कॉलेजात असताना कधीतरी मित्रांबरोबर केलेल्या एका छोटय़ाशा ट्रेकने सुरुवात होते. त्यानंतर अजून एखादा ट्रेक. मग अजून एखादा. असं हे सह्य़ाद्रीत भटकण्याचं वेड हळूहळू अंगात भिनत जातं. सह्य़ाद्रीचा हा लांबलचक पसारा. आणि त्याची अनेकविध रूपं. कुठे दाट जंगल तर कुठे उघडे-बोडके डोंगर. कुठे सरळसोट उभे कडे, तर कुठे विस्तीर्ण पठारं. कधी लोभस तर कधी रौद्र. पण सगळंच भुरळ पाडणारं. लहान-मोठय़ा ट्रेकमध्ये पूर्वी पाहिलेली ठिकाणं या मोहिमेत पुन्हा नव्याने पाहतोय. ठिकाणं तीच, पण ‘वॉकिंग ऑन द एज’च्या या सलग भटकंतीत ती नव्यानं समजतायत. नवे संदर्भ गवसतायत.

या भटकंतीत डोंरगरांगांना खरी सुरुवात झाली ती इगतपुरीपासून. तोपर्यंत सलग अशी डोंगररांग नव्हती. इगतपुरीच्या दक्षिणेला कळसूबाई – अलंग – कुलंगची रांग आहे. कुलंगगडाच्या पायथ्याशी कुरुंगवाडी हे गाव. इथून डोंगररांगेच्या पश्चिमेकडून सह्य़ाद्री पठाराच्या अगदी काठावरून एक पायवाट भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठावरल्या घाटघरला जाते. इथे सह्य़ाद्रीचा उभा कडा खाली उतरताना दिसतो. हीच वाट पुढे कात्राकडय़ाच्या खिंडीतून कुमशेतमार्गे हरिश्चंद्रगडाला जाते.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

पूर्वी एका डोंगरमित्राबरेबर या वाटेने जात असताना कात्राबाई खिंडीत एक उभा १० आकडा कोरलेला मैलाचा दगड दिसला होता. हा दगड पडलेला असल्यामुळे नेमकं कोणत्या दिशेला जायचे हे न कळल्यामुळे वाट चुकलो होते. जवळ सगळं साहित्य असल्यामुळे तिथेच रात्रीचा मुक्काम केला होता. वॉकिंग ऑन द एज मोहिमेत त्या दगडापासून जाताना त्या मस्त ट्रेकची आठवण झाली. पुढे त्या वाटेवर अजून बरेच तसे मैलाचे दगड दिसले. स्थानिकांनी सांगीतले की, ब्रिटिश काळात माळशेज आणि इगतपुरीला जोडणारी ही घोडय़ाची वाट होती. त्यामुळे स्थानिक तिला अजूनही घोडसडक म्हणतात. कुरुंगवाडी एक छोटा माळ आहे. तिथे घोडे विश्रांतीला थांबायचे, म्हणून त्या माळाचं नाव विश्रामपेठ.

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावरून दक्षिणेला नाणेघाटचा नानाचा अंगठा खुणावत होता. माळशेज घाटाचा गाडीरस्ता ओलांडल्यावर निमगिरीच्या खिंडीमार्गे एक सुंदर वाट दवडय़ा डोंगरांच्या पदरावरून नाणेघाटाकडे जाते. दूरवर माणिकडोह धरणाचं निळंशार पाणी आणि चावंडचा किल्ला बराच वेळ दिसत राहतात. याच दवडय़ा डोंगरावर साठच्या दशकात एका इटालियन कंपनीचं एक प्रवासी विमान कोसळलं होतं. आसपासच्या गावांतील साठी उलटलेली म्हातारी मंडळी तेव्हाच्या आठवणी सांगत होती. विमान अगदी रात्री धुवाधार पावसात कोसळलं होते. प्रवाशांपैकी कुणीच वाचलं नाही. त्या काळात गावांत ना रस्ते, ना रेडिओ, ना संपर्काचं साधन. आठ दिवसांनी पोलीस आले तेव्हाच गावकऱ्यांना या अपघातासंबंधी समजलं.

