंदिरात येतो. पूर्वी हे भोग मंडप होते. तेथे एक लहानसे देऊळ आहे, पण पूजाअर्चा होत नाही. पुढे खुले नट मंदिर झाले असून चारही बाजूंनी जिने आहेत. चार खांबांवर अतिशय सुंदर कोरीव काम आहे. तेराव्या शतकापासून आजतागायत हे उत्तम स्थितीत आहे. ह्या नट मंदिरात डिसेंबर महिन्यात कोणार्क नृत्य महोत्सव साजरा केला जातो. त्यात खासकरून ओडिसी नृत्याविष्कार केले जातात. बरोबरीने इतरही भारतीय नृत्यांचा समावेश असतो.

नट मंदिराप्रमाणेच सूर्य मंदिराच्या प्रवेशावर सिंह कोरलेले आहेत. चौथऱ्यावर तीन स्तरांवर भव्य सूर्य मंदिर आहे. वेगवेगळी शिल्पे आहेत. चौथऱ्याच्या भिंतीवर तळाला हत्ती कोरलेले, त्यावर कामशास्त्रातील शृंगारिक आकृत्या आहेत, तर वरच्या स्तरावर देवादिकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिर प्रवेश सोडून देवळाच्या तीनही दिशांना उगवत्या, माध्यान्ह, मावळत्या सूर्य देवाच्या काळ्या दगडावरील प्रतिमा आहेत. तसेच शंकराचे तांडव नृत्यही चितारले आहे. देवळाची उंची २०० फूट असून एकावर एक दगड रचून बांधणी केली आहे. १७ व्या शतकात बंगालच्या सुलतानाचा फौजदार काळा पहाड याने ओरिसामध्ये फारच नासधूस केली होती. त्यात ह्य देवळाचा समावेश आहेच. गाभाऱ्यातील मूर्ती पुरी येथे नेण्यात आली असे म्हणतात.

75-lp-konark-sun-templeयुरोपियन दर्यावर्दी या जल मार्गाने जाताना पुरीच्या जगन्नाथ मंदिराला व्हाइट पॅगोडा तर कोणार्कच्या सूर्य मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हणत. राजा नरसिंहदेवाच्या राज्यात सूर्य मंदिरावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता. खलाशांच्या सागरी मार्गक्रमणात फार दूपर्यंत होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने इंग्रजांनी तो चुंबकच काढून टाकला. त्यावेळी मंदिराला झालेली इजा व पायादेखील मऊ असल्याने मंदिराचा मध्यभाग कोसळला. आणखीन हानी होऊ नये त्याकरिता मंदिरात दगड, वाळू वगैरे घालून आता मंदिर पूर्णपणे बंद आहे.

मंदिराच्या आवारात सूर्याची पत्नी मायादेवी हिचे मंदिर आहे. मागील बाजूस विविध फुलझाडे आहेत. दुसरीकडे पडलेले लोखंडाचे भक्कम खांब राजा नरसिंहाच्या काळातले आहेत असे म्हणतात. शेकडो वर्षांनीही देवळाच्या शिल्पकलेवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सूर्य मंदिराला युनेस्कोने जागतिक वारशाचा मान दिला आहे. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी हे मंदिर अतिशय सुंदर दिसते असे म्हणतात. हवामान ढगाळ असल्याने आम्हाला तो नजारा मिळाला नाही.

76-lp-konark-sun-templeचिलिका लेक हा आपल्या भारतातला सर्वात मोठा लेक आहे. दाया नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते त्या मुखावर हा लेक आहे. ह्यचे क्षेत्रफळ ११०० चौ.कि.मी. आहे. दाया व तिच्या उपनद्या आपल्याबरोबर बराचसा गाळ, वाळू आणतात. त्यामुळे हा परिसर माशांच्या प्रजननासाठी फारच उपयुक्त आहे. कित्येक कोळी लोकांची उपजीविका तेथील मासळीवरच होते. चिलिका हा फार खोल नसल्याने व खारफुटीची झाडे बरीच असल्याने अगदी रशिया, मोंगोलिया, लडाख अशा दूरवरच्या ठिकाणांहून स्थलांतरित पक्षी मोठय़ा प्रमाणावर येतात. लेकमध्ये बोटीने फिरण्याची सुविधा आहे. त्यावेळी आपण बरेचसे पक्षी पाहू शकतो. सकाळी लवकर गेलो तर लेकमध्ये बऱ्याच अंतरावर डॉल्फिन मासे पाहू शकतो. हवामान खराब असल्याने आम्हाला बगळा, रॅप्टर, सँड पायपर, व्ॉगटेल हेच पक्षी व थोडा वेळ डॉल्फिन्स पाहावयास मिळाले.

असो. परतताना किनाऱ्यावर कोलंबी, खेकडे व शेवंड यांची बंगाली पाककृती खाऊन आलो. बघू या, तेथे परत कधी जाऊ ते.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:02 am

Web Title: konark surya mandir
टॅग : Paryatan
Next Stories
1 चेंगीझ खानचे खाराखोरीन्
2 पर्यटन : गोबीचे रण
3 बार्सिलोना
Just Now!
X