म्यानमार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मंडाले आणि आझाद हिंद सेनेच्या युद्धाचे प्रसंग. पण यापलीकडे म्यानमारमध्ये इन्ले लेकसारखी खास पर्यटनाची अशी काही ठिकाणं आहेत. तेथे जाऊन आवर्जून भटकायला हवं.

एखादं तळं किती मोठं असावं हे जर अनुभवायचं असेल तर म्यानमारमधील इन्ले लेकला जायला हवं. मध्य म्यानमारमध्ये असलेलं इन्ले लेक तब्बल ११६ चौरस किलोमीटर इतकं विस्तीर्ण आहे. जास्तीत जास्त ५० फूट खोली असल्यामुळे अत्यंत नितळ पाणी आणि विस्तीर्ण असा परीघ यामुळे हे केवळ एक नैसर्गिक आश्चर्य म्हणून नाही तर खास पर्यटनासाठीचं नितांतसुंदर ठिकाण पाहायलाच हवं असं आहे. इन्ले लेक आहे नैसर्गिक, पण या तळ्याकाठी वर्षांनुर्वष विकसित झालेलं जनजीवन हाच आता येथील पर्यटनाचा कणा बनून गेला आहे.

इन्ले लेक या संपूर्ण परिसरातील शंभर-सव्वाशे छोटय़ा-मोठय़ा गावांचा आधार आहे. त्यांची उपजीविका त्यावरच होते. सुमारे १००-१५० वर्षांपूर्वी जवळच्याच डोंगरातील अनेक स्थानिक लोक मासेमारीसाठी येथे येत. डोंगर ओलांडण्याचा त्रास वाचवण्यासाठी तळ्याकाठीच काही तरी सोय असावी म्हणून त्यांनी बांबूचा मचाणसदृश निवारा तयार केला. पुढे त्याचंच रूपांतर घरात होत गेलं. तळ्याची खोली काही ठिकाणी तर दहा फूटच. मग अशा ठिकाणी गावकरी वस्ती करू लागले. मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या बांबूपासून, कधी झाडाचं अखंड खोडच खांब म्हणून रोवून ही घरं दीडएकशे वर्षांपूर्वी तयार झाली. आज हीच घरं तेथील पर्यटनाचा आधार आहेत.

तीनेक दिवस तरी या तळ्यात आणि तळ्याकाठी भटकायला हवं इतकं काही येथे आहे. कमळाच्या तंतूपासून कातून काढलेला धागा आणि त्यापासून विविध वस्तू तयार करणारे कलाकार, तांबटांची वस्ती, मच्छीमारांचं गाव, जगातील सर्वात लांब असा टिकवूड पूल, बोटीवरचा पॅगोडा, तरंगती शेती, तळ्याच्या मध्यावर असणारी हॉटेल्स असं पर्यटनाचं एक परिपूर्ण पॅकेजच येथे उपलब्ध आहे.

येथील पूर्वापार पारंपरिक घरांचा वापर हा सध्या खास होम-स्टेसाठी केला जातो. तळ्याच्या काठी काही ठिकाणी तर चक्क चारही बाजूंनी पाण्याने वेढलेली घरं होम स्टेसाठी उपलब्ध आहेत. थेट पारंपरिक बर्मी पदार्थ चाखायचे असतील तर या घरांत मुक्काम करायलाच हवा. मात्र शाकाहारी-मांसाहारी जेवणाबद्दल आधीच यजमानांना कल्पना दिलेली चांगली. खास तळलेला पापड (मांसाहारींसाठी हा वेगळ्या पद्धतीने तळला जातो), आपल्याकडील हातसडीच्या लाल भातासारखा भात, सलाड असा जामानिमा येथे असतो. भारतीय पदार्थ येथे फारसे मिळतच नाहीत. पण बर्मी पदार्थ आवर्जून खावेत असेच आहेत. या होम-स्टेमध्ये पारंपरिक बर्मी बैठकदेखील असते आणि अगदीच गरज असेल तर टेबल-खुर्चीदेखील. होम स्टेमध्ये राहायचे नसेल तर मग तळ्याकाठची हॉटेल्स आहेतच.

तळ्याकाठच्या गावांमधून अनेक पारंपरिक गोष्टी पाहायला मिळतात. कमळाच्या तंतूपासून निघणाऱ्या धाग्याचा वापर करून विणकाम करणाऱ्या लाँग नेक वुमनना भेटता येते. या महिलांनी गळ्यात घातलेले पारंपरिक दागिने पाहण्यासारखे आहेत. त्या काही येथील स्थानिक महिला नाहीत. पण त्या आता या तळ्याकाठी राहतात. गळ्याभोवती वजनदार दागिने घालणं आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने चुकीचं असल्याचं सांगितलं जातं.

