News Flash

वन पर्यटन : सुधागड

सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे.

 

सुधागड हा रायगड जिल्ह्य़ातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असंही म्हणत. दुर्गप्रेमींचा कायमच राबता असतो. अष्टविनायकातील पालीजवळून एकदा का सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांकडे जाऊ लागलो की, डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी हिरवाई पटकन जाणवू लागते. डोंगरउतारावरील आणि परिसरातील ही सारी वनराई म्हणूनच संरक्षित करण्यात आली आहे. सुधागड आणि सभोवतालचे ७६.८८ चौ. किलोमीटरचे क्षेत्र २७ ऑगस्ट २०१४ रोजी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे. सुधागड परिसरात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील ठाणाळे लेणी आहेत. गडावर अनेक तलाव आहेत. पंत सचिवांचा वाडा, भोराई देवी तसेच भोरेश्वराचे मंदिर आहे. पाच्छापूर दरवाजा, िदडी दरवाजा, धान्य कोठारे, भांडय़ाचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडावर टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगड, कोरीगड तेलबला दिसतो.

गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. सुधागड हा किल्ला हे भोर संस्थानचे वैभव. प्रचंड विस्तार असणाऱ्या या किल्ल्याला राजधानीचा किल्ला करायचा विचार शिवाजी महाराजांनी केला असल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. पुराणात भृगू ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात. सध्याच्या काळात हा किल्ला मुंबईकर दुर्गप्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. गेल्या २५-३० वर्षांत येथे अनेक संस्थांनी मुलांसाठी साहस शिबिरं तर घेतली आहेतच, पण त्याचबरोबर अनेक संस्था दुर्गसंवर्धनाचे काम नेटाने करत असतात.

सुधागडावर चढून जायचे नसेल तर परिसरात एखाद्या मार्गदर्शकाच्या साहायाने भटकता येऊ शकेल. पावसाळ्यात तर येथील दृश्य केवळ नयनरम्य म्हणावे असे असते.

drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:26 am

Web Title: sudhagad fort raigad
Next Stories
1 घाटमाथ्यावरून : सांगाती सह्य़ाद्री
2 वनसंपन्न गोवा
3 वन पर्यटन : ताम्हिणी
Just Now!
X