श्रावण म्हणजे तीर्थाटनाचा महिना. मात्र आपलं तीर्थाटन धार्मिकतेच्या पलीकडचं फारसं काही पाहत नाही. बारा ज्योतिर्लिगांपैकी सर्वाधिक ज्योतिर्लिग असणाऱ्या महाराष्ट्रात आडवाटेवर अद्भुत स्थापत्यकला असणारी अनेक शिवालयं देखील आहेत. त्यांच्या पाषाणसौंदर्याची ही खास ओळख.
मुबलक पाऊस झालेला असल्यामुळे सारी सृष्टी हिरवीगार झाली आहे. यावेळेला काही वेगळ्या, पण शिल्पसमृद्ध शिवमंदिरांना भेट देऊयात. शिवदेवतेचं प्रचंड आकर्षण मूर्तिकारांना, राजसत्तांना होतं. त्यामुळेच शिवाच्या भव्य शिल्पसमृद्ध मंदिरांची निर्मिती भारतभर केलेली दिसते. मग महाराष्ट्र त्याला अपवाद कसा बरं असेल? महाराष्ट्रातल्या शिवमंदिरांची निर्मिती ही इसवी सन १० ते १४ व्या शतकात मोठय़ा प्रमाणावर झालेली आढळते. या काळाला यादव शिलाहार कालखंड असे म्हटले जाते. खानदेश व मराठवाडय़ावर यादवांचे तर दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रावर शिलाहारांचे राज्य होते. सुप्रसिद्ध अशी अंबरनाथ, औंढय़ा नागनाथ ही त्याकाळातली शिवमंदिरे तर आहेतच, परंतु त्याचबरोबर तितक्याच तोलामोलाची विविध शिवमंदिरे महाराष्ट्रभर विखुरलेली आहेत. त्यांच्यावरील शिल्पकला तेवढीच समृद्ध आहे. नुसत्या मराठवाडय़ात बघितले तर गावोगावी अशी मंदिरे पाहायला मिळतील. तिथले प्रमुख आकर्षण म्हणजे त्यांच्या बाह्य़ांगावर सूरसुंदरी मोठय़ा प्रमाणावर शिल्पांकित केलेल्या दिसतात. त्यातली काही आडवाटेवरची ही सुंदर शिवमंदिरे मुद्दाम वेळ काढून आवर्जून पाहावीत अशी आहेत.
अपरांत म्हणजेच कोकणात मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर हे एक मोक्याचे ठिकाण. इथूनच तीन किलोमीटर आतमध्ये कसबा संगमेश्वर हा भाग आहे. या ठिकाणी एक सुंदर शिवालय वसले आहे. अंदाजे ४०० चौरस मीटरच्या फरसबंद आवारात हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या बाह्य़ांगावर मूर्तिकाम नाही, परंतु मंदिराच्या सभामंडपातील खांब आणि त्याच्या हस्तावर असलेल्या मूर्ती अगदी देखण्या आहेत. या मंदिराचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे याच्या मुखमंडपावर कोरलेले दगडी झुंबर अद्वितीय आहे. इतके देखणे दगडी झुंबर क्वचितच पाहायला मिळेल. इथेच अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनांसह शिल्पांकित केलेले आहेत. याच प्रवेशद्वारावर शेषशायी विष्णूची प्रतिमा बघत राहावी अशी आहे. काहिशी वाकडी वाट करून हे मंदिर अवश्य पाहावे. एक अप्रतिम पाषाणसौंदर्य पाहिल्याचे समाधान नक्कीच लाभेल.
कोकणातून घाटावर आलो तर कोल्हापूर जिल्ह्य़ात शिरोळ तालुक्यात एक प्रेक्षणीय मंदिर आहे खिद्रापूर. कोल्हापूरच्या आग्नेयेला ६५ किमीवर असणारे कृष्णेच्या काठावरचे कोपेश्वर मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. शिलाहारांच्या काळात अंदाजे इस १२-१३ व्या शतकात हे मंदिर बांधले गेले. याचे खास वैशिष्टय़ म्हणजे या मंदिराला दोन मंडप आहेत. पकी एकाला छप्परच नाही. त्याला स्वर्गमंडप असे म्हणतात. स्वर्ग मंडपाच्या मधोमध रंगशीळा आहे तर तिच्या भोवती असलेल्या स्तंभांच्या हस्तांवर वाहनांसमवेत असलेले अष्टदिक्पाल दिसतात. मंदिराच्या बाह्य़ांगावर असलेला गजथर हा केवळ प्रेक्षणीय आहे. अष्टदिक्पाल, नवग्रह या आणि अशा अनेक मूर्ती व शिल्पे इथे मंदिरावर दिसतात. संपूर्ण मंदिर विविध मूर्तीनी मढवलेले आहे. शिल्पकलेचा हा खरोखरच एक अजोड नमुना
म्हणावा लागेल.
