News Flash

पेंग्विन परेड

बऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला.

पेंग्विन परेड
फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. तिथल्या छोटय़ाशा फेअरी पेंग्विन पक्ष्यांच्या जीवनविश्वात डोकावणे हे परीकथेतल्या स्वप्ननगरीसारखे आहे.

ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेस ‘ग्रेट बॅरियर रीफ’ नावाची सागरी प्रवाळांची एक प्रचंड मोठी भिंत समुद्रात उभी आहे, आणि ती तब्बल ३ हजार किलोमीटर लांबीची आहे, असे शालेय पुस्तकांतून लहानपणी वाचले होते. ही बॅरियर रीफ आणि मागच्या दोन पायांवर उडय़ा मारत चालणारे कांगारू, या दोन गोष्टींव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया या देशात बघण्याजोगे असे फारसे काही नाही अशी आमची समजूत होती. पण, काही वर्षांपूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियात जायचे ठरवल्यानंतर माहिती घ्यायला लागलो, तेव्हा लक्षात आले की त्या खंडप्राय देशात अनुभवण्याजोग्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. पूर्वेकडचे घनदाट कुरांडा पर्जन्यवन, रंगीबेरंगी फुलपाखरांचे अभयवन, गरम हवा भरलेल्या बलूनद्वारे केली जाणारी हवाई सफर, पश्चिमेकडील एन्ट्रन्स नामक गावात अनुभवता येणारा पेलिकन् पक्ष्यांचा ‘माहेरवास’, अशा कितीतरी अद्भुतरम्य गोष्टी तिथे आहेत. तिथल्या फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ हीदेखील एक लक्षणीय अशी घटना आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागात न्यू साउथ वेल्स प्रांतातील मेलबर्न शहराच्या दक्षिणेस दोन तासांच्या अंतरावर फिलिप आयलंड नावाचे एक छोटेसे बेट आहे. सुमारे २६ कि.मी. लांबीच्या या बेटामुळे न्यू साउथ वेल्सच्या किनारपट्टीवर येऊ घातलेल्या मोठमोठय़ा समुद्री लाटा अडवल्या जातात आणि त्यामुळे या किनारपट्टीचे संरक्षण होते. हे फिलिप आयलंड कॉन्क्रीटच्या पुलाद्वारे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीशी जोडले गेलेले आहे. या बेटावर फेअरी पेंग्विन पक्ष्यांची मोठा अधिवास आहे. फेअरी पेंग्विन ही आकाराने अगदी छोटे असणाऱ्या पेंग्विन्सची एक जात. जेमतेम सव्वा फूट उंचीचे हे छोटे पेंग्विन पक्षी मोठय़ा एम्परर-पेंग्विनच्या पिलांसारखे दिसतात. पूर्ण वाढ झालेल्या फेअरी पेंग्विन्सची पाठीची बाजू निळसर करडय़ा रंगाची असते. त्यामुळे त्यांना लिट्ल ब्ल्यू पेंग्विन असेही म्हणतात. हे छोटे पेंग्विन्स ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि तास्मानिया या देशांच्या काही ठरावीक भागांत आढळतात. आग्नेय ऑस्ट्रेलियातील फिलिप आयलंड हे त्यांच्या वस्तीचे असेच एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे फेअरी पेंग्विन्स तिथल्या खडकाळ जमिनींतल्या बिळांमध्ये, झाडांच्या ढोल्यांमध्ये, किंवा खडकांच्या कपारींमध्ये घरटी करून राहतात. साधारणत: दहा-बारा घरटय़ांचा समूह म्हणजे एक वसाहत, याप्रमाणे फिलिप बेटावर या पेंग्विन्सच्या अनेक वसाहती तयार झालेल्या आहेत. काही घरटय़ांत या पेंग्विन्सची अंडी असतात, तर काहींमध्ये अगदी छोटी पिले आपल्या जन्मदात्यांची वाट बघत बसलेली असतात. दररोज सकाळी हे फेअरी पेंग्विन्स समुद्रात उतरून पोहत पोहत दूरवरच्या सफरीला जातात. भल्या पहाटे सूर्योदयापूर्वीच ते घरट्यातून बाहेर पडतात, आणि समुद्रात साधारणत: १५ ते २० मलांपर्यंतचा पल्ला गाठतात. दिवसभरात ही दूरवरची समुद्र-सफर पूर्ण करून अगदी सूर्यास्ताच्या सुमारास ते घरी परत येतात. एवढा वेळ पाण्यात पोहत राहायचे असल्याने त्यांना आपल्या पिसांची योग्य मशागत राखणे गरजेचे असते. त्यासाठी ते स्वत:च्या शेपटाकडील भागात असणाऱ्या तलग्रंथींमधील तेलकट द्रव चोचीने आपल्या पिसांवर लावत असतात. समुद्रात पोहत असताना ते पाण्यात खोलवपर्यंत सूर मारू शकतात. पण थोडा वेळ पाण्याखाली राहून पुन्हा लगेच पृष्ठभागाशी येतात. दिवसभर ते अन्न शोधतात, स्वत: पोटभर खातात आणि संध्याकाळी परत येताना आपल्या पिलांसाठी तोंडभरून खाद्य घेऊन येतात. बांगडे, पेडवे यांसारखे मासे, छोटे खेकडे आणि िझगे हे या पक्ष्यांचे नेहमीचे खाद्य असते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे फेअरी पेंग्विन्स जेव्हा फिलिप बेटावर परत येतात, ते दृश्य मोठे बघण्याजोगे असते. दहा-बाराच्या गटांनी पोहत येऊन हे पक्षी किनारा चढून वर येतात आणि आपापल्या घरटय़ात पोहोचतात. घरटय़ाकडे जाताना एकमेकांना हाका मारल्यासारखे ओरडत परस्परांच्या सोबतीनेच ते चालतात. त्यांची ही सामूहिक घरवापसी बघण्यासाठी सूर्यास्ताच्या तासभर आधी या फिलिप बेटावर देशोदेशीचे पर्यटक येतात. आणि तिथल्या किनाऱ्याजवळ या घरपरतणीच्या जागेपासून थोडे अंतर राखून तिथे बैठक मारतात. तिथे दररोज अगदी मर्यादित संख्येनेच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. फार मोठय़ा आवाजात बोलण्यास तिथे बंदी आहे, गडबड-गोंधळ केलेला चालत नाही. तसेच तिथे फोटो काढण्यासही मनाई आहे. तिथे गेल्यावर सुमारे अर्धा तास आम्ही वाट पाहत शांतपणे बसून राहिलो. सूर्य मावळण्याच्या बेतात होता. फेसाळ लाटा त्या बीचवर येऊन आदळत होत्या. बराच वेळ झाला तरी काही घडत नव्हते. काही वेळाने सूर्य जमिनीला टेकला. संधिप्रकाशाने अवघी पुळणी व्यापून गेली. आणि अचानक तिथे जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली.