नाणेघाटावरून फांगलीच्या खिंडीमार्गे कुकडेश्वरला पोचलो. गावाचं खरं नाव पूर. पण  कुकडेश्वराच्या पुरातन मंदिरामुळे बाहेरील माणसे त्याला कुकडेश्वरच म्हणतात. इथेच डोंगरातल्या एका गुहेत कुकडी नदीचा उगम होतो. देऊळ अगदीच छोटेखानी. पण सुबक. सुंदर नक्षीकाम. हे देऊळ अगदीच पडायला झालं होतं. पूर्वी चावंड किल्ल्यावर आलो होतो तेव्हा ते ढासळतं मंदिर पाहिलं होतं. पण पुरातत्त्व खात्यानं अलीकडेच हे सगळे दगड सोडवून ते पुन्हा पहिल्यासारखं उभारलंय. एक कळस तेवढा राहिलाय. पुरातत्त्व खात्याला आपण एरव्ही नावं ठेवतो. पण त्यांनी अगदी शास्त्रीय पद्धतीने केलेलं काम पाहून सुखावून जायला झालं.

कुकडेश्वराहून दाऱ्या घाटाच्या तोंडाजवळून ढाकोबाच्या पठारावर एक वाट जाते. घाटाच्या तोंडाशी पोहचलं की कोकणात उतरणारी पायवाट पाहूनच अंगावर रोमांच उभा राहतो. एरवी नाणेघाटाच्या पठारावरून जीवधन किल्ला आणि त्याच्या उजवीकडचा वानरिलगी सुळका त्या सगळ्या भौगोलिक रचनेचं सौंदर्य वाढवतो. पण ढाकोबाकडून पाहताना जीवधन किल्ल्याची सरळसोट कातळभिंत समोर येते. एरवी उजवीकडे दिसणारा वानरलिंगी डावीकडे दिसतो. एकाच सह्य़ाद्रीची ही दोन रूपं. ढाकोबाचं पठार बऱ्यापैकी मोठं. बरंच जंगल. पण वस्ती काहीच नाही. एक ते ढाकोबाचं देऊळच तिथे. वाटाडय़ाबरोबर तेथे सायंकाळी पोहचलो तिथेच वस्ती केली. रात्री पठारावर पूर्ण शांतता. देवळाबाहेर अमावास्येचा अंधार. या भटकंतीतली एक अविस्मरणीय रात्र.

लोणावळ्यावरून निघाल्यावर तेलबैला सोडल्यावर अंधारबनातून पुढे जायचं होतं. कधीकाळी येथील गर्द झाडीमुळे दिवसाचा प्रकाशदेखील न पोहचणारे हे जंगल. कालौघात बरेच बदल झाले. आज अगदी अंधार नसला तरी गेल्या चार-पाच दिवसांतल्या थकव्याला सुखावणारी सावली नक्कीच होती. अशी ही सह्य़ाद्रीच्या डोंगरदऱ्यांची आणि पठारांची अखंड सोबत. गावातल्या         मुक्कामापुरता तिथल्या लोकांशी संबध येतोय. कधी दिवसातून काही तास वाटाडय़ांची सोबत असते. पण अखंड संगत सह्य़ाद्रीचीच. कधी दिवसाच्या शेवटी जवळचं गाव दिसत असावं. सूर्य कललेला असतो. गावात पोहचायच्या आधी, सह्य़ाद्रीच्या कडय़ावरून एखादं अप्रतिम दृश्य दिसावं. कोकणात उतरणारा कडा, त्यातल्या प्रचंड घळी, दृश्य बघत विसावायला खाली बसावं. घामाचे चार थेंब जमिनीवर पडतात. विरून जातात. मंद सांजवात सुरू झालेली असावी. आपण कातळावर हातपाय पसरून उताणं पडावं. हाताच्या तळव्यांनी कातळाचा खडबडीत स्पर्श अनुभवावा. काचेवर सांडलेल्या पाऱ्याचा कण जसा लगतच्या थेंबात ओढला जातो, जणू तसं आपण कातळात शोषलं जावं. एकरूप व्हावं. मीच तो कातळ, मीच ती माती, मीच पानंफुलं आणि मीच पशू-पक्षी, मीच सह्य़ाद्री.

प्रसाद निक्ते walkingedge@gmail.com