अष्टविनायकांपासून विविध प्रसिद्ध गणपती आपल्याला माहिती असतातच. आणि त्या ठिकाणचे धार्मिक पर्यटन सुरू असतेच. पण राज्याच्या सीमा ओलांडून बाहेर गेलो तर तिथेही गणपतीची प्राचीन मंदिरे, देवस्थाने आणि मूर्ती पाहायला मिळतात.

भारतभर सर्वात लाडके दैवत कोणते असेल तर ते गणपती हेच होय. गणपतीइतकी लोकप्रियता क्वचितच दुसऱ्या कुठल्या देवतेच्या वाटय़ाला आली असेल. अग्रपूजेचा मान प्राप्त झालेले गणपती हे दैवत प्रस्थापित सर्व देवांपेक्षा तरुण असूनसुद्धा सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. प्राचीन देवालयांच्या स्थापत्यात विविध शैलींचे प्रयोग दिसतात. पण गणपती मंदिरांमध्ये अशी विविधता, प्रयोगशीलता तुलनेने कमीच दिसून येते. किंबहुना विघ्नहर्ता म्हणून दरवाजावरचे तिचे स्थान अबाधित आहे. स्थापत्याने नटलेली अशी गणपतीची स्वतंत्र मंदिरे तशी मोजकीच आहेत. काही आपल्या राज्यात, तर काही परराज्यांत.

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद

उत्तर गोव्यात फोंडा तालुक्यात पणजीपासून १९ किलोमीटर अंतरावर खांडोळा गणेश हे रम्य देवस्थान आहे. याला महागणपती म्हणतात. पूर्वी हा गणपती दिवर या बेटावर स्थापित होता. परंतु, सन १५४० मध्ये पोर्तुगीजांनी याची नासधूस केल्यामुळे हा गणपती तिथून हलवण्यात आला. आधी खांडेपार, नंतर नार्वे आणि सन १७५० मध्ये याची प्रतिष्ठापना खांडोळा या ठिकाणी करण्यात आली. प्राचीन मूर्ती बदलून नवीन मूर्ती करावी, असे देवस्थानाने ठरवले. पण काही कारणाने ती हलवता आली नाही. अर्थातच या मंदिरात जुनी मूर्ती पण गर्भगृहात ठेवलेली दिसते. मूर्तीची ठेवण आणि त्यावरील अलंकरण यावरून ही मूर्ती होयसळ काळातली आहे असे वाटते. गोव्याच्या निसर्गसमृद्ध परिसरात असलेले हे महागणपतीचे मंदिर खास भेट देण्याजोगे आहे.

समृद्ध अशा विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे शहर हंपी. आज जरी बरेचसे शहर उद्ध्वस्त झालेले असले तरीसुद्धा विरुपाक्ष, विठ्ठल, कृष्ण ही मंदिरे आणि सर्वत्र विखुरलेले अवशेष आजही या नगरीत पाहायला मिळतात. ससिवेकलू आणि काडवेकलू असे दोन गणपती हंपीमध्येच स्थापित केलेले आहेत. त्यांपैकी ससिवेकलू गणपती हेमकूट पर्वताच्या दक्षिण पायथ्याला वसला आहे. एकाच दगडातून कोरून काढलेली जवळजवळ आठ फूट उंचीची ही गणेशमूर्ती पाहण्याजोगी आहे. मूर्तीभोवती सुंदर असा उघडा सभामंडप बांधलेला आहे. इथे मिळालेल्या शिलालेखानुसार सन १५०६ मध्ये चंद्रगिरीच्या कोणा व्यापाऱ्याने राजा नरसिंह दुसरा याच्या स्मरणार्थ हा सभामंडप बांधला.

या मंदिराच्या उत्तरेला काडवेकलू  गणेश मंदिर आहे. ही मूर्ती १५ फूट उंच अशी भव्य आहे. मूर्तीच्या बाजूने गर्भगृह बांधण्यात आले आहे. त्यासमोरील सभामंडप अत्यंत देखणा आहे. विविध शिल्पांनी समृद्ध असा हा सभामंडप आणि हा गणपती हंपी भेटीत जरूर पाहायला हवा.

