यंदा पुन्हा महाराष्ट्रात दुष्काळस्थिती आहे. सध्या सर्वाना मान्सूनचे वेध लागले असले तरी मान्सून महाराष्ट्रात १० जूननंतरच येईल, असा अंदाज आहे. खालावलेली भूजल पातळी, कोरडय़ा पडलेल्या विहिरी व नद्या आणि धरणांतील आटलेला जलसाठा यामुळे ‘पाण्यासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा’ अशी स्थिती आहे.
अशाच एका आटलेल्या धरणाच्या खोऱ्यात आम्ही गाडी घातली. धरणपात्रातील जमीन कोरडीठाक पडून भेगाळलेली होती. तरीही त्यावर गाडी चालविताना गाडी कुठे फसणार तर नाही ना, अशी भीती होती. भीमानदीच्या पात्रातील सुपीक गाळ आपल्या शेतात टाकण्यासाठी नेण्यात येत होता. ग्रामस्थांना विचारलं तेव्हा त्यांनी लांबवर दिसणाऱ्या खोपटांकडे हात दाखवत तिकडे जाण्याचा सल्ला दिला. पुणे-सोलापूर मुख्य रस्त्यावरूनच लांबवर दृष्टीस पडलेले पळसनाथचे मंदिर आता जवळ येत होते. नदीपात्रातील पाण्याच्या साठय़ाला वळसा घालून त्या देवळाच्या दिशेने आणखी दोन किलोमीटर पुढे गेलो ते थेट देवळाच्या दाराशी.
पुणे-सोलापूर मार्गावर भिगवणच्या पुढे जवळपास १५ किलोमीटरवर उजनी धरणाच्या पाणीक्षेत्रातील पाणीसाठा आटला की धरणाच्या पाणीसाठय़ात बुडालेले पळसनाथचे चालुक्यकालीन मंदिर पुन्हा अवतीर्ण होते. काळेवाडी येथे विस्थापित झालेल्या वस्तीपासून ५-७ किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात भेट देता येते ती धरणक्षेत्रातील पाणीसाठी आटल्यावर म्हणजे दुष्काळस्थितीत. अशी परिस्थिती ३५ वर्षांपूर्वी उद्भवली होती तेव्हाशी हे मंदिर पाण्याबाहेर झळकू लागले होते.
हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरणच. उजनी धरण बांधण्यात आल्यामुळे हे चालुक्यकालीन मंदिर पाण्याखाली गेले. मूळ पळसदेव गावाची वस्ती काळेवाडी येथे विस्थापित झाली. देवाची मूर्तीही आधुनिक विस्थापित मंदिरात स्थानापन्न झाली. पुरातन मंदिर मात्र पाण्याखाली गेले. मंदिराच्या कळसाचा ८ ते १० फुटांचा भागच धरणाच्या पाण्यात कायम दिसतो, असे ग्रामस्थ सांगतात. मूळ पळसदेवाच्या दर्शनासाठी जाणारे ग्रामस्थही कळसाचे दर्शन घेऊन परतात. यंदा मात्र मंदिरात आत जाऊन संपूर्ण मंदिर फिरण्याचा योग दुष्काळामुळे आला. इतकी वष्रे पाण्याखाली राहूनही मंदिर आणि परिसर स्वच्छ असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. मुख्य मंदिरालगतच काही लहान मंदिरेही होती. ती अजूनही पाण्याखालीच आहेत. त्यापैकी एक असलेले राममंदिर बरेच वर असल्याने पाण्याबाहेर आले आहे. मात्र, पळसनाथच्या मुख्य मंदिरातून राममंदिरला जाण्यासाठी होडीतून १० मिनिटे प्रवास करावा लागतो.
राममंदिराचे कोरीव काम सुंदर आहे. संपूर्ण रामायणातील विविध कथांचे प्रसंग मंदिरात कोरण्यात आले आहेत. मंदिर लहान असून, बांधकाम सुरक्षित आहे. मात्र, मंदिराचा घुमट पूर्णपणे नष्ट झाला आहे. अप्रतिम शिल्पकाम केलेल्या अनेक शिळा इतस्तत: विखुरलेल्या दिसतात. आता १० जूननंतर पाऊस येईल. धरणीमाता पाणी पिऊन तृप्त झाली की भीमा नदीपात्रात आणि उजनी धरणात पाणीसाठा वाढू लागेल आणि एक उत्तम प्राचीन ठेवा नजरेआड होईल. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढेपर्यंत हे मंदिर पाहता येईल.
अनिता गोखले gokhaleanita312@gmail.com