मनाली किंवा रोहतांग पासपर्यंत ल्यालेली हिरवी शाल स्पितीमध्ये अचानक बाजूला करून राकट, दणकट आणि भव्य रूपात, पांढऱ्या-करडय़ा रंगात आसमंत समोर उभा ठाकतो. प्रथमदर्शनी एकसुरी वाटणारं हे रूप निरखून पाहायला लागलो की अनेक रंगछटांचं दिसतं. राखाडी, करडा, हलका केशरी, शुभ्र, मातकट, आकाशाचा निळा, डोंगराचा पिवळा अशा कित्येक छटा त्यात दिसतात.