इन्ले लेकचा नजारा अनुभवायला मिळतो तो छोटय़ा छोटय़ा बोटींमधून. तीन-चार माणसं एका ओळीत बसतील अशी स्नेक बोट (लांबुळकी असल्यामुळे) हेच येथील मुख्य वाहन. विशेष म्हणजे येथील सर्वच बोटी या पायाने वल्हवल्या जातात. येथील मच्छीमारीची पारंपरिक पद्धत याला कारणीभूत आहे. एका हाताने त्यांचं विशिष्ट असं

शूंकच्या आकाराचं जाळं पाण्यात सोडायचं आणि दुसऱ्या हातात वल्हं घेऊन ते पायाने वल्हवायचं. या सवयीमुळे येथील अगदी लहान मुलंदेखील पायानेच होडी वल्हवतात.

याच तळ्यात एक नितांतसुंदर असा टिकवूडचा पूल आहे. तब्बल १.२ किलोमीटर लांबीचा. संपूर्णपणे हाताने तयार केलेला मायांग तौक ब्रिज हा जगातील सर्वात लांब असा टिकवूडचा पूल तळ्याकाठच्या अनेक गावांना जोडतो. मच्छीमार या तळ्याकाठी वस्ती करू लागले तेव्हा अर्थातच त्यांना शेतीची गरज भासू लागली. तेव्हादेखील या तळ्याचाच आधार घेतला गेला. पाण्याची खोली कमी असणाऱ्या ठिकाणी एक-दोन मीटरच्या काठय़ा गाळात रोवल्या गेल्या. विशिष्ट वेलींची लागवड केली गेली. गाळावर आधी गवत उगवण्यात आलं. गवताच्या मुळांनी मातीला घट्ट धरून ठेवलं. मग शेती सुरू झाली. आता या परिसरात कित्येक किलोमीटरवर ही शेती पसरली आहे. वांगी, टोमॅटो, कलिंगड अशी वेलीसदृश शेती येथे केली जाते. युनेस्कोने या तरंगत्या शेतीला, बागेला नुकताच जागतिक वारसा दर्जा दिला आहे. तळ्याचं अस्तित्व धोक्यात येईल म्हणून आणि यापुढे अशा प्रकारे नव्याने येथे शेती सुरू करता येत नाही.

फौग दाऊ ओ पॅगोडा हादेखील या तळ्यातच आहे. या पॅगोडात पाच बुद्ध मूर्ती आहेत. आपण फूल वाहतो तसे येथील बौद्ध मूर्तीना सोन्याचा वर्ख लावायची प्रथा आहे. या मूर्तीची दरवर्षी पॅगोडासदृश बोटीतून मिरवणूक काढली जाते. हाच तो ऑक्टोबरमध्ये होणारा इन्ले लेक फेस्टिव्हल. काही वर्षांपूर्वी मिरवणुकीदरम्यान बोट उलटून पाचही मूर्ती पाण्यात बुडाल्या होत्या. त्या शोधून पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आल्या. लेकच्या भोवती एकूण तीन मोनेस्ट्रीज आहेत. त्यापैकीच एक प्रसिद्ध अशी जम्पिंग कॅट मोनेस्ट्री. या मोनेस्ट्रीमध्ये एका बौद्ध भिक्खूने एक मांजर आणलं. त्याला वेगवेगळ्या उडय़ा मारायला शिकवलं. ते पाहून तेथे अनेक मांजरे आली आणि ही मोनेस्ट्री जम्पिंग कॅट मोनेस्ट्री म्हणून ओळखली जाऊ लागली. अर्थात गेल्या काही वर्षांपासून म्यानमार सरकारने यावर बंदी घातली आहे.

इन्ले लेकला जाण्यासाठी सेंट्रल म्यानमारला उतरून यंगूनवरून हेओ नावाच्या शहरात जावं लागतं. रस्तामार्गेदेखील जाता येतं. पण किमान आठ-दहा तास लागतात. त्यामुळे विमानाने ३५ मिनिटांत पोहोचता येतं. म्यानम्यारमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये अमेरिकनांचं प्रमाण अधिक आहे. चीन, जपान, कोरियनदेखील येतात. त्यांच्या येण्यामागे धार्मिक पर्यटनाचा भाग अधिक आहे. पण भारतीय तुलनेने कमीच. भारतातून जायचं तर इम्फाळवरून रस्तामार्गे जाता येतं. पण हा रस्ताही चांगला नाही आणि वेळ अधिक जातो. त्याऐवजी कोलकाताहून विमानाने किंवा बँकॉकला जाऊन यंगूनला जावं.

atmparab2004@yahoo.com