इ.स.च्या १२ व्या शतकात झंझ नावाच्या राजाचे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. त्याने विविध नद्यांच्या उगमावर शिवमंदिरे बांधली असे सांगितले जाते, पण त्याचे ऐतिहासिक स्पष्ट संदर्भ मिळत नाहीत. तरीसुद्धा त्याच्यासंदर्भातील पुणे जिल्ह्य़ातील कुकडी नदीच्या उगमाशी असलेले कुकडेश्वराचे शिवालय पाहायलाच हवे. जुन्नरहून आपटाळेमाग्रे नाणेघाटाकडे जाताना वाटेत पूर या गावी हे अतिशय देखणं मंदिर आहे. पश्चिमाभिमुख असलेलं हे मंदिर अनेक शिल्पांनी नटलेले आहे. गणेशपट्टी, कीíतमुखे, बाह्य़ िभतींवर असलेला वराह अवतार, शिवतांडव शिल्प अशी बरीच शिल्पे अगदी आवर्जून पाहण्याजोगी आहेत. हे मंदिर अगदी भग्न झाले होते. परंतु पुरातत्व खात्याने हे सगळे मंदिर उतरवून पुन्हा पूर्वीसारखे उभे केले आहे. चावंड, जीवधन, हडसर अशा मातब्बर दुर्गाची साथ या परिसराला लाभलेली आहे. नगर जिल्ह्य़ातल्या रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिरसुद्धा देखणे आहे. संगमेश्वरप्रमाणेच या मंदिराच्या मुखमंडपातील दगडी झुंबर पाहण्याजोगे आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत हे इथले खास वैशिष्टय़. रतनगडाच्या पाश्र्वभूमीवर हे भूमीज शैलीतील विविध शिल्पांनी नटलेले अमृतेश्वर मंदिर पाहायलाच हवे.
इथून पुढे नाशिक जिल्हा येतो. तीर्थक्षेत्र नाशिकच्या अलीकडेच यादवांची प्राचीन राजधानी होती सिंदीनगर ऊर्फ सिन्नर! इथेच गोन्देश्वराचे देखणे शिवालय वसले आहे. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर भूमीज शैलीमधील पंचायतन मंदिर आहे. मंदिराला विशाल आवार, त्याभोवती सीमािभत आणि मंदिराभोवती नागर प्रकारची चार उपआयताने आहेत. नंदीमंडपपण देखणा आहे. मुखमंडप आणि बाजूचे दोन अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंडपांवरील छप्पर हे फांसना पद्धतीचे आहे. मंदिराच्या बाह्य़ांगावर अप्सरा, देव देवतांचे शिल्पांकन दिसते.
तसेच पुढे आपण खान्देशच्या दिशेला निघालो की मालेगाव-धुळे मार्गावर झोडगे या गावी असेच एक सुंदर शिवालय सामोरे येते. मालेगावपासून २१ किलोमीटरवर असलेले हे माणकेश्वर शिवमंदिर पाहण्यासारखे आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर त्रिदल प्रकारचे आहे. म्हणजे याला तीन गाभारे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याचा बाह्य़ भागावर मूíतकाम केलेले आहे. विविध शैव देवता, आठ दिशांचे स्वामी असलेले अष्टदिक्पाल आवर्जून पाहण्याजोगे आहेत. कीíतमुखे मोठय़ा कलात्मकरित्या इथे शिल्पांकित केलेली दिसतात. मंदिरात रंगशिळा दिसते. मुखमंडप (पोर्च) म्हणजे जिथून आपण आत प्रवेश करतो ती जागा. तिथल्या अष्टकोनी खांबांवर कोरलेली सुरसुंदरींची शिल्पे प्रेक्षणीय आहेत. मंदिर अभ्यासकांसाठी तर हे मंदिर म्हणजे पर्वणी आहेच; परंतु पर्यटकांसाठी पण दोन घटका थांबून एक सुंदर घडवलेले मंदिर पाहणे अगत्याचे आहे.
