सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौरस किलोमीटर इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं.. मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण ४७ मंदिरे व १३ ओवऱ्या आहेत. आंघोळीचं आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी  असते.

सागरेश्वर मंदिरापासून पुढे एक-दीड किलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्या सागरेश्वर डोंगराच्या माथ्यावर आहे. देवराष्ट्र गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा
Nashik, Leopard caught
नाशिक : पाथर्डी परिसरात बिबट्या जेरबंद

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरडय़ा हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औदुंबरसारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्ष्यांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकडय़ांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सूर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवटय़ा, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावशा, पोपट, कोकीळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटतं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे यांचा हक्काचा निवारा आहे.

वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन अ‍ॅम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होताना आढळत नाही.

अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्या पॉइंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभरवाचे मंदिर लागते. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉइंट हे अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

कसे जाल?

मिरज रेल्वे स्थानकापासून ६० किलोमीटर, कराडपासून ३० किलोमीटर. ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर. पुणे-बंगळुर महामार्गावरील कराडपासून बससेवा उपलब्ध.

केव्हा जाल?

पावसाळा हा उत्तम कालावधी.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com