24 November 2017

News Flash

जायचं, पण कुठं? : रंगनथिट्ट

कर्नाटकातील कावेरी नदीवरील रंगनथिट्ट हे पक्षी-निरीक्षणासाठी अतिशय प्रसिद्ध अभयारण्य आहे.

सोनाली चितळे | Updated: July 12, 2017 3:53 AM

कर्नाटकातील कावेरी नदीवरील रंगनथिट्ट हे पक्षी-निरीक्षणासाठी अतिशय प्रसिद्ध अभयारण्य आहे

कर्नाटकातील कावेरी नदीवरील रंगनथिट्ट हे पक्षी-निरीक्षणासाठी अतिशय प्रसिद्ध अभयारण्य आहे. अनेक स्थलांतरित पक्षी येथील पाणथळीच्या जागी एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान येतात. म्हैसूरपासून २० मिनिटांच्या अंतरावर हे निसर्ग उद्यान आहे. पक्षी निरीक्षणासाठी बोट भाडय़ाने घेऊन अगदी आत छोटय़ा-छोटय़ा बेटांवर घरटी करून मोठय़ा संख्येने राहणारे अनेक स्थलांतरित पक्षी आपणास इथे सहज बघायला मिळतात. येथील खास गोष्ट म्हणजे अजस्र  मगरी एखाद्या निर्जीव खडकांप्रमाणे ऊन खात जवळच्याच बेटांवर जागोजागी पहुडलेल्या दिसतात.

बोटीने फिरताना चुकूनही पाण्यात हात घालू नये किंवा बोटीतून बाहेर लांबवर हात बाहेर काढू नये; पाण्यात काहीही खाण्यास न टाकणे इष्ट. संपूर्ण परिसरात साधारण १०० मगरी असतील. पक्षी निरीक्षणासाठी सर डॉ. सलीम अलींची ही आवडती जागा होती. येथील एका बेटावर सुंदर बगीचा आहे, अगदी स्वच्छ आणि नेटका. निवांत बसून बाजूचा परिसर न्याहाळण्यासाठीची ही खास सोय. रंगनथिट्टला सकाळी साडेआठ वाजल्यापासून आत जाण्यास परवानगी असते. अगदी लवकर त्या वेळेसच जावे, म्हणजे शांतपणे पक्षी-निरीक्षण करता येते. ११ वाजल्यानंतर हळूहळू परिवारासह जेव्हा कुटुंब-कबिला येऊ लागतो तेव्हा त्या शांत पक्षी अभयारण्याचा पिकनिक स्पॉट होऊन जातो.  जाताना चांगलीशी दुर्बीण आणि सोबतीला एक कॅमेरा असला तर उत्तम.

जवळच असलेले वृंदावन गार्डन, वाडियार राजाचा महाल, आंबा विलास महाल, रेल्वे म्युझियम आदी पाहता येते. देवराज मार्केटमध्ये रंगीत फुले, भाज्या, फळे, सुगंधी तेले, अनेकानेक विविध पेटिंगचे रंग आणि बरेच काही बघायला मिळते. असा रंगांचा बाजार पाहिला की कसलेल्या फोटोग्राफरलादेखील प्रश्न पडेल की नक्की कुठून आणि कसे हे रंग कॅमेरात बंदिस्त करता येतील. बेंगळूरु आणि म्हैसूरपासून जवळ असलेले रंगनथिट्ट  भटकंतीच्या यादीत समाविष्ट करायला हवे.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com

First Published on July 12, 2017 3:50 am

Web Title: ranganathittu bird sanctuary at kaveri river in karnataka