सध्याचे युग तर माहिती-तंत्रज्ञानाचेच आहे. मात्र, हजारो वर्षांपूर्वी जग जिंकण्याच्या इच्छेने झपाटलेल्या अलेक्झांडर द ग्रेटलाही माहितीचे महत्त्व कळले होते. त्यामुळेच इसवीसनपूर्व ३३४ पासून जग पादाक्रांत करताना अलेक्झांडरने तोपर्यंत अज्ञात असलेल्या जागांचा शोध घेऊन त्याची नोंद केली. या माहितीपिपासू वृत्तीने जगाच्या भूगोलाच्या ज्ञानात भर घातली. त्याच्या राजकीय वारसदारानेही ज्ञानाचा वारसा पुढे सुरू ठेवला आणि ग्रंथालय-संग्रहालयामार्फत माहिती आणि संशोधनाला चालना दिली. बिब्लिओथिका अलेक्झांड्रिना हे त्या सर्व वारशाचे संरक्षण संवर्धन करणारे ठिकाण. इसवीसन पूर्व ३०पर्यंत अनेक वेळा आग लागून हे संग्रहालय नष्ट होईपर्यंत म्हणजेच सुमारे तीनशे र्वष हे ठिकाण जगाच्या पुरातन संस्कृतीचे केंद्र होते.

भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या आणि पुरु राजाच्या तडफदार उत्तराने प्रभावित झालेल्या अलेक्झांडरची इतिहासाच्या पाठय़पुस्तकातली ओळख अगदीच त्रोटक असते. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर उभे असलेल्या अलेक्झांड्रियामध्ये फिरताना त्याची नव्याने ओळख होते. हे नगर आता आधुनिक झाले असले तरी तब्बल वीस-पंचवीस हजार वर्षांपूर्वी इथे घडलेल्या इतिहासाचा ठसा आजही कायम आहे. अलेक्झांड्रियामध्ये नव्याने उभारलेल्या, प्रचंड मोठय़ा वास्तुकलेचा अभिजात नमुना म्हणावा अशा बिब्लिओथिका अलेक्झांड्रिना म्हणजे राष्ट्रीय ग्रंथालय पुरातन वारसा पुढे नेऊ पाहतेय.

स्थलदर्शनामध्ये हे ग्रंथालय पाहण्यासाठी दोन तास ठेवलेले पाहून आपली चरफड होऊ शकते. एका ग्रंथालयात असे काय असणार.. शिवाय इजिप्तची इतर प्रगती बघता पाश्चिमात्य देशांप्रमाणे अजस्र ग्रंथालयांची कल्पनाही इथे करता येत नव्हती. मात्र हे ग्रंथालय हे सर्व भ्रम खोटे ठरवतो. आधुनिक वास्तुरचनेच्या अप्रतिम नमुन्यात हजारो वर्षांपूर्वीच्या हस्तलिखितांचा ठेवा पाहण्यासाठी दोन तास अगदीच कमी असल्याचा साक्षात्कार होतो. अलेक्झांड्रियातील पुरातन ग्रंथालयाला उजाळा देणारे आधुनिक ग्रंथालय असावे या कल्पनेतून ही वास्तू उभी राहिली आहे. युनेस्कोने इजिप्तच्या राज्यकर्त्यांची सांस्कृतिक व वैज्ञानिक अभ्यासाचे आधुनिक ग्रंथालय बांधण्याची कल्पना उचलून धरली आणि या केंद्राच्या वास्तुशिल्पासाठी जागतिक पातळीवर स्पर्धा घेण्यात आली. जगभरातील नामवंत वास्तुरचनाकारांनी पाठवलेल्या १४०० आरेखनांमधून सध्याच्या वास्तूरचनेची निवड करण्यात आली. हे सर्व घडले नव्वदच्या दशकात. प्रत्यक्षात आर्थिक मदत गोळा होऊन वास्तू उभी राहायला २००२ वर्ष उजाडले.

तब्बल वीस हजार चौरस मीटर, आपल्या घरांच्या भाषेत सांगायचे तर २ लाख २० हजार चौरस फूट जागेतील या ग्रंथालयात ८० लाख पुस्तके ठेवण्याची क्षमता आहे. मात्र केवळ पुस्तके साठवणे एवढेच या वास्तूचे वैशिष्टय़ नाही. वाचनालयासोबतच चार संग्रहालय (यात पुरातन वास्तू आणि हस्तलिखितांचा समावेश आहे), चार आर्ट गॅलरी, १५ कायमस्वरूपी प्रदर्शनं असे बरेच काही या वास्तूत आहे. काचेचे छत असलेल्या या वास्तूमध्ये अकरा मजले आहेत, मात्र ते एकावर एक नाहीत. काचेच्या छतामधून तळमजल्यावर हवा आणि प्रकाश येईल अशा रीतीने या मजल्यांची रचना आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर वाचनालय आहेत. ३२ मीटर उंच असलेल्या छतामधून या टेबलापर्यंत व्यवस्थित प्रकाश पोहोचतो. या वास्तूच्या भिंतीवर वेगवेगळ्या अक्षरलिपी कोरलेल्या आहेत. या ग्रंथालयात सध्या अरेबिक आणि इंग्लिशसोबत फ्रेंच भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. परंपरागत ग्रंथांसोबतच डिजिटल जगाचे केंद्रही या ग्रंथालयात खुले करण्यात आले आहे. हजारो माहितीपट, शेकडो टेराबाइट्समधील डेटा या केंद्रात आहे. अत्याधुनिक म्हणावे असे सर्व काही या प्रचंड वास्तूत सामावलेले आहे.

या ग्रंथालयावर टीकाही होते. एकीकडे विकासाचा मार्ग सापडला नसताना प्रचंड पसा घालून उभी केलेली ही वास्तू म्हणजे पांढरा हत्ती असल्याचे काहीजण बोलतात. इजिप्त सरकारला अभिमान वाटण्यापलीकडे या वास्तूतून फारसे काही साध्य होत नाही, असा आक्षेप आहे. संग्रहालय बघताना रिकाम्या खुच्र्या पाहून ते लक्षातही येते. सध्या ग्रंथालयात क्षमतेपेक्षा खूपच कमी पुस्तके आहेत, हेदेखील खरे. मात्र तरीही या ग्रंथालयाचे महत्त्व कमी होत नाही. माहिती आणि तंत्रज्ञान साठवणारी ही वास्तू किमान एकदा भेट द्यावी अशीच आहे.

अलेक्झांडर हे शहर मुंबईसारखेच आहे. अगदी मरिन ड्राइव्हप्रमाणेच तिथेही राणीचा रत्नहार वाटावा असा समुद्रकिनारा आहे. कोलकात्याप्रमाणे ट्राम आहेत, मुंबईप्रमाणे काळ्यापिवळ्या टॅक्सी आहेत आणि पुरातन वारशांची यादी तर लांबलचक आहे. त्यात या ग्रंथालयाची भर पडली आहे.

प्राजक्ता कासले – prajakta.kasale@expressindia.com