News Flash

मॅटरहॉर्नच्या पायथ्याशी

आल्प्सचे छायाचित्रणसाठी सर्वात प्रसिद्ध शिखर म्हणजे मॅटरहॉर्न.

आल्प्सच्या पर्वतराजीतील मॅटरहॉर्न या हिमशिखराची जगभरातील गिर्यारोहकांमध्ये एक कठीण हिमशिखर म्हणून ओळख आहे. पण त्याचबरोबर पायथ्याचे टुमदार झरमॅट हे मॅटरहॉर्नइतकेच सुंदर आणि मोहक आहे. अगदी पाहताक्षणीच प्रेमात पडायला लावणारं.

स्वित्झर्लण्डला जाऊन तर बरेच जण येतात. माऊंट टीटलीस तर नित्याचेच झालेय. पण जोपर्यंत आपण आल्प्स पर्वतशिखरांचा राजा मॅटरहॉर्नचे  दर्शन घेत नाही तोपर्यंत स्विस देश संपूर्ण बघितला असे होऊच शकत नाही. आल्प्सचे छायाचित्रणसाठी सर्वात प्रसिद्ध शिखर म्हणजे  मॅटरहॉर्न. ते आल्पसमधले सर्वात उंच शिखर नाही पण  काठीण्यपातळीवर आल्प्सच्या पर्वतराजीचा राजाच आहे.

मॅटरहॉर्न हे निसर्गाचे सुंदर व मोहक रूप निश्चितच नव्हे. पण  मॅटरहॉर्नचे सौंदर्य वादातीत आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप अक्षरश: अंगावर येते. तो अजस्र महाकाय   मॅटरहॉर्न साक्षात आपल्या समोर उभा ठाकला की क्षणभर गांगरून जायला होते, पण आपण लगेच आपली नजर सरसावून त्या विशालकाय हिमशिखरांशी मत्री करतो. इथला निसर्ग स्वत:चे स्वामित्व सतत अधोरेखित करत असतो. आपण हे रूप पाहून खरे तर बिचकतोच, पण नंतर सराईताप्रमाणे त्याची सौंदर्यस्थळे शोधू लागतो. इथे उणे आठ अंश सेल्सियस तापमान असते. यामुळे पुरेपूर काळजी न घेता बर्फात पाय घातला तर फ्रॉस्ट बाईट होण्याची शक्यता अधिक.

झरमॅट गावातून गंडोलामार्फत आपण खूप उंचावर असलेला  मॅटरहॉर्न बघण्यास जाऊ शकतो. झरमॅट हे मुळात स्किइंगचे ठिकाण आहे. स्किइंगच्या मोसमात हे छोटे गाव स्किइंग स्पोर्ट्समननी भरून जाते. आपल्याला जर स्किइंग करायचे नसेल तर सरळ तिथे हंगाम नसताना जावे म्हणजे निवांत फिरता येते.

झरमॅट हे मोटारमुक्त शहर आहे. इथे गाडय़ा वापरत नाहीत. छोटेसे झरमॅट गाव फारच गोड आहे. प्रथमदर्शनी माणूस तर या गावच्या प्रेमातच पडतो. अध्र्या तासात पूर्ण गावात गोल फेरफटका मारून होतो. इथल्या घराच्या प्रत्येक बाल्कनीत एक रंगबिरंगी चक्र खोचून ठेवलेले असते जे सतत वाऱ्यावर ताल धरत गोल गिरक्या घेत असते. प्रत्येक बाल्कनीत खूप फुले येणारी छोटी छोटी फुलझाडे फारच कल्पकतेने रचून ठेवलेली असतात. ते दृश्यच इतके मनमोहक असते की इथे बघू का तिथे, असा प्रश्न सतत पडत असतो. सगळे रस्ते सुरेख देखणे व रेखीव आहेत.

स्वित्झर्लण्डची खासियत म्हणजे इथे बघावे तिथे खूप छान शोभिवंत पाणपोया आहेत. छोटय़ा छोटय़ा  विहिरींवर सुबक आणि वेगवेगळ्या आकाराच्या पाणी पिण्यासाठी तोटय़ा आहेत.  थंडगार पाणी पिताना पण वेगळीच मजा येते. इथले सौंदर्य आणि स्वच्छता वादातीत आहे. झरमॅट हे स्विस गाव इटलीच्या सीमेवर आहे. म्हणून इथल्या जेवणावर इटालियन चवीचा जास्त पगडा आहे. काही रेस्तराँमध्ये मशाली पेटवून छान प्रकाशयोजना करतात. चक्क भट्टीमध्ये भाजलेला खरपूस पिझ्झा आणि वाइन सव्‍‌र्ह केली जाते. रोडसाइड कॅफेमध्ये  सुंदररीत्या सजावट करून निरनिराळे पदार्थ करतात. अगदी ऑक्टोपसी सूपचाही अगदी चवीने आस्वाद इथे घेता येतो.

झरमॅटला सायकल भाडय़ाने घेऊन छान फेरफटका मारावा किंवा पायी चालत अख्खे शहर अध्र्या-पाऊण तासात फिरून घ्यावे. इथे अगदी सुरक्षित वाटते. ह्य़ा छोटय़ा गावातून कुठल्याही खिडकीतून डोकावले तरी अजस्त्र  मॅटरहॉर्न आपल्याला खुणावत असतो. संध्याकाळी निवांत थंडी अनुभवत छानशा कॅफेमध्ये बसून आरामात संध्याकाळ व्यतित करावी.

झुरीच किंवा बर्नहून ट्रेनने तीन ते चार तासांत झरमॅट येथे जाता येते. विस्प या जंक्शनला कॉगट्रेनने शेवटचा झरमॅटपर्यंतचा टप्पा पूर्ण करता येतो. दर वीस मिनिटांनी झरमॅटला जाणारी ट्रेन मिळते. हा ट्रेनचा प्रवास छान आरामदायी असतो. दोन्ही बाजूंनी सुरेख स्वित्झर्लण्डचे दर्शन होत राहते. प्रसिद्ध स्विस गाई आणि त्यांच्या गळ्यातली ती हलके वाजत राहणारी घंटा, द्राक्षांच्या वाइनरिज बघत ही ट्रेन चक्क आल्पस पर्वताच्याच बोगद्यातून झरमॅटपर्यंत घेऊन जाते.

अगदी माथेरानप्रमाणे छोटय़ाशा झरमॅट स्टेशनमध्ये उतरून सरळ आपापले सामान घेत पायी आपण हॉटेलपर्यंत जाऊ शकतो. एकदा का तिथे पोचलात की मग आपण आपले न राहता त्या निसर्गातच हरवून जातो. अशा या झरमॅटच्या प्रेमात एकदा तरी पडलेच पाहिजे.

sonalischitale@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 12:59 am

Web Title: matterhorn snow peak
Next Stories
1 दुचाकीवरून : सायकल टुरिंगसाठी उपयुक्त अ‍ॅक्सेसरीज
2 आडवाटेवरची वारसास्थळे : केळदीची चिन्नम्मा
3 लोक पर्यटन : घुमरी – जोझीला युद्ध स्मारक
Just Now!
X