News Flash

वर्षां भटकंती

मुंबई-पुणे लोहमार्गावरील बोरघाटाच्या सुरुवातीलाच डावीकडे जो डोंगर उठावलेला दिसतो तो म्हणजे सोनगड.

सोनगिरी – आवळसचा किल्ला
मुंबई-पुणे लोहमार्गावरील बोरघाटाच्या सुरुवातीलाच डावीकडे जो डोंगर उठावलेला दिसतो तो म्हणजे सोनगड. यालाच सोनगिरी अथवा आवळसचा किल्ला असेही म्हटले जाते.
सोनगिरीला जाण्यासाठी खोपोली लोकलने पळसदरी स्थानकात उतरावे. येथून लोहमार्गाला समांतर चालू लागावे. बोरघाटाची चढण सुरू होण्याआधी नाल्यावर बांधलेला एक पूल लागतो. या पुलाशेजारून जाणारी पायवाट २० मिनिटांत नावली गावात जाते. गडावर जाणारी पायवाट नावलीतूनच आहे. फारसा चर्चेत नसल्यामुळे गड पाहायला क्वचितच कोणी येत असते. त्यातच पावसाळ्यात गवत वाढून पायवाटा लुप्त होतात. त्यामुळे सोबत माहीतगार असलेला केव्हाही उत्तम. डोंगर सोंडेवरून चढत जाणाऱ्या वाटने साधारण दोन तासात गडमाथा गाठता येतो. किल्ला म्हणावा असे फारसे बांधकाम या ठिकाणी आढळत नाही. पाण्याची कोरडी टाकी, तटबंदीचे निखळलेले दगड आणि एका कोपऱ्यातील एक छोटीशी गुहा एवढेच काय ते अवशेष शिल्लक आहेत. गड चढाई करताना बोरघाटातून जाणारी आगिनगाडी आपल्या लांबवरून सदैव आपली सोबत करत असते. गडमाथ्यावर पोहोचताच अंगाला झोंबणारा गार वारा आपणास ताजातवाना करतो. सभोवातालच्या हिरव्यागार टेकडीवरील चरणाऱ्या शेळ्या-मेंढय़ा आणि बोरघाटातील बोगद्यातून सुरू असलेला आगगाडय़ांचा लपंडाव पाहताना वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही.

सोंडाई किल्ला
कर्जत-चौक रस्त्यावरून दिसणाऱ्या माथेरानच्या डोंगरासमोरील टेकडीवर सोंडाईदेवीचे स्थान आहे. हाच तो सोंडाई किल्ला. चौक-कर्जत रस्त्यात बोरगाव फाटा लागतो. या वाटेने आत गेल्यावर मोरबे धरणाच्या जलाशयाच्या बाजूने वळणावळणाच्या रस्त्याने जाणारा रस्ता सोंडाईवाडीपाशी संपतो. वाडीपर्यंत येतानाच आपण जवळपास अर्धा अधिक डोंगर चढून आलेलो असतो. सोंडाईवाडीपर्यंत हलकी वाहनं सहज येतील असा रस्ता आहे. येथून गडमाथा गाठायला फार फार तर तासभर लागतो. गावा बाहेरूनच सुरू होणारी ठळक पायवाट टप्प्याटप्प्याने चढत माथ्याकडे घेऊन जाते. गडमाथ्याखालील टप्प्यात कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. येथूनच पुढे एक लेणी सदृश्य खोदकाम आढळते. गडमाथ्यावर पोहोचायचा शेवटचा टप्पा जरा बिकट असून हल्लीच तेथे एक लाकडी शिडी बसवण्यात आली आहे. थोडंसं साहस करायचं असेल आणि झेपणार असेल तरच त्यावर चढून वर जावं. अन्यथा शिडीपर्यंतच्या टप्प्यावरून सभोवतालचा नयनरम्य नजारा अनुभवावा. गडमाथ्यावर सोंडाईदेवीचे छोटेसे मंदिर आहे. येथून माथेरानची गर्द झाडीने नटलेली हिरवीकच्च डोंगररांग अगदी जवळून पाहता येते.

परतीच्या वाटेवर एकतर पुन्हा सोंडाईवाडीत येता येते किंवा मग रानवाटेने कर्जत चौक रस्त्यावरील बोरगावला जाता येते. पण हा पल्ला बऱ्यापैकी वेळ खाणारा आहे. मात्र दरीत कोसळणाऱ्या ओढय़ामुळेही भटकंती आनंददायी आहे.

डय़ूक्स नोज अर्थात नागफणी
जुन्या खंडाळा घाटातून दिसणारे नागाच्या फण्यास्वरूप आकाशात उंच उठावलेला डय़ूक्स अगदी सहजच लक्ष वेधून घेतो. ब्रिटिश राजवटीत कोण्या एका इंग्रजी पाहुण्याच्या खंडाळा भ्रमंतीदरम्यान त्याच्या आदरार्थ या सुळक्याला पाहुण्याचे नाव म्हणजेच डय़ुक्स नोज हे नाव बहाल झाले. नागफणी डोंगराच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर एखाद्या अतिउंच इमारतीच्या छतावरून पाहावा तसा अनुभवता येतो. पावसाळ्यात बहुतांश वेळी हा धुक्याच्या दुलईत गुरफटलेला असतो. वाऱ्याच्या झोतासोबत पळणाऱ्या ढगांच्या लोंढय़ाआडून अधूनमधून डोकावणारे खंडाळा घाटातील वळणा वळणाचे रस्ते आणि त्याखाली दरीतून वाहणारी अंबा नदी असा नजर खिळवून ठेवणारा देखावा पाहत अंगावर बोचऱ्या वाऱ्याचे फटकारे झेलत येथे निसर्गावलोकनात रममाण होणे हे अनोखा आनंद देणारे आहे.
लोणावळ्यापासून चार किलोमीटर अंतरावरील कुरवंडे गावातून अवघ्या अध्र्या तासाची सोपी चढाई नागफणी शिखराच्या माथ्यावर घेऊन जाते किंवा खंडाळा स्टेशनवरून चालत कारवीच्या जंगलातून दोन-अडीच तासांची मध्यम चढाई आपणास माथ्यावर घेऊन जाते. वाटेत दोन-तीन ओढे ओलांडून जावे लागतात. पावसाचा जोर जास्त असल्यास ओढे ओलांडणे धोक्याचे ठरू शकते. पाण्याचा अंदाज घेऊन मगच पुढे पाय टाकावा अन्यथा सुरक्षिततेच्या दृष्टीने परत फिरणे केव्हाही इष्टच.
प्रीती पटेल – patel.priti.28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 6:21 am

Web Title: place for trekking in maharashtra
Next Stories
1 सौंदर्य दीपमाळांचे
2 ऑफबीट क्लिक
3 जायचं, पण कुठं? : मिझोराम
Just Now!
X