05 July 2020

News Flash

जायचं, पण कुठं? : सातपुडय़ातला आंबागड

जुन्या मध्य प्रदेशातील गढांडला, खेरला, देवगड, चांदा ही गोंडांची चार राज्ये होती.

संग्रहित छायाचित्र

राज्याचे, घाटवाटा, व्यापारी मार्गाचे संरक्षण यासाठी किल्ल्यांची निर्मिती झाली. सह्य़ाद्रीतील डोंगरदऱ्यांमुळे अशा किल्ल्यांसाठी नैसर्गिकरीत्याच एक मजबूत माध्यम मिळाले. अर्थात अगदी अशीच भौगोलिक परिस्थिती नसली तरी विदर्भातील जंगलांनीदेखील अशी पाश्र्वभूमी उपलब्ध करून दिली आहे. विदर्भातील गोंडवनाच्या संरक्षणासाठी असलेला आंबागड त्यापैकीच एक. भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर तालुक्यात आंबागड गावाशेजारील सातपुडा पर्वतरांगेत हा किल्ला वसलेला आहे.

जुन्या मध्य प्रदेशातील गढांडला, खेरला, देवगड, चांदा ही गोंडांची चार राज्ये होती. गोंड राजघराण्यातील महिपत शहा हा देवगडच्या गादीवर बसला. भाऊबंदकीत त्याला हद्दपार व्हावे लागले. मदतीसाठी तो औरंगजेबाकडे गेला. बादशहाने त्यास मुसलमान होण्यास सांगितले. त्याने बादशहापुढे अट ठेवली, रोटी व्यवहार होईल, पण बेटी व्यवहार होणार नाही. अशा रीतीने महिपत शहा नाव असलेल्या या राजास औरंगजेबाने बख्तबुलंद असे नाव दिले. त्याने पुढे छिंदवाडा, बैतुल, शिवनी, बालाघाट, नागपूर, भंडारा (गोंदिया) असा राज्यविस्तार केला. अत्यंत सुरक्षित मात्र अवघड जागी असलेली दाट वनराजी हेरून बख्तबुलंदने शिवनीचा दिवान राजखान पठाण यास आंबागड बांधण्याचा आदेश दिला. इ.स. १७०० मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला.  इ.स. १७०२ मध्ये बख्तबुलंदने आपली राजधानी देवगडहून नागपूर येथे हलवली. बख्तबुलंदनंतर त्याचा मुलगा चाँद सुलतान १७०६ मध्ये देवगडच्या गादीवर बसला. त्याची राणी रतनकुँवर अनेक वर्षे आंबागडावर वास्तव्यास होती असे तपशील मिळतात. राणीने नंतर इ.स. १७३९ मध्ये रघुजी भोसले यांना हा किल्ला देवगडच्या तहात दिला.

येथील तळघराचा वापर नंतरच्या काळात तुरुंगासारखा करण्यात आला. सुमारे दीड हजार फुटांची चढाई केल्यानंतर किल्ल्याचे अतिभव्य प्रवेशद्वार तुमच्या स्वागतास उभे ठाकते. पूर्व-पश्चिम पसरलेल्या सातपुडा गायखुरी पर्वतांच्या रांगा डोळ्याचे पारणे फेडतात. अभेद्य दरवाजे, परकोट, नगारखाना, शत्रूवर मारा करण्यासाठीच्या जंग्या, तोफा ठेवण्याचे १० बुरूज, मिनार, सोपानमार्ग बावडी, प्राचीन विहीर आणि दिवाणखाना, निवासी महाल, तळघर असे सारे पुरातन वैभवाची साक्ष देत उभे असतात. वास्तूंना भरपूर उजेड आणि वाऱ्यासाठी अनेक झरोके, गवाक्षांची सोय केलेली आहे. जमिनीखालील तळघरात विजेरीचा वापर करून जाता येते. गडावर अंबागडीया-देव या गोंड, कोष्टी व इतर समाजाच्या लोकांचे स्थान आहे. दरवर्षी येथे जत्रा भरते.

विस्तृत तटबंदी, नैसर्गिक सौंदर्य आणि स्थापत्य शैलीचा नमुना म्हणावा असा हा किल्ला आहे. सर्वत्र घनदाट जंगल व खंदक आहेत. सातपुडय़ाच्या कुशीत एक अनामिक लेणंच म्हणावं लागेल. पर्यटकांनी आवर्जून वाट वाकडी करून पाहावं असंच हे ठिकाण आहे.

कसे जाल?

  • भंडारा शहरापासून तुमसर-मिटेवानी मार्गे ४५ किमी, तर नागपूरहून १०५ किमी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2017 9:58 am

Web Title: satpura mountain range
Next Stories
1 हाँगकाँगमधील तुंगचुंग
2 चिंब भटकंती : रतनवाडी
3 वन पर्यटन : ज्ञानगंगा अभयारण्य
Just Now!
X