17 February 2020

News Flash

झोडगेमधील माणकेश्वर मंदिर

१४ व्या शतकापर्यंत संपन्न अशा या महाराष्ट्रदेशी यादव घराण्याचे राज्य होते.

इसवी सन नवव्या शतकापासून ते १४ व्या शतकापर्यंत संपन्न अशा या महाराष्ट्रदेशी यादव घराण्याचे राज्य होते. अतिशय संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी अशा या साम्राज्यातील विविध राजांनी आपापल्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे इथे बांधली. असेच एक सुंदर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. मालेगावपासून ३० किमीवर असलेल्या झोडगे या गावी असलेले माणकेश्वर महादेवाचे मंदिर अतिशय सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर इथल्या गोंदेश्वर मंदिरासारखीच आहे.

अतिशय देखणे आणि शिल्पजडित असलेले हे मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या समोरच एक चौथरा असून त्यावर नंदीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराचे शिखर पाहिले की रतनवाडी इथल्या अमृतेश्वर मंदिराची हटकून आठवण होते. मुखमंडप, खांब नसलेला मुख्यमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. शिविपडीचा वारीमार्ग हा नेहेमी उत्तर दिशेकडे असतो. कदाचित वाटसरूंना दिशा समजण्यासाठी याचा उपयोग होत असावा. हे मंदिर पश्चिमाभिमुख असल्यामुळे मंदिरातील शिविपडीचा वारीमार्ग उत्तर दिशेकडे जाणारा म्हणजेच आपल्या डाव्या हाताला दिसतो.

मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार हे भूमीज मंदिर आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरापेक्षा जरी याचा पसारा लहान असला तरीसुद्धा या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला मुद्दाम पाहण्याजोगी आहे. शैव मंदिर असल्यामुळे अर्थातच यावर शिवाच्या विविध मूर्ती पाहायला मिळतात. त्यातही एका देवकोष्ठात असलेली अंधकासुरवधाची शिवप्रतिमा निव्वळ देखणी आहे. यासोबतच मंदिराच्या बाह्यांगावर विविध वादक, दर्पणा, नूपुरपादिका अशा सुरसुंदरी, भरव यांचे केलेले अंकन, तसेच शिखरावर असलेले कीíतमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहे. चामुंडेचे एक भयावह शिल्प त्यातल्या बारकाव्यांसह इथे पाहायला मिळते. आठ दिशांचे स्वामी असलेले अष्टदिक्पालसुद्धा इथे मंदिरावर अत्यंत कलाकुसरीने कोरलेले आहेत. शिल्पकामाची एवढी विविधता असलेले हे मंदिर अगदी एकांतात वसलेले आहे. गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला झटुंब्याचा डोंगर असे म्हणतात. त्या डोंगरावरचा देव हा घोडय़ावर बसलेला असून तो गावाचे रक्षण करतो अशी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे. मालेगाव-धुळे परिसरात असेलेले हे शिल्पवैभव खरेतर खास वेळ काढून पाहावे असे आहे. अगदी तसे नाही जमले तरीसुद्धा आपल्या या परिसरातील भटकंतीमध्ये झोडगे इथे काही काळ थांबून या शिल्पवैभवाची जरूर अनुभूती घ्यावी.

आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com

 

First Published on November 16, 2016 3:38 am

Web Title: mankeshwar temple
Next Stories
1 नागावचे भीमेश्वर
2 दुचाकीवरून : सायकल कुठे ठेवायची?
3 हम्पीचे गारूड!
Just Now!
X