20 November 2017

News Flash

जायचं, पण कुठं? मुन्नार

कोलुक्कुमालाई हे जगातील सर्वात उंचावरील टी गार्डन असून हा परिसर रमणीय आहे.

सोनाली चितळे | Updated: March 15, 2017 1:53 AM

मुन्नार म्हणजे केरळमधील उडुपी जिल्ह्य़ातील चहाच्या मळ्याचे छोटेसे शहर. साधारण १६०० मीटर उंचावरील मुन्नार, ब्रिटिश काळापासून उन्हाळ्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून लोकप्रिय होते. मुन्नारचा शब्दश: अर्थ म्हणजे तीन नद्यांचा संगम. पश्चिम घाटातील दाट निलगिरीची जंगले आणि चहाचे मळे, अनेक नसíगक धबधबे आणि पश्चिम घाटातील दुर्मीळ होत चाललेले अनेक पशुपक्षी व सुंदर सुंदर फुले, असे सगळे एकत्रित मुन्नार येथे जुळून येते. नीलकुरिन्जी नावाची फुले बारा वर्षांतून एकदाच फुलतात. ती पाहण्यासाठी देशविदेशी पर्यटक खास त्या काळात इथे येतात. एरविकुलम नॅशनल पार्कमध्ये २००६ मध्ये ही फुले बघण्यासाठी खूप पर्यटक येऊन गेले. आता २०१८ मध्ये ही फुले पुन्हा फुलतील. जवळच्या देविकुलम येथे अनेक चहाचे मळे आहेत.

कोलुक्कुमालाई हे जगातील सर्वात उंचावरील टी गार्डन असून हा परिसर रमणीय आहे. अनामुडी या पश्चिम घाटातील सर्वात उंचावरील टोकावर ट्रेकिंग करता येते. मुन्नारमध्ये साहसी खेळ खास करून पॅराग्लायडिंग फार प्रसिद्ध आहे. सीतादेवी तलावात मासेमारी करून तेथेच बाब्रेक्यू करता येते. येथील टाटा टी म्युझियममध्ये चहा बनविण्याची प्रक्रिया सविस्तर दाखवली जाते. मुन्नारमधील चहा आणि मसाल्याचे पदार्थ प्रचलित आहेतच. पण इथली घरगुती चॉकलेट्सही खास आणि प्रसिद्ध आहेत. उडुपीमधील धुक्यात मट्टपेट्टी जलाशयामध्ये बोटिंग करताना आजूबाजूला निलगिरीच्या जंगलातून हत्ती मजेत फिरताना, पाण्यात डुंबताना आढळतात. येथील रोझ गार्डनमध्ये २५०च्या आसपास केवळ गुलाबाचे प्रकार आहेत. पुनर्जनी पारंपरिक गावात कथकली नृत्य व कलारीपयत्तु (मार्शल आर्ट) खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. निसर्गाने परिपूर्ण असे मुन्नार अनेक कारणांसाठी भेट देण्यायोग्य आहे.

कधी जाल?

ऑक्टोबर ते मे हा कालावधी मुन्नार पर्यटनासाठी उत्तम. तिरुवनंतपुरम व कोचीनहून बस सेवा उपलब्ध.

जवळचे रेल्वे स्थानक एर्नाकुलम, उदुमलपेत्ताई. जवळचे विमानतळ कोचीन, कोईम्बतूर, मदुराई.

sonalischitale@gmail.com

First Published on March 15, 2017 1:53 am

Web Title: munnar munnar tour kerala munnar hill station munnar trip