ट्रॅव्हलवाल्यांची गाडी, अशी सुरुवातीच्या काळातली ओळख पुसून टोयोटा इनोव्हा आता घरातली एक गाडी बनली आहे. आता तर टोयोटाने इनोव्हाचे आणखी पुढील मॉडेल बाजारात आणले आहे. शक्तिशाली इंजिन, प्रचंड ताकदवान गाडी आणि गाडीत आरामदायक अनुभव यांमुळे नवीन इनोव्हा क्रिस्टा भारतीय बाजारपेठेत लवकरच आपलं स्थान निर्माण करेल यात शंका नाही. ही गाडी रस्त्यावरून जाताना आसपासचे लोक माना वळवून वळवून गाडीकडे बघतात, हीच या गाडीला मिळालेली भारतीयांच्या पसंतीची मोठी पावती आहे.

टाटा कंपनीच्या सुमो गाडीला टक्कर देण्यासाठी टोयोटाने दोन दशकांपूर्वी क्वालिस ही गाडी बाजारात आणली. या गाडीने टोयोटाला भारतीय बाजारपेठेत नवीन ओळख मिळवून दिली. ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्यांकडून या गाडीला नेहमीच मागणी होती. हळूहळू क्वालिसचा जमाना मागे पडला आणि टोयोटाने काळाची पावलं ओळखून २००५च्या सुमारास इनोव्हा ही गाडी बाजारात उतरवली. या गाडीने क्वालिसची जागा घेतलीच, पण त्याचबरोबर मल्टी पर्पज व्हेइकल म्हणजेच एमपीव्ही श्रेणीतील गाडी घराघरात पोहोचवण्याचं श्रेयही याच गाडीकडे जातं.

विशेष म्हणजे ११ वर्षांच्या कालावधीत या गाडीच्या बेसिक मॉडेलची किंमत ६ लाखांनी वाढली आणि तरीही या गाडीला तेवढीच मागणी आहे.

टोयोटाने नुकत्याच लॉन्च केलेल्या इनोव्हाच्या क्रिस्टा या नव्या व्हर्जनमध्ये या गाडीचा वेगळा असा क्लास दिसून येतो. एकीकडे भारतात कॉम्पॅक एसयूव्ही गाडय़ांचं प्रमाण वाढत असताना टोयोटाने एमपीव्ही श्रेणीत नवीन क्रिस्टा उतरवत बाजारपेठेतील स्पध्रेला एक वेगळंच परिमाण दिलं आहे. ही गाडी जेवढी छान दिसते, तेवढाच छान परफॉर्मन्स देते. कशी आहे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा..

गाडीची अंतर्गत सजावट व रचना

बाह्य़रूप जुन्या इनोव्हासारखं असलं, तरी टोयोटाने अंतर्गत रचनेत खूप काही बदल केले आहेत. या बदलांमुळे गाडी आतून खूपच प्रशस्त वाटते. टोयोटा इनोव्हाची ड्रायव्हर्स सीट पूर्णपणे ऑटो अ‍ॅडजस्टेबल असून त्याचे कंट्रोल्स सीटच्या बाजूला दोन बटनांवर दिलेले आहेत. त्याशिवाय उंची कमी असलेल्यांनाही या सीटवर बसल्यावर डॅशबोर्डपलीकडलं व्यवस्थित दिसतं. वाहतूक कोंडीत गाडी चालवताना त्याचा खूप फायदा होतो. तसंच गाडीचा डॅशबोर्डही अत्यंत बोल्ड लुकचा आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेली एकच एक मेटलची पट्टी, बोर्डाच्या मधोमध टच स्क्रीन असलेले इन्फोटेन्मेण्ट पॅनल, स्टिअिरगवर सगळे कंट्रोल्स यांमुळे ही गाडी चालवणं एक सुखद अनुभव ठरतो. गाडी ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही ट्रान्स्मिशन्समध्ये उपलब्ध आहे. गाडीचं ऑटो ट्रान्स्मिशन टोयोटाच्या कोरोला आल्टिस किंवा कॅम्री हायब्रीड या गाडय़ांच्या तोडीचं आहे. गाडीत सात जण आरामात बसू शकतात. सर्वात शेवटच्या सीटवर लेग स्पेसबरोबरच उंचीचीही काहीच अडचण उद्भवत नाही. त्याशिवाय सर्वात मागे बसणाऱ्यांसाठी एसी व्हेण्ट्स दिले असल्याने तोदेखील प्रश्न नाही. गाडीच्या सीट्स मड कलर लेदरच्या असून त्या गाडीच्या आकर्षकपणात भर टाकतात. त्याशिवाय पहिल्या व मधल्या रांगेला व्यापणारी निळ्या दिव्यांची पट्टीही अंतर्गत सजावटीच्या देखणेपणात भर घालते.

