03 March 2021

News Flash

दुचाकीवरून : सायकल घेताना..

नवीन वर्षांचा संकल्प करताना अनेकांनी सायकलिंगला अग्रक्रम दिला असेल.

सायकलिंगला नव्याने सुरुवात करणार असाल तर आधी साधी एका गिअरची आणि कमी किमतीची सायकल घ्या.

trek07पहिल्या लेखात आपण एकूणच ‘सायकल संस्कृती’वर नजर टाकली. आता त्यापुढे जाऊन ही ‘सायकल संस्कृती’ रुजवायची असेल तर आपण प्रत्येकाने सायकलिंग करणं आणि सायकलिंग करत नसलेल्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. नवीन वर्षांचा संकल्प करताना अनेकांनी सायकलिंगला अग्रक्रम दिला असेल. मात्र, नवीन सायकल घ्यायची म्हणजे ती कोणत्या कंपनीची घ्यायची, त्यावर किती पैसे खर्च करायचे, नक्की कोणत्या बाबी तपासायच्या असे मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. पण, या प्रश्नांच्या आधी एक साधा प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. तो म्हणजे, सायकलचा वापर नक्की कशासाठी करणार आहात? त्याचे एकदा उत्तर मिळाले की सायकल घेताना गरजेनुसार कोणत्या गोष्टी पडताळून पाहायच्या याचं उत्तर शोधणं सोप्प होईल.
पूर्वी सायकलची विभागणी चार गटांत केली जायची. पुरुष, महिला, लहान मुले आणि महागडय़ा सायकल. पण गेल्या पाच-सहा वर्षांत रोड, हायब्रीड, माऊंटन, टूरींगसाठीच्या सायकल अशी सर्वसाधारण विभागणी पाहायला मिळते. प्रत्येक प्रकारच्या सायकलचा वापर, वैशिष्टय़े, ब्रॅन्डनुसार बलस्थानं वेगवेगळी आहेत. एकाच लेखात या सर्व गोष्टी समजावून सांगता येणार नाहीत. मात्र काही मूलभूत गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
वापर, हौस आणि बजेट लक्षात घेऊनच सायकल विकत घ्या.
सायकलिंगला नव्याने सुरुवात करणार असाल तर आधी साधी एका गिअरची आणि कमी किमतीची सायकल घ्या.
नव्याने सुरुवात करणार असाल तर आधी सेकंडहॅन्ड घ्यायलादेखील हरकत नाही.
इंटरनेटवर सायकलींबाबत भरपूर माहिती उपलब्ध आहे ती जरूर वाचा.
खरेदीपूर्वी दुकानदारासोबत तुमची सायकलची गरज, त्याच्याकडील वेगवेगळे ब्रॅन्ड आणि किमतींबाबत चर्चा करा.
तुमची उंची आणि वजनाला अनुसरून सायकल निवडा.
तुम्हाला आवडलेल्या सायकली चालवून बघा.
गियर असणारी सायकल घेणार असाल तर तुमच्या वापरानुसार कोणत्या प्रकारची सायकल हवी आहे याचा निर्णय आधी घ्या.
आपण निवडलेल