सायकल टुरिंग हे बहुतेक वेळा लांब पल्ल्याचं असतं. त्यामुळे टुरिंगसाठी वापरण्यात येणारी सायकलसुद्धा तेवढीच मजबूत आणि आरामदायक असावी लागते. तुमच्या सायकल टुरिंगच्या प्रकारावर सायकलवरील सामानाचं वजन ठरत असल्याने सायकलची निवडसुद्धा त्याच धर्तीवर करणं आवश्यक आहे. टुरिंगच्या प्रत्येक प्रकारासाठी आता वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली बाजारात उपलब्ध आहेत. या सायकलींमध्ये गरजेनुसार प्रत्येक भागाचा कसा वापर होईल याची काळजी घेण्यात आलेली असते. नुकत्याच पार पडलेल्या युरोबाइक २०१६ या जगातील सर्वात मोठय़ा ट्रेड शोमध्ये तर कल्पनेच्या पलीकडील सायकल टुरिंगच्या सायकल आणि सामानांची मांडणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. टुरिंग सायकलच्या प्रत्येक भागावर सूक्ष्म संशोधन करून प्रत्येक भागाची निर्मिती करण्यात आल्याचं येथे मांडण्यात आलेल्या वस्तूंवरून दिसत होतं. टुरिंगसाठी चांगल्या सायकली कोणत्या, याची यादीच प्रत्येक तपशिलासह इंटरनेटवर उपलब्ध असली तरी काही मूलभूत गोष्टींची आपण येथे माहिती घेऊ या.

या सायकलचा सांगाडा (फ्रेम) हा साधारणपणे रोड किंवा हायब्रीड सायकलसारखाच असतो. सायकलीच्या बारीक सांगाडय़ामुळे (माऊंटन सायकलच्या तुलनेत) सायकलचे वजनही कमी भरते.

टुरिंग सायकलवर पुढच्या आणि मागच्या चाकाला अशा दोन्ही ठिकाणी कॅरियर लावण्याची सोय असते, ज्यावर तुम्हाला पॅनियर्स (सामान ठेवण्याची बॅग) लावण्याची सोय असते. त्याशिवाय सीटच्या खाली आणि हँडलबारवरही बॅगा लावण्याची सोय करता येते.

लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी या सायकलींच्या हँडलबारची उपाययोजना वेगवेगळी असते. यामध्ये रोड बाइकसारखे खाली वाकून धरण्याचे, हाताचा पुढचा भाग संपूर्ण टेकवता येईल असे, सरळ हँडल असल्यास त्याच्या टोकाला शिंग असलेले असे अनेक वेगवेगळे हँडलबार असतात.

दूरच्या प्रवासासाठी म्हणून सीटची रचनाही वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असते.

सायकलवर पॅनियर, मडगार्ड, पाण्याची बाटली, दिवे, दुरुस्तीचं सामान वागवण्यासाठी खास सुविधा करण्यात आलेल्या असतात.

चेनवर येणारा ताण आणि कापायला लागणारं अंतर यामुळे या सायकलींची चेन अतिशय मजबूत असते. सायकलचे गिअर कॉम्बिनेशन्सही सायकल आणि विविध कंपन्यांच्या मॉडेल्सप्रमाणे बदलतात.

टुरिंग सायकलींना शक्यतो लायनीयर पूल-ब्रेक्स असतात. नव्या टुरिंग सायकलींना आता डिस्क-ब्रेक्स आले आहेत; परंतु दुर्गम भागात डिस्क-ब्रेक्स दुरुस्त करणं थोडं जिकिरीचं असल्याने अनेक सायकलस्वार आजही पूल-ब्रेक्सलाच पसंती देताना दिसतात.

सपाट रस्त्यावर सायकिलग करायचं असल्यास परदेशातील सायकलस्वार पॅनियर्सच्या ऐवजी ट्रेलरचा वापर करताना दिसतात. एक किंवा दोन चाकांचे ट्रेलर बाजारात उपलब्ध आहेत.

टुरिंग सायकलचे हँडलबार मोठे आणि वेगवेगळ्या आकाराचे असल्याने त्यावर स्पीडोमीटर, जीपीएस, कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टी एकाच वेळी सहज लावता येतात.

प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com