12 August 2020

News Flash

ग्रह, गर्भ, गिरकी..

वडोदरा असो वा अहमदाबाद. नवरात्रीत संध्याकाळी सातपासून इथल्या वाहतुकीचा रंगच बदलून जातो.

युनायटेड हा वडोदरातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित गरबा.

मधोमध तळपता सूर्य आणि गिरक्या घेत त्या आगीच्या गोळ्याभोवती फेर धरणारे ग्रह. गरबा म्हणजे या आदिम गिरकीचे प्रतीक. कोणाच्या मते मधोमध ठेवलेले पात्र म्हणजे गर्भ आणि आत तेवणारा दिवा म्हणजे गर्भात वाढणारा जीव, तर कोणी म्हणते की नृत्याचे अखंड वर्तुळ म्हणजे जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माचा न चुकणारा फेरा.. गरब्यात रंगलेला गुजरात पाहताना, असे अनेक अर्थ उलगडत जातात. नवरात्रीच्या निमित्ताने गुजरातच्या पर्यटन मंडळाने हा नऊ दिवसांचा नृत्योत्सव पर्यटकांपुढे सादर केला आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत नवरात्रीत गुजरात आणि छत्तीसगड सरकार परस्परांच्या परंपरा, लोककलांची देवाणघेवाण करत आहेत.

वडोदरा असो वा अहमदाबाद. नवरात्रीत संध्याकाळी सातपासून इथल्या वाहतुकीचा रंगच बदलून जातो. भडक रंगांच्या चनिया-चोली, उठावदार दागिने, परिपूर्ण साजशृंगार केलेल्या शेकडो तरुणी आपापल्या दुचाकीवरून गरबा खेळायला निघतात. मुलगेही त्यांच्याच तोडीचे केडियू, पगडी घालून सज्ज असतात. मोठी मैदाने, सभागृहे, सोसायटय़ा, मंदिरांची प्रांगणे अगदी गल्लीबोळांतही गरबा रंगतो. हा गरबा पाहण्यासाठी देश-विदेशांतील पर्यटक अहमदाबाद, सुरत, वडोदरा येथे येतात.

युनायटेड हा वडोदरातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित गरबा. यात सहभागी होण्यासाठी मुलींना ३०० रुपये आणि मुलांना ३००० रुपयांचे तिकीट काढावे लागते. दरांतील ही तफावत यासाठी की, गरबा म्हणजे स्त्रीशक्तीची पूजा. त्यामुळे त्यांना अतिशय माफक दरात प्रवेश मिळतो. नेत्रदीपक देखावे, प्रभावी प्रकाशयोजना आणि खणखणीत संगीत यासाठी हा गरबा ओळखला जातो. रोज सुमारे पाच ते आठ हजार नर्तकांची गर्दी इथे होते. अतुल पुरोहित यांची गरब्याची गीते हे इथले विशेष आकर्षण. दर वर्षी नवनव्या गीत आणि संगीतरचना घेऊन त्यांची टीम गरबा नर्तकांना भुरळ पाडते.

रोज अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यातील विजेत्यांना पारितोषिके दिली जातात. ‘युनायटेड’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक जण आपली छायाचित्रे पोस्ट करतात. यापैकी निवडक छायाचित्रे गरब्याच्या ठिकाणी पडद्यावर दाखवण्यात येतात.

‘महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा’च्या फाइन आर्ट्स विभागाचा गरबा हा युनायटेड गरबाच्या पूर्ण विरुद्ध स्वरूपाचा आहे. इथले रहिवासी त्याला प्राचीन गरबा म्हणून ओळखतात.

फाइन आर्ट्स विभागाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही या गरब्यात प्रवेश नाही. गरब्यासाठी मैदान तयार करणे, खुर्च्या मांडणे, ध्वनियोजना असे सर्वकाही हे विद्यार्थीच करतात. इथे कर्कश संगीत नसते. केवळ एक ध्वनिवर्धक, त्याच्या समोर वाजणारी पारंपरिक वाद्ये आणि पारंपरिक शैलीत गरब्यात मग्न झालेले विद्यार्थी! गेल्या ३० वर्षांत आपल्या गरब्याला प्रायोजक, तिकीट, प्रसिद्धी, सेलिब्रिटी या सगळ्यापासून दूर ठेवण्यात फाइन आर्ट्स फॅकल्टी यशस्वी झाली आहे आणि तरीही त्यांच्या गरब्याविषयी प्रचंड कुतूहल कायम आहे. गुजरातमधील प्राचीन मंदिरे, वडोदरा येथे सयाजीराव गायकवाड यांनी उभारलेली संग्रहालये, थंड हवेची ठिकाणे, साबरमती रिव्हर फ्रंट अशी अनेक पर्यटनस्थळे गरब्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या पर्यटकांना आकर्षित करतात.

नृत्यशैली

मधोमध देवीची मूर्ती किंवा दिवा असणारा घट ठेवून त्याभोवती फेर धरून स्वत:भोवती गिरकी घेत फेर धरला जातो. संपूर्ण वर्तुळ एका लयीत गरब्याच्या स्टेप्स करत राहते. एकाने स्टेप बदलली की वर्तुळातील बाकीचे सर्व नर्तकही ताबडतोब त्या पद्धतीने नृत्य करू लागतात. हजारो नर्तक असूनही आणि आधी तालीम केलेली नसतानाही त्यांच्यात दिसणारा समन्वय विस्मयकारक असतो. इथल्या गरब्याच्या तऱ्हा विविध आहेत. कधी ते जोडीने नृत्य करतात. यात जोडीतील दोन्ही नर्तक एकसारखी वेशभूषा करतात आणि एकमेकांशी गरबा खेळतात. ‘सनेडो’ हा आणखी एक प्रकार आहे. यात गरबा पूर्ण रंगात आलेला असताना अचानक संगीत थांबवले जाते. सर्व नर्तक जमिनीवर बसतात आणि एक छोटीशी लोककथा सांगितली जाते. ती संपताक्षणी पुन्हा संगीत सुरू होते आणि हजारो नर्तक क्षणार्धात उभे राहून पुन्हा नृत्यात मग्न होतात. काही भागांत देवीच्या मंदिराची लाकडी प्रतिकृती डोक्यावर घेऊन, तर काही भागांत एकावर एक ठेवलेल्या घागरी डोक्यावर घेऊन नृत्य केले जाते. या नर्तकांची एकाग्रता वाखाणण्याजोगी असते.

रंगलेले बाजार

नवरात्रीत अहमदबादमधील लॉ गार्डन, वडोदरा येथील, न्यायमंदिर आणि मंगल बजार या बाजारांत स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी उसळते. पदपथांवर चनिया चोली, केडियू, पगडी, पारंपरिक दागिने, दांडिया.. गरब्यासाठी लागणाऱ्या यच्चयावत सर्व वस्तू इथे स्वस्तात मिळतात. भडक रंग आणि आरशांची सजावट हे सर्व कपडे आणि दागिन्यांचे वैशिष्टय़. रात्री साधारण ११ पर्यंत हे सर्व रस्ता बाजार सुरू राहतात. पर्यटक पारंपरिक कपडे आणि दागिने खरेदी करण्यात हरवून गेलेले दिसतात.

विजया जांगळे vijaya.jangle@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2017 4:48 am

Web Title: places in gujarat for navratri 2017 celebrations
Next Stories
1 जर्मनीचे कलाप्रेम
2 वन पर्यटन : कोका अभयारण्य
3 चिंब भटकंती : कावनई तीर्थ
Just Now!
X