29 May 2020

News Flash

मुघल स्थापत्याचा हबशी महाल

मध्ययुगीन कालखंडात जुन्नर ही एक मोठी बाजारपेठ आणि मुघलांचे महत्त्वाचे ठाणे होते.

जुन्नर आणि परिसर हा प्राचीन घाटवाटा, लेणी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पण, याच परिसरात मुघलकालीन स्थापत्याचा एक प्राचीन महालदेखील आहे.

जुन्नर-ओझर रस्त्यावरील हा हबशी महाल त्याच्या स्थापत्यशैलीसाठी पाहायला हवा.

पुणे जिल्ह्यच्या उत्तरेकडील जुन्नर तालुका आणि तो सगळाच परिसर निसर्गसंपत्ती आणि इतिहासाने समृद्ध आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी हा तर या परिसराचा मानिबदू म्हणायला हवा. त्याचसोबत या परिसराला प्राचीन इतिहासाचा सुद्धा परिसस्पर्श झालेला बघायला मिळतो. भटकंती, पर्यटन यासाठी जे जे म्हणून आवश्यक असते, ते ते या संपूर्ण जुन्नर परिसरात बघायला मिळते. इथे किल्ले आहेत, लेणी आहेत, प्राचीन घाटमार्ग आहेत, सुंदर अशी शिल्पसमृद्ध मंदिरे आहेत, अष्टविनायकांतील दोन गणपती आहेत, खंडोबा आहे, देवी रेणुका आहे, एक-दोन नव्हे तर पाच धरणे आहेत, देखणी गिरिस्थाने आहेत, इतिहास जागा करणाऱ्या प्राचीन हवेल्या आणि समाधिस्थाने आहेत, तसेच विज्ञानाची प्रगती दाखवणारी खोडदसारखी ठिकाणे आहेत. अक्षरश नुसती ठिकाणांची नावे लिहिताना हाताला रग लागते अशी परिस्थिती आहे, तर ही सगळी ठिकाणे बघायची, त्यांचा इतिहास समजून घ्यायचा, त्याची भटकंती करायची तर किती दिवस काढावे लागतील हे ज्याचे त्याने ठरवावे. एखाद्या तालुक्याला इतक्या विविध आणि समृद्ध गोष्टींचे वरदान मिळालेले उदाहरण क्वचितच कुठे पाहायला मिळेल. लेण्याद्री आणि ओझर ही अष्टविनायकांतील दोन ठिकाणे तसेच किल्ले शिवनेरी या सुप्रसिद्ध स्थानांसोबत इतरही तेवढीच तोलामोलाची ठिकाणे या परिसरात विखुरलेली दिसतात. त्यामुळे या वेळी आपण अशाच काही सुंदर पण आडवाटेवर असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊया. जेणेकरून आपली भटकंती नक्कीच समृद्ध होईल आणि काही तरी निराळे परंतु तेवढेच सुंदर ठिकाण बघितल्याचे समाधानसुद्धा आपल्याला लाभेल.

मध्ययुगीन कालखंडात जुन्नर ही एक मोठी बाजारपेठ आणि मुघलांचे महत्त्वाचे ठाणे होते. जुन्नरच्या दक्षिणेकडील बुरुजावर एक चित्र कोरलेले आहे, त्यात हत्तीच्या पाठीवर पोपट, तर त्याच्यामागे एक वाघ त्याच्या तोंडात चांदणी धरून उभा आहे. म्हणजेच या शहरात गजांतलक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग्य आहे आणि वाघासारखे पराक्रमी शूर योद्धेही इथे आहेत. खरे तर हे जुन्नरचे बोधचिन्ह व्हायला हवे.

