दिवाळी दणक्यात सुरू आहे आणि सगळीकडे ऑनलाइन खरेदीचा धूमधडाका सुरू आहे. घडय़ाळापासून कारपर्यंत सर्व वस्तूंवर सूट असून त्यासोबत आकर्षक भेटवस्तूही दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे सायकल आणि सायकलिंगशी निगडित वस्तूंवरही भरघोस सूट काही संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या सायकलसाठी तुमच्याकडे नसलेल्या गोष्टी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी या संधीचा फायदा घ्यायला हरकत नाही. त्यानिमित्ताने आपण सायकलिंगच्या ऑनलाइन जगात थोडं डोकावणार आहोत.

सायकल किंवा सायकलिंगसाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेणं, सायकल राइड रेकॉर्ड करणं, ब्लॉग, संबंधित बातम्या, व्हिडीओ किंवा फिटनेससाठी ऑनलाइनच्या चावडीत डोकावणं गरजेचं झालं आहे. पर्यावरणपूरक वाहन म्हणून जगभर सायकलचा वापर वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत तर सायकल ही शहराच्या व्यवस्थापनाचाच भाग आहे. एखादी पायाभूत सुविधा उभारताना त्यामध्ये सायकलस्वरांनाही गृहीत धरलं जातं. त्यामुळे जे काही पेपरवर आहे ते सर्व आपल्याला ऑनलाइनही पाहायला मिळतं. सायकलसाठी असणारे नियम, कायद्यांची माहिती शासकीय संकेतस्थळांवर मिळते. अनेक ठिकाणी  शहरातील आणि आजूबाजूंच्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी सायकल सफरींचे आयोजन करण्यात येते. या लहान-मोठय़ा सायकल सफरींची माहिती आणि बुकिंगही ऑनलाइन करता येते.

सर्व जग आता जणू तुमच्या मोबाइलमध्ये सामावलेले आहे. सायकलिंगसाठीचे वेगवेगळे मोबाइल अ‍ॅप उपलब्ध असून त्यामध्ये रोजच्या राइड रेकॉर्ड करता येतात आणि फिटनेससंबंधी अपडेट्स मिळवता येतात. राइड रेकॉर्ड करताना तुम्ही किती अंतर पार केलं, वेळ, चढ-उतार, वेग, केडन्स, हृदयाचे ठोके मोजणे आणि तुम्ही किती कॅलरीज वापरल्या अशा अनेक गोष्टींची नोंद केली जाते. तुम्ही सायकलिंग केलेला एखादा ट्रेल ऑफलाइन सेव्ह करायची आणि नंतर तो गुगल मॅपवर टाकण्याचीही सोय काही अ‍ॅपमध्ये आहे. याशिवाय सायकलिंग करताना तुमची झोप मॅनेज करणारेही अ‍ॅप आहेत. सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे आणि व्यायाम करताना खाण्यावर नियंत्रण ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी कधी, केव्हा आणि काय खावं हे सांगणारे अ‍ॅप तर आहेत. सायकल चालवताना गरज भासल्यास वैद्यकीय मदत मिळावी यासाठीही विशेष अ‍ॅप डिझाईन करण्यात आली असून तुमच्या आरोग्याची सर्व माहिती त्यात साठवता येतेच, शिवाय जवळच्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक, रुग्णालयांची यादीसुद्धा यामध्ये असते. (भारतीय सायकलस्वारांसाठी अद्याप असे अ‍ॅप नसले तरी भविष्यात याच धर्तीवर असे अ‍ॅप यायला हरकत नाही.) सायकलसाठीच्या पायाभूत सुविधा लक्षात घेता भारतात फार मोजकी मोबाइल अ‍ॅप वापरली जातात. त्यापैकी स्ट्रावा, मॅप माय राइड, एन्डोमोन्डो, बाइक कॉम्प्युटर, गुगल फिट, सायकलिंग न्यूज या अ‍ॅप्सना सायकलस्वारांची सर्वाधिक पसंती दिसते. अलीकडेच मुंबईतील सायकलस्वारांसाठी फायदेशीर ठरेल असे ‘द स्मार्ट कम्युट’ आणि नाशिक सायकलस्वारांसाठी ‘नाशिक सायकलिस्ट’ ही अ‍ॅप्स मोबाइलवर दाखल झाली आहेत.

‘हाऊ टू’ म्हणजेच एखादी गोष्ट कशी करायची याचे लाखो व्हिडीओ सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामध्ये सायकलही मागे नाही.

आधुनिक सायकल बनवणाऱ्या सर्व कंपन्यांनी आपल्या सर्व मॉडेल्सची आणि त्याच्या प्रत्येक भागांची माहिती, फोटो आणि ऑनलाइन स्वरूपात ठेवली असून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही ते जाणून घेऊ शकता. जगभरात होणाऱ्या सायकल स्पर्धाची माहिती एका क्लिकवर तर मिळतेच, पण त्या स्पध्रेत सहभागी झालेल्या तुमच्या आवडत्या सायकलस्वारालाही ट्रॅक करू शकता. याशिवाय सध्या संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप) सायकलिंगसंदर्भात भरपूर माहिती क्षणोक्षणी मिळत असतेच.

prashant.nanaware@expressindia.com

Twitter – @nprashant