29 May 2020

News Flash

वन पर्यटन : पैनगंगा अभयारण्य

२५ फेब्रुवारी १९८६ ला ३२४.६२ चौ.कि.मीचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

जंगलात पावलापावलांवर निसर्गाची अद्भुत रूपं आणि रहस्यं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील बहुतेक अभयारण्यांमध्ये पर्यटनाला भरपूर वाव आहे. असेच वन पर्यटनाची अनोखी साद घालणारे अभयारण्य म्हणजे पैनगंगा. यवतमाळ आणि नांदेड जिल्हा यांना जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेले संरक्षित जंगल म्हणजे पैनगंगा. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले हे एकमेव अभयारण्य असावे.

यवतमाळ जिल्ह्यच्या उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीकाठी वसलेल्या या अभयारण्याला भरपूर जैविक समृद्धी लाभली आहे. नांदेड जिल्ह्यत या वनाचा काही भाग येतो. अनेक वृक्षवेलींची आणि औषधी वनस्पतींची रेलचेल असलेलं हे अभयारण्य हिरवागार शालू नेसून नटले आहे की काय असं वाटावं इतकं हिरवंगार आहे. विविध प्रजातीचे पशुपक्षी इथं आहेत. पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद ज्यांना घ्यायचा आहे, त्यांना पैनगंगा अभयारण्याच्या कुशीत लपलेला सहस्रकुंड धबधबा खुले निमंत्रण देत असतो.

२५ फेब्रुवारी १९८६ ला ३२४.६२ चौ.कि.मीचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर २००१४ ला १००.२७ चौ.कि.मीचे विस्तारित क्षेत्र मिळून ४२४.८९ चौ.किमीच्या क्षेत्रावर हे अभयारण्य वसले आहे.

श्यामा कोलामचीची टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.  उत्तम पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन, मोहा, साग, साजड, सूर्या, हलदू इत्यादी अनेक वृक्ष आहेत. अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती आहेत. कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर, चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठय़ा संख्येत दिसतात.

अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, यासारखे सरपटणारे प्राणी ही आहेत. अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, घनवर किंवा हळदी कुंकू (स्पॉटबिल बदक), जकाना, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन यांसारख्या पक्ष्यांनी हे अभयारण्य सजले आहे. पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमांना जोडणाऱ्या या अभयारण्यात जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्टेशन किनवट, नांदेड आणि अकोला आहे. तीन चार दिवसांचा वेळ असेल तर नांदेडमधील गुरु गोिवद सिंह साहिबांचा गुरुद्वारा, साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेली माहुरची रेणुकामाता, माहुरगड किल्ला. रामगड किल्ला. विष्णुपुरी धरण आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला कंधार किल्ला पाहायला हरकत नाही. लोहा तालुक्यातील खंडोबाची यात्रा आणि इथला घोडय़ाचा बाजार ही प्रसिद्ध आहे. बारा ज्योतिर्लिगांपकी एक औंढा नागनाथ, शिरड शहापूर येथलं मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर, नामदेवांचं जन्मस्थळ गाव नरसी, तुळजादेवी मंदिर ही आपण पाहू शकतो.

काही जवळची ठिकाणे

  • नांदेड किनवट रस्त्यावर किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा.
  • किनवटपासून ३५-४० कि.मी. अंतरावर उनकेश्वर येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे.
  • उनकेश्वरहून जवळच देवीच्या साडेतीन पीठांपकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर.
  • किनवटपासून १८ किमी अंतरावर पेंदा नागढव येथे शिवमंदिर आहे. पेंदा नागढव येथे जाण्यासाठी किनवटवरून रिक्षा उपलब्ध आहेत.

कसे जाल?

किनवट पासून उमरखेड ३५ किमी अंतरावर आहे. या रस्त्याने अभयारण्याला जाता येते. पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळहून सुमारे १५० किमीवर आहे. यवतमाळ-उमरखेडमाग्रे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमाग्रे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गावर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. जवळचे रेल्वेस्टेशन नांदेड आहे, तर जवळचे विमानतळ नांदेड आणि औरंगाबाद आहे.

drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2017 10:21 am

Web Title: painganga wildlife sanctuary
Next Stories
1 मुघल स्थापत्याचा हबशी महाल
2 लोक पर्यटन : दुर्लक्षित दुर्गालेणे
3 जायचं, पण कुठं? : सातपुडय़ातला आंबागड
Just Now!
X