आपल्याकडे देव आणि त्यांच्यासंबंधीच्या दंतकथा विपुल प्रमाणात सापडतात. उच्ची पिल्लायार या तिरुचिरापल्ली येथील गणपतीच्या बाबतीत अशीच दंतकथा प्रचलित आहे. लंकाविजयानंतर रामांनी बिभीषणाला विष्णुमूर्ती भेट दिली. ती मूर्ती लंकेत जाऊ नये म्हणून देवांच्या इच्छेनुसार गणपती तेथे गुराख्याच्या वेशात गेला. वाटेत बिभीषण स्नानाला गेला असताना विनायकाने ती मूर्ती मुद्दाम जमिनीवर टेकवली व ती तेथेच राहिली. ही आख्यायिका खरी की खोटी, हा अभ्यासाचा विषय. पण विष्णुमूर्ती कावेरी नदीच्या तीरावर श्रीरंगम इथे प्रस्थापित झाली आणि डोंगरावर विनायकाचे मंदिर तिथेच बांधले गेले. मूर्तीच्या कपाळावर एक टेंगुळ दिसते. पल्लव राजांनी हे मंदिर बांधायला घेतले, पण नंतर विजयनगर साम्राज्याच्या, मदुराईच्या नायकांनी ते पूर्ण केले. तिरुचिरापल्ली इथे टेकडीवर असलेल्या प्रसिद्ध रॉकफोर्टमध्ये हे मंदिर आहे.

कांचनगंगा डोंगररांगेच्या कुशीत वसलेले नितांतसुंदर राज्य म्हणजे सिक्कीम. इथे बौद्ध धर्माचे प्राबल्य असूनही एक सुंदर गणपती स्थान पाहायला मिळते. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून सहा किलोमीटर अंतरावर नथुला खिंडीच्या मार्गावर समुद्रसपाटीपासून ६१०० फूट उंचीवर हा गणपती वसला आहे. गर्भगृहात गणेशाची प्रसन्न मूर्ती विराजमान आहे. इथून दिसणारा नजारा अफलातून आहे. गंगटोक शहर, राजभवन आणि कांचनगंगा शिखराचा अप्रतिम देखावा इथून दिसतो. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंगीबेरंगी पवित्र मानल्या गेलेल्या पताका लावलेल्या असतात. सिक्कीम भेटीत हे स्थळ न चुकता भेट द्यावे असेच आहे.

देवभूमी गढवाल म्हणजे पर्यटकांचे नंदनवन. उंच उंच देवदार वृक्ष, गर्द हिरवी झाडी, पाठीमागे अनेक हिमाच्छादित शिखरे असे हे स्थान. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ, केदारनाथ अशी विविध देवालये इथे हिमालयाच्या कुशीत वसलेली आहेत. समुद्रसपाटीपासून १०७५७ फुटांवर असलेले दोडीताल हे त्यांपैकीच एक. पुराणात सांगितलेली गणेशजन्माची कथा येथेच घडल्याचे मानले जाते.

नयनरम्य गढवाल प्रांती दोडीताल हे एक रम्य सरोवर आहे. याचे मूळ नाव ‘धुंडीताल’ जे गणपतीच्या नावावरून पडले असा प्रवाद आहे. उत्तरकाशी-अगोडा-दोडीताल असा २२ किमीचा हा ट्रेक आहे. या ठिकाणी मंदिरात गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे.

याचबरोबर भारतातल्या विविध प्रांतांत आजही मोठय़ा प्रमाणात गणेश मंदिरे आहेत. इंदूरमधला खजराना गणेश, उज्जैनचा परमार राजवटीमध्ये स्थापन झालेला चिंतामण गणेश, उदयपूरचा बोहरा गणेश, तामिळनाडूमधला श्वेत विनायगार आणि कार्पाक गणेश, केरळचा मधुर महागणपती, खजुराहो मंदिरावरील नृत्यगणेश, नंजनगुडू इथल्या देवळावरील गणेशमूर्ती अशी विविध गणेशस्थाने आजही भेट देण्याजोगी आहेत. तुलनेने उत्तर भारतापेक्षा दक्षिणेत गणपती मूर्ती आणि मंदिरे यांचे वैविध्य आढळते. हळेबिडू इथल्या होयसळेश्वर मंदिराबाहेर अत्यंत देखणी गणपतीची मूर्ती आहे. तसेच मंदिरावरदेखील नृत्यगणेशाची सुंदर मूर्ती शिल्पांकित केलेली आढळते. या गणेशमूर्ती पाहायला आपल्या नेहमीच्या भटकंतीत राज्याच्या सीमा ओलांडून भ्रमंती करायला हवी.

आशुतोष बापट – ashutosh.treks@gmail.com