लेह-लडाख आपल्या पर्यटन नकाशावर येऊन आणि त्यांची लोकप्रियता वाढून बराच काळ लोटला आहे. लडाखमध्ये डोंगरभटकंती, स्नो लेपर्डच्या शोधात केलेली भटकंती, चादर ट्रेक असं सारं करतानाच सिंधुतीराचे आकर्षणही तेवढेच होते. बटालिक सेक्टरमधून ती पुढे पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश करते, तेथून ती भारतात प्रवेश करते त्या डेमचोकपा येथपर्यंतचा हा प्रवास. सिंधूच्या काठचा प्रदेश गेल्या अनेक वर्षांमध्ये तुकडय़ा तुकडय़ाने पाहिल्यानंतर तो जोडण्याचा एक प्रयत्न.

दाह (धा) आणि हानू या दोन खेडय़ांपासून सुमारे ४५० किलोमीटरवरील डेमचोकपापर्यंतचा हा प्रवास नेहमीच्या लेह-लडाख भटकंतीपेक्षा नक्कीच वेगळा आहे. या उलटय़ा प्रवासात उंची हळूहळू वाढत जात असल्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आपोआपच होतेच, तर वातावरणातील बदल परिसरावर, तेथील शेतीभातीवर व संस्कृतीवर कसा परिणाम करतो तेपण जाणवते. लेह सोडले तर एकूणच शहरी वातावरणाशी फारसा संपर्क येत नाही. सिंधू पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करते तेथे आर्य संस्कृतीचा पगडा जाणवतो तर वर जातो तसे बौद्ध संस्कृती. खाली हिरवळ तर वर रखरखाट.

श्रीनगर, द्रास, कारगिलमाग्रे बटालिकमध्ये जेथे ही नदी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश करते तेथपर्यंत दाह आणि हानू गावापर्यंत व्यवस्थित रस्ता आहे. ही दोन्ही गावं एकूण लडाखी गावांपेक्षा पूर्णत: वेगळी आहेत. आर्यवंशीय लोकांची ही वस्ती असल्याचे येथील लोक सांगतात. अलेक्झांडर जेव्हा परत जात होता तेव्हा त्याच्या सन्यातील काही सनिक येथे राहिले त्यांची ही वसाहत असादेखील कयास आहे. लडाखी लोकांच्या तुलनेत येथील पुरुषमंडळी बरीच उंच, बायका लडाखी महिलांशी जुळणाऱ्या उंचीच्या, सरळ नाक, डोळे काहीसे युरोपियनांकडे झुकणारे. बाकी लडाखमध्ये सर्व स्थानिक हे मंगोलियन फिचरचे आहे. अलिकडच्या काळात लडाखी आणि हे आर्यन यांच्यात सोयरीकीदेखील व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे काही वेळा लडाखी फीचर्सदेखील दिसून येतात. येथील राहणीमानदेखील टिपिकल लडाखी पद्धतीशी जुळणारे नाही. घरांची बांधणीदेखील निराळी आहे. इतकेच नाही तर लडाखचा कमी उंचावरील भागात असल्यामुळे येथे शेती चांगली आहे आणि फळाफुलांनी समृद्ध असा हा भाग आहे. मात्र, लोकसंख्या अगदीच कमी. सध्या तरी भारतीय पर्यटक फारसे जात नाहीत, काही प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे होम स्टेच्या अगदी जुजबी अशा सुविधांचा येथे वापर करावा लागतो.

एखादं दिवस मुक्काम करून पुन्हा श्रीनगर-लेह मार्गावरील खालसे गावात येता येते. येथून लेहपर्यंत १४० किलोमीटरचा रस्ता सिंधू-किनाऱ्यानेच जातो. याच वाटेवर आल्ची नावाचं एक गाव आहे. आल्चीमध्ये लडाखमधील सर्वात जुनी अशी ११०० वर्षांपूर्वीची मोनेस्ट्री आहे. लडाखमधील बहुतांश मोनेस्ट्री डोंगरकपारींत आहेत. पण ही मोनेस्ट्री थेट गावातच आहे. किंबहुना गावातील काही घरेदेखील त्या मोनेस्ट्रीपेक्षा उंच आहेत. ११०० वर्षांपूर्वीची शिल्पकला, चित्रकला मोनेस्ट्रीच्या आतमध्ये पाहायला मिळते. या गावावरून पुढे जाताना वाटेत बासगो फोर्ट लागतो.