सुरक्षा

सुरक्षेचा विचार करता कंपनीने सर्वात उच्च श्रेणीतील मॉडेलला पुढील दोन सीट्सबरोबर मधल्या दोन सीट्सवरील प्रवाशांसाठीही बाजूला एअरबॅग दिल्या आहेत. उच्च श्रेणीतील झेड व्हेरिएण्टमध्ये सात एअरबॅग्ज आहेत. यावरून सुरक्षेची कल्पना करता येईल. त्याशिवाय की लेस एण्ट्री, चाइल्ड लॉक सिस्टीम, ऑटो अडजस्टेबल मिरर, अशा गोष्टीही सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. एबीएस हेदेखील गाडीतील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं फिचर आहे.

सोयीसुविधा

गाडीच्या टॉप एण्ड मॉडेलमध्ये सोयीसुविधांचा खच आहे. गॉगलपासून ग्लोव्हज्साठी खास कम्पार्टमेण्ट्स, प्रत्येक आसनाला दोन बॉटल होल्डर्स, त्याशिवाय दारात कप होल्डर्स, मधल्या व मागील सीट्सवर बसणाऱ्या प्रवाशांसाठी एसी व्हेण्ट्स, टच स्क्रीन इन्फोटेन्मेण्ट पॅनल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जीपीएस नेव्हिगेशन सिस्टम, रीअर वायपर या आणि अशा अनेक सुविधांमुळे गाडीत आरामदायक प्रवासाची हमी मिळते.

डिझाइन आणि लुक्स

गाडीचं डिझाइन जुन्या टोयोटापेक्षा फार वेगळं नाही. तरीही काही ठिकाणी योग्य बदल करत कंपनीने ही गाडी अधिक स्पोर्टी आणि आकर्षक दिसेल, याकडे लक्ष दिलं आहे. गाडीचे कोपरे अधिक उठावदार आणि वळणदार करून गाडीच्या सौंदर्यात कंपनीने भर टाकली आहे. त्याशिवाय सगळ्यात शेवटच्या आसनांबाजूच्या काचा त्रिकोणी ठेवत गाडीला वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या ग्रिलवर दोन आडव्या पट्टय़ा, त्या पट्टय़ांच्या मध्यभागी टोयोटाचा एम्ब्लेम आणि पट्टय़ांच्या दोन टोकांना दोन हेडलाइट्स ही रचना खूपच छान आहे. गाडीचा मागचा भाग जुन्या टोयोटासारखा असला, तरी तो थोडासा वर उचलल्यासारखा वाटतो. त्याशिवाय मागचे लाइट्स बुमरँगच्या आकाराचे असल्याने गाडी थोडीशी जास्त रुंद असल्यासारखी भासते. जुन्या गाडीच्या तुलनेत नवीन टोयोटा क्रिस्टा थोडीशी मोठीच आहे. ही गाडी जुन्या गाडीपेक्षा १८० मिमी लांब, ६०मिमी रुंद आणि ४० मिमी उंच आहे. त्याशिवाय गाडीचं वजनही जुन्या गाडीपेक्षा तब्बल २०० किलोग्रॅमने जास्त आहे. जुन्या टोयोटाला गाडीत चढण्यासाठी फूटरेस्ट देण्यात आलं होतं. या गाडीत फूटरेस्टची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची किंवा गुडघ्याचा त्रास असलेल्यांची गाडीत बसताना किंवा गाडीतून उतरताना थोडी अडचण होते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

गाडीचं इंजिन मॅन्युअल ट्रान्स्मिशनसाठी २.४ लिटर असून ऑटो ट्रान्स्मिशनसाठी २.८ लिटर एवढय़ा क्षमतेचं आहे. पूर्वीच्या इनोव्हाच्या तुलनेत हे शक्तिशाली इंजिन गाडीच्या परफॉर्मन्समध्ये चांगली भर टाकतं. विशेष म्हणजे मॅन्युअल ट्रान्स्मिशनमध्ये पूर्वीच्या इनोव्हापेक्षा गाडीची इंजिन क्षमता ०.१ लिटरने कमी असली, तरी इंजिनचा परफॉर्मन्स खूपच चांगला मिळतो. ० ते १०० किमी हा वेग घेण्यासाठी गाडी फक्त दहा ते १२ सेकंद वेळ घेते. गाडीतील सर्वात उत्तम फीचर म्हणजे इको आणि पॉवर हे दोन मोड्स. शहरात चालवताना किंवा हायवेवरही गाडी इको मोडमध्ये चालवणंच श्रेयस्कर आहे. पण गाडीची खरी ताकद आजमावायची असेल, तर गाडी पॉवर मोडमध्ये चालवून बघायला हवी. पॉवर मोडमध्ये ही गाडी सुस्साट जाते. गाडीचं एक्सलरेशन वाढून वेगही किमान २० ते ३० किमी प्रतितासाने वाढल्याचं जाणवतं. त्यामुळे हे फीचर गाडीच्या एकंदरीत परफॉर्मन्समध्ये भर टाकतं. गाडीत क्रूझ कंट्रोल सेटिंग असल्याने सरळ रस्त्यावर एका विशिष्ट वेगात गाडी लॉक केल्यावर एक्सलरेटरवरचा पाय उचलून मांडी घालून बसायलाही हरकत नाही.

rohan.tillu@expressindia.com