प्रत्येक गोष्टीला ऊर्जेची आवश्यकता असते. मग ते एखादे यंत्र असो वा वाहन. सायकललासुद्धा वेगाने पुढे जाण्यासाठी ऊर्जा लागते. पण मग ही ऊर्जा नेमकी येते कुठून? काहीजण उत्तर देतील गिअर्समधून. पण गिअर्स नव्हते तेव्हा ही ऊर्जा कुठून यायची? तर ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत होती चेन. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की जगातील पहिल्या सायकललासुद्धा चेन नव्हती.
खरं तर, लिओनादरे-दा-विंची याने १५ व्या शतकामध्येच चेन आणि दात्यांचा शोध लावला होता. मात्र सायकलचं प्रत्यक्ष मॉडेल अवतरायला पुढे सुमारे ४०० वर्षांचा काळ जावा लागला. अगदी सुरुवातीच्या काळात सायकलला चेन हा प्रकार नव्हताच. त्यावेळेस पायडल पुढच्या चाकालाच जोडलेले असत आणि पुढच्या चाकाच्या ऊर्जेवर मागचे चाक पुढे सरकत असे. परंतु सायकलच्या चाकाच्या आकारामुळे वेगावर मर्यादा येत असे. म्हणून पुढचे चाक आकाराने मोठं असलेल्या सायकली तयार करण्यात आल्या. चेन ही सायकलच्या मध्यभागी असलेल्या पायडलच्या बाजूच्या दात्यांची मोठी चक्री आणि मागचा चाकाला असलेली छोटी चक्री यांना जोडणारी दुवा ठरली. गलमेट आणि मेयर (१८६९), लॉसन (१८७९), मॅककॅमॉन (१८८४) आणि स्टर्ली (१८८४) ही चेनच्या साहाय्याने सुरुवातीच्या काळात तयार करण्यात आलेल्या सायकलींची काही उदाहरणं.
दोन चाकांना गती देण्याचं काम चेन करत असते. पायडलच्या बाजूला असलेली दात्यांची चक्री आणि मागच्या चाकाला असलेली दात्यांची चक्री चेनद्वारे जोडलेली असते. आणि आपण पायडिलग केल्यानंतर सायकलला पुढे नेण्याचं काम चेन करत असते. साधारणपणे सायकलच्या चेन या कार्बन किंवा मिश्रधातूपासून तयार केलेल्या असतात. तर काहींना गंज पकडू नये म्हणून निकेल या धातूंचा मुलामा चढवलेला असतो.
सायकल किती स्पीडची आहे म्हणजे त्याला किती गिअर्स आहेत यावरून चेनची लांबी ठरते. आधुनिक सायकलींमध्ये १२.७ एमएमच्या अमेरिकन नॅशनल स्टॅन्डर्ड इन्स्टिटय़ूट (एएनएसआय) प्रमाणित चेन असतात. साधारणपणे कुठलीच चेन तुटत नाही. पूर्ण चेन एकतर तोडावी लागते किंवा चेन टूलच्या साहाय्याने ती वेगळी करता येते. मास्टर लिंकद्वारे तुटलेली चेन जोडता येऊ शकते. संपूर्ण गोलाकार चेन वेगळी करण्यासाठी चेन टूलची गरज असते.

चेनची काळजी कशी घ्याल?
धूलीकण बसू नयेत आणि चेन सुरक्षित राहावी यासाठी पूर्वीच्या सायकलला चेनला आवरण असे. परंतु अलीकडे सायकलचं वजन कमी करण्यासाठी सहसा चेनवर आवरण दिसत नाही. तुम्ही चेन कशा प्रकारे स्वच्छ करता यावर चेनचं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे चेन नियमितपणे स्वच्छ करणं आवश्यक आहे. चेनमध्ये वंगण घालण्याआधी ती पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी. तुमच्याकडे डिझेल असल्यास काही काळ चेन त्यामध्ये भिजवून ठेवल्यास त्यावरील सर्व धूलीकण निघून जाण्यास मदत होते. अथवा बाजारात ‘डब्ल्यू डी ४०’ हा स्प्रे मिळतो त्यानेही चेनवरील घाण साफ करता येते. शक्यतो वाळूमध्ये आणि चिखलामध्ये सायकल चालवू नये.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com