याच जुन्नर-ओझर मार्गावरील हापूस बाग म्हणून ओळखली जाणारी मुळातील हबशी बाग हे असेच एक वेगळे ठिकाण. निजामशाहीचा वजीर असलेला मलिक अंबर हा मूळचा हबशी माणूस. आफ्रिकेतील इथियोपियातून आलेल्या या लोकांनी आपल्या शौर्याच्या जोरावर इथल्या राजसत्तेमध्ये मानाचे स्थान प्राप्त केलेले होते. निजामशहाचा वजीर असलेल्या मलिक अंबरने जुन्नर इथे एक हवेली बांधली आहे. जुन्नरकडून ओझरला जायच्या रस्त्यावर डाव्या हाताला हापूस बाग आहे त्यात ही हवेली दिसते. मुळात हबशी बाग असे याचे नाव, त्याचे झाले हापूस बाग. एका खासगी जागेत ही हवेली आहे. आजूबाजूला खूप चिंचेची झाडे आणि त्यात वसली आहे ही हवेली. स्थानिक याला हबशी महाल असे म्हणतात. मुघल स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना म्हणून याकडे बघायला हवे. मोठे थोरले प्रवेशद्वार तसेच दोन्ही बाजूला बाहेर आलेले छज्जे आणि त्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. आत गेल्यावर एक मोठे सभागृह दिसते. त्याच्या छतावर आणि समोरच्या खिडकीपाशी मुघल स्थापत्याच्या खास खुणा असलेल्या विविध कमानी दिसतात. बाजूच्या खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्याचा मार्ग आहे. वरच्या मजल्यावर नंतर बांधकाम केलेल्या दोन मोठय़ा खोल्या पाहायला मिळतात. राजेशाही हवेली म्हटल्यावर अर्थातच पाण्याची सोय हवीच. या हवेलीच्या मागच्याच बाजूला मोठी विहीर असून त्यातलेच पाणी इथे वापरले जायचे. आजूबाजूच्या परिसरात शेती असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार दिसते. इथे उभे राहिले की शिवनेरीपासून ते अगदी लेण्याद्री रांगेपर्यंत सह्याद्रीचे देखणे रूप न्याहाळता येते. या हवेलीत शहाजहान आपला मुलगा औरंगजेब याला घेऊन आला होता आणि त्याचा जवळजवळ अडीच वष्रे इथे मुक्काम होता असे सांगितले जाते.

इथेच जवळ मलिक अंबरच्या एका सरदाराची कबर आहे. हबशी गुंबज असे याला म्हटले जाते. तो सरदार त्याची पत्नी, त्याची मुले आणि त्याचा सेवक अशा एकूण नऊ कबरी एकाशेजारी एक इथे बघायला मिळतात. भव्य अशी ही वास्तू रस्त्यावरूनसुद्धा नजरेस पडते. अंदाजे ६० फूट लांब आणि तेवढीच रुंद आणि जवळजवळ ३० फूट उंच अशी ही वास्तू आहे. आतील िभतींवर फारसी लिपीतील मोठे शिलालेख कोरलेले आहेत. दोन बाजूला नक्षीदार दगडी जाळ्या असून दरवाजा आणि त्याच्या बाजूचे खांब बरेचसे िहदू स्थापत्याशी जवळचे वाटतात. जुन्नरला आल्यावर शिवनेरी, लेण्याद्री हे बघितले जातेच, पण त्याच जुन्नरमध्ये मुघल स्थापत्याच्या खाणाखुणा आजही उभ्या आहेत. आपल्या भटकंतीमध्ये त्याचाही समावेश आवर्जून केला जावा. जुन्नरच्या प्राचीनत्वाचे हे स्थापत्यरूपी पुरावे आजदेखील आपल्यासमोर उभे आहेत.

ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2017 10:03 am

Web Title: mughal architecture mahal
Next Stories
1 लोक पर्यटन : दुर्लक्षित दुर्गालेणे
2 जायचं, पण कुठं? : सातपुडय़ातला आंबागड
3 हाँगकाँगमधील तुंगचुंग
Just Now!
X