यापूर्वी आपण सायकल स्पर्धाचा इतिहास आणि टूर डी फ्रान्स या जगप्रसिद्ध स्पध्रेविषयी जाणून घेतलं. गेल्या शतकभराच्या काळात अनेक सायकल स्पर्धा सुरू झाल्या आणि बंदही पडल्या. तर काही अविरतपणे सुरू असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धा जितकी कठीण तितका त्यामधील थरार अधिक असतो. ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही सायकल स्पर्धा त्यापकीच एक.

‘टूर दी फ्रान्स’ या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीमध्ये जवळपास ३५०० ते ४००० किलोमीटर अंतर १९ टप्प्यांमध्ये २१ दिवसांत पूर्ण करायचे असते. परंतु ‘रेस अक्रॉस अमेरिका’ स्पर्धेत ४८०० हे अंतर एकाच टप्प्यात सलग १२ दिवसांमध्ये पार करताना संपूर्ण अमेरिका खंड पालथा घालायचा असल्याने ही जगातील आणि इतिहासातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा मानली जाते. स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतात तीन स्पर्धा आहेत. डेझर्ट ५००, डेक्कन क्लीफ हँगर आणि बंगळुरू ते उटी. या स्पर्धामध्ये तुम्हाला ३२ ते ३३ तासांमध्ये स्पध्रेच्या सर्व नियमांचं पालन करत ६०० किलोमीटर अंतर पार करायचे असते. दरम्यान, एकदा का तुम्ही पात्र ठरलात तर तुमची ती पात्रता स्पध्रेच्या पुढील तीन वर्षांसाठी ग्राह्य़ मानली जाते.

‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही अल्ट्रा मॅरेथॉन सायकल स्पर्धा १९८२ साली जॉन मारिनो यांनी ‘ग्रेट अमेरिका बाइक रेस’ या नावाने सुरू केली. त्यामध्ये स्वत: जॉन मारिनो, जॉन हार्वड, मायकल शेरमर आणि लॉन हल्डमॅन हे चार स्पर्धक सहभागी झाले होते. ती स्पर्धा कॅलिफोíनयातील सॅटा मोनिका येथे सुरू होऊन न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बििल्डग येथे संपली होती. लॉन हेल्डमॅन हा त्या स्पध्रेचा विजेता ठरला होता. त्याने ती स्पर्धा ९ दिवस ३ तास आणि २ मिनिटे या वेळेत पूर्ण केली होती. पहिल्याच वर्षांनंतर स्पध्रेचे नाव ‘रेस अक्रॉस अमेरिका’ असे बदलण्यात आले आणि स्पध्रेकरिता सायकलपटूंना आमंत्रण देण्याऐवजी पात्र ठरण्याची अट घालण्यात आली. २००६ साली स्पध्रेमध्ये मोठे बदल करण्यात आले. मुख्य म्हणजे सोलो रायडरसाठी त्याच्या संपूर्ण प्रवासात ४० तासांचा कालावधी हा आरामासाठी देण्यात आला, जो वेळ एकूण स्पध्रेच्या वेळेत गणला जात नाही. आज घडीला ही स्पर्धा २३ वेगवेगळ्या गटांसाठी घेतली जाते. यामध्ये सोलो सायिलगपासून सांघिक शर्यतींचा समावेश असतो. ‘टूर डी फ्रान्स’ प्रमाणे या स्पध्रेमध्ये कोणतेही टप्पे नसतात. स्पर्धा सुरुवात ते शेवट अशीच पार पडते. सर्वात वेगाने स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक विजेता ठरतो. सर्वोत्तम सायकलस्वाराला ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे एक आठवडय़ाचा कालावधी पुरतो.

रेस अक्रॉस अमेरिका ही सायकल शर्यत जगातील सगळ्यात अवघड सायकल शर्यत समजली जाते. आजवरच्या इतिहासात अवघ्या २०० जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोíनया येथील ओशियन पीएर येथून सुरू होणारी ही स्पर्धा अ‍ॅनापोलिस, मेरीलँड (इस्ट कोस्ट) येथील सिटी डॉक येथे संपते. अमेरिकेतील १२ राज्ये आणि ८८ काऊंटी पार करत साधारण १७ हजार फुटांची उंची आणि जवळपास ४८०० किलोमीटरचा हा पल्ला अवघ्या १२ दिवसांमध्ये पार करायचा असतो. स्वाभाविकच स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज ४०० किलोमीटर सायकल चालवणे गरजेचे असते. दिवसाच्या २४ तासांत तुम्हाला ऊन, पाऊस, वारा, थंडी, चढ-उतार या सर्वाचाच सामना करत ४०० किलोमीटर सायकिलगसोबत झोप, भूक व अन्य गोष्टी करायच्या असतात. यामध्ये प्रत्येक सायकलस्वाराच्या दिमतीला त्यांची स्वतंत्र टीम आणि आधुनिक सायकल सोबत असली तरी ही स्पर्धा स्पर्धकाची शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी असते.

या स्पध्रेविषयी वेगळं लिहिण्याचं कारण म्हणजे जगातील सर्वात कठीण स्पर्धेत भारतीयांचा यशस्वी सहभाग. या सायकल स्पध्रेत पन्नास वर्षांआतील दोन सदस्यीय सांघिक गटात विजेतेपद पटकावून नाशिकच्या डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन या डॉक्टरबंधूंनी इतिहास घडविला आहे. रॅम स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे महाजनबंधू पहिले भारतीय आहेत. महाजनबंधूंच्या आधी एकटय़ाने (सोलो) सहभागी होण्याच्या गटात बंगळुरू येथील शमीम रिझवी आणि अलिबाग येथील सुमित पाटील पात्र ठरले होते. मात्र ते ही स्पर्धा पूर्ण करू शकले नाहीत. यावर्षीही श्रीनिवास गोकुळनाथ यांनी स्पध्रेत भाग घेतला होता मात्र ते स्पर्धा वेळेत पूर्ण करू शकले नाहीत. दरम्यान, देशभरातून स्पध्रेसाठी पात्र होणाऱ्यांची संख्या वाढत आहे, हेही नसे थोडके.

prashant.nanaware@expressindia.com