गर्द झाडी, शांत वातावरण आणि निसर्गाचा वरदहस्त आलेला महाराष्ट्राच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे विदर्भ. मंदिरस्थापत्यामधील मलाचा दगड ठरावे, असे मरकडी इथले शिवालय म्हणजे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. काहीसे दूरवर म्हणून दुर्लक्षिलेले परंतु खास वेळ काढून इथे येऊन पाहावे असे हे ठिकाण. विदर्भाच्या अगदी टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ात वसलेले हे मंदिर नितांतसुंदर आहे. वैनगंगा नदीच्या काठी वसलेले हे शिवमंदिर शिल्पसमृद्ध आहे. औंढय़ानागनाथ मंदिरानंतर शिल्पसमृद्धीत याच मंदिराचा क्रमांक येईल. विविध सुरसुंदरी, निरनिराळ्या व्यालमूर्ती, पत्नींसह शिल्पांकित केलेले अष्टवसू, चतुष्पाद सदाशिव, ब्रह्मा-विष्णू-महेश-सूर्य यांची संयुक्त असलेली ब्रह्मेशानजनार्दनार्क मूर्ती, असंख्य वादक, नर्तक आणि शिवाची विविध रूपे यांनी नटलेले हे मंदिर खरोखरीच सर्वागसुंदर आहे. या मंदिरांवरील मूर्तीची चेहरेपट्टी काहीशी निराळी आहे. नागपूरवरून एका दिवसात सहज हे मंदिर पाहून होते. विदर्भाच्या भटकंतीमध्ये याचा समावेश केला पाहिजे.
तिथून मराठवाडय़ात आलो तर तिथे शिल्पसमृद्ध मंदिरांची मांदियाळीच पाहायला मिळेल. एकूणच दुर्लक्षित असलेला हा भाग मंदिरस्थापत्याचा दृष्टीने खरोखर श्रीमंत आहे. मराठवाडय़ामध्ये जेवढी शिल्पसमृद्ध मंदिरे आणि त्यावरील देखण्या मूर्ती पाहायला मिळतात तेवढय़ा महाराष्ट्रात इतर कुठेच पाहायला मिळणार नाहीत. या सर्व मंदिरांच्या पंक्तीमध्ये बसणारे एक अत्यंत देखणे ठिकाण आहे ते म्हणजे नांदेड तालुक्यातील मुखेड गावचे महादेव मंदिर. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मीळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृका. अंधकासुर वधाच्या वेळी ब्राह्मणी, वाराही, कौमारी, इंद्राणी, माहेश्वरी, नारसिंही, या नावांनी ओळखल्या देवांच्या शक्तींनी मिळून शिवाला सहाय्य केले आणि दैत्याचा नायनाट केला अशा कथा पुराणांमध्ये आढळतात. मुखेडच्या महादेव मंदिराच्या बाह्य़ांगावर यातली प्रत्येक मातृका ही अत्यंत डौलदारपणे नृत्य करताना शिल्पित केलेली आहे. दुर्दैवाने यातील काही शिल्पांचे हात भंगलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या शरीराचा डौल अत्यंत आकर्षक दाखवला आहे. नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि लयबद्धता त्या मूíतकारांनी इतकी अचूक दाखवली आहे की प्रत्यक्ष नृत्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय अप्रतिम अशा या मूर्ती आणि हे मंदिर पाहायलाच हवे.
वरील मंदिरांव्यतिरिक्त बळसाणे, अंभई, वेळापूर, होट्टल, धर्मापुरी, पानगाव, निलंगा, औंढा नागनाथ, धारासुर, उमरगा, कंकाळेश्वर, माणकेश्वर, भूतमुंगळी अशा अनेक ठिकाणची शिवमंदिरे उल्लेखनीय आहेत. त्यांच्यावरील मूíतकाम समृद्ध आहे. या प्रत्येक मंदिरावर एकेक ग्रंथ निर्माण होईल एवढी मोठी यांची व्याप्ती आहे. केवळ गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करून परत जायचे असे न करता त्या मंदिराची रचना, ठेवण, त्यावरील शिल्पे, ही जरी अभ्यास नसला तरी कुतूहलापोटी अवश्य न्याहाळावीत अशी नक्कीच आहेत. अनामिक शिल्पी, स्थापतींनी केलेला हा चमत्कार आपल्या समोर आहे आणि आपल्या अगदी जवळ आहे. आपल्या धार्मिक पर्यटनात याकडेदेखील आवर्जून लक्ष दिल्यास आपली भटकंती आणखीनच समृद्ध होऊ शकते.
आशुतोष बापट – ashutosh.treks@gmail.com