सगळे डोळे ताणताणून किनाऱ्याकडे पाहू लागले. पण तिकडच्या फेसाळ लाटांमुळे सुरुवातीला काहीच स्पष्ट दिसेना. सगळ्यांची उत्सुकता खूप ताणली गेली. मग काही वेळाने किनाऱ्यापलीकडे समुद्रात काही अस्पष्ट हालचाली दिसू लागल्या. चोची उंचावून लाटांसोबत वरखाली होणारी छोटी डोकी, फडफडवलेले इवले पंख आणि शुभ्र फेसाळ पाण्यातून हळूहळू पुढे सरकणारी करडी-काळी पक्ष्यांची रांग आता दिसू लागली. त्यांनी घोगऱ्या स्वरात काढलेले ‘‘ऑ.ऑऽऽ’ असे आवाज ऐकू येऊ लागले. आणि मग त्या फेसाळ लाटांवर शिस्तशीर तरंगत पोहत किनाऱ्याकडे येणारे फेअरी पेंग्विन्स दिसू लागले. त्यातले आघाडीवरचे काही पक्षी किनाऱ्याला लागले आणि आपल्या पसरट पायांनी तिथल्या पांढऱ्या वाळूवरून खुरडत खुरडत चालू लागले. दहा-बारा पेंग्विन्सची ती पहिली बॅच परेड केल्यासारखी रांगेने चालत चालत आमच्या दिशेने आली, आणि आपल्याच नादात आमच्याकडे ढुंकूनही न पाहता पुढे गेली. मग त्यानंतर दुसरी आणि तिसरी, अशा अनेक बॅचेसमध्ये हे इवलेसे पेंग्विन्स बेटावर दाखल झाले आणि आपापल्या वसाहतींकडे गेले. तो सारा परिसर त्यांच्या ‘‘ऑ.ऑऽऽ.ऑ.ऑऽऽ..ऑ.ऑऽऽ’’ अशा ओरडण्याने व्यापून गेला. बऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला. त्यातले काही चोचींनी पिलांना गोंजारू लागले. काही घरटय़ांतल्या अंडय़ांना पंखांखाली घेऊन शांतपणे बसून राहिले. त्यांची ही सारी लगबग बघत आम्ही सारे नि:शब्द बसून राहिलो. थोडय़ा वेळाने अंधार झाला. तिथे दिवे तर नव्हतेच, पण टॉर्च वगैरेही वापरायची परवानगी नव्हती. धूसर काळोखात आणि पक्ष्यांच्या अनोख्या नादरवात बुडालेल्या त्या अद्भुत बेटाचा, आणि तिथल्या छोटय़ाशा फेअरी पेंग्विन पक्ष्यांचा निरोप घेताना एखाद्या परीकथेतल्या स्वप्ननगरीतून वास्तवातल्या निष्ठुर जगात परत जात असल्याची भावना मनात होती.

विजय दिवाण vijdiw@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2017 3:48 am

Web Title: penguins parade at phillip island in australia
Next Stories
1 लोक पर्यटन : दुर्गाडी-नीरबावी
2 जायचं, पण कुठं? : आरकू व्हॅली, बोरा केव्हज
3 टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर
Just Now!
X