इतिहासकाळात येथे १७ व्या शतकात लढाई झाली होती. हे प्रेक्षणीय असं स्थळ आहे. किल्ल्याची तटबंदी थोडीफार शिल्लक आहे.

पुढे लेहला एक दिवस मुक्काम करून सिंधू-किनाऱ्यावरूनच लेह मनाली मार्गावर उपशीपर्यंत जायचे. येथे सिंधू-किनाऱ्याने जाण्यासाठी मनालीचा रस्ता सोडून उत्तर-पश्चिमेला वळावे लागते. वाटेत चुमाथांग येथे निसर्गाचा एक चमत्कार पाहता येतो. येथे सिंधूच्या पात्रातच गरम पाण्याची कुंडं आहेत. हिवाळ्यात नदी गोठते तेव्हादेखील ही कुंडं आपलं अस्तित्व राखून असतात. त्यातून उसळलेल्या पाण्यामुळे बर्फाचे छोटे छोटे उभे उंचवटे तयार होतात. हा निसर्ग-चमत्कार पाहून विज्ञानाचा चमत्कार पाहायला तीनेक किलोमीटरची वाकडी वाट करून हॅन्लेमध्ये जायचे. येथे इस्रोची एक ऑब्झर्वेटरी आहे. आजूबाजूला कसालाही कृत्रिम प्रकाश नको अशी जागा हेरून ही ऑब्झर्वेटरी बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या तीन -चार किलोमीटरच्या परिसरात एकही गाव नाही की मानवी वास्तव्याच्या कसल्याही खुणा नाहीत. जवळपास निर्मनुष्य म्हणावा असाच हा प्रदेश. येथील कामाचे बहुतांश नियंत्रण हे इस्रोच्या मुख्यालयातून केले जाते. येथील माणसांचा बाहेरील जगाशी अथवा पर्यटकांशी फारसा संबंधच येत नाही.

येथून पुन्हा मागे मूळ मार्गावर येऊन डेमचोकपाकडे प्रयाण करायचे. डेमचोकपा हे सिंधू तीरावरचे भारतातील पहिले गाव. येथून पुढे रस्ता नसल्यामुळे तीन-चार किलोमीटरवरील सिंधूचा तिबेटमधून भारतात प्रवेश होतो तेथपर्यंत जाणे शक्य नाही. डेमचोकपा पार करून तिबेटमाग्रे मानसरोवरला जाणे हा कदाचित भविष्यातील मार्ग असू शकतो.

नंतर परतीचा प्रवास आल्या वाटेने करण्याऐवजी चुषूल, पॅगाँग लेक, तुर्तुक करून खारदुंगला पासमाग्रे जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटरेबेल रोडने लेहला परत जायचे. लेह-लडाखच्या पर्यटनात या ठिकाणांचा फारसा वापर अजूनही झालेला नाही.

पॅगाँग लेकचा ७० टक्के भूभाग हा चीनमध्ये आहे. या नितांतसुंदर तलावाच्या आधी चुषूल गाव आहे. १९६२ ची लढाई या गावाजवळदेखील लढली गेली होती. त्यानिमित्ताने तेथे एक युद्धस्मारकदेखील उभारले आहे. चिनी सन्याचे बंकर्स समोरच्या डोंगरावर अगदी सहजपणे दिसतात. त्यानंतर डिस्किटजवळचे तुर्तुक हेदेखील युद्धाशी निगडित असेच गाव. तुर्तुक हे पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर आहे. १९७१ पर्यंत ते पाकव्याप्त काश्मीरचा भाग होते. आता ते भारताचा भाग आहे. अलीकडेच तीन वर्षांपूर्वी ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पण तुलनेने येथे फारसे पर्यटक येत नाहीत. तुर्तुकवरून पुढे खारदुंगलामाग्रे लेह गाठायचे.

सिंधूच्या तीरावरून होणारा हा सारा प्रवास किमान १० दिवसांचा आहे. पण या प्रवासात एकूणच भारतातील सिंधुच्या आत्ताच्या संस्कृतीचे दर्शन घडते.

कधी जाल?

डिस्किट ते पेगाँगच्या वाटेवर जून-ऑगस्ट यादरम्यान बर्फ वितळून छोटय़ा मोठय़ा प्रवाहांमुळे रस्ता बंद होतो. तर त्याआधी बर्फ अधिक असते. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर हा काळच या मार्गासाठी उत्तम आहे.

आत्माराम परब atmparab2004@yahoo.com