News Flash

आडवाटेवरची वारसास्थळे : श्रीदुर्गादेवी-कुणकवळे

मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे.

श्रीदुर्गादेवी-कुणकवळे

मालवण आणि सिंधुदुर्ग यांचे नाते एवढे घट्ट आहे की मालवणच्या परिसरात यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी, स्थळे असतील असा विचारसुद्धा पर्यटकांच्या मनात कधी येत नाही. परंतु मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे. अगदी आड मार्गावर असलेल्या गावात इतकी शिल्पजडित देवीची मूर्ती असेल यावर विश्वासच बसत नाही. मालवणपासून हे ठिकाण सुमारे १६ किलोमीटरवर आहे. मालवणहून कसालच्या दिशेने जायला लागले की कुंभारमाठ नावाचे गाव लागते. इथून पुढे चौके फाटा आहे. या फाटय़ापासून एक रस्ता कुणकवळे गावाला जातो. कुणकवळे गावात श्रीदुर्गादेवीचे मंदिर आहे. प्रत्यक्ष धर्मराजांनी या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. १९६१ साली झालेल्या वादळाचा तडाखा बसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे झाले. खास कोकणी पद्धतीची सुंदर अशी दीपमाळ एका ओटय़ावर उभी आहे. मंदिराला भव्य असा सभामंडप बांधलेला आहे. आणि या मंदिरात आहे अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती. चतुर्भुज देवीच्या हातात तलवार, चक्र, त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत. मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने, ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत तर केशसंभार अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ फारच देखणी आहे. मूर्तीसमोर दगडी प्रसाद पात्र आहे. मालवणच्या भटकंतीमध्ये, अत्यंत देखणी अशी ही मूर्ती, आडवाटेला असली तरी खास वेळ राखून पाहायला हवी.

आवाहन – वाचक सहभाग

वाचक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा वारसा असणारं मंदिर. कदाचित ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहित नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.

ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलिकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.

भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.

आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० lokbhramanti@gmail.com

ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 4:01 am

Web Title: shri durga devi at malvan
Next Stories
1 तिची सायकलवारी
2 भटक्यांचे कट्टे
3 ट्रेकिंग गिअर्स : पेहराव
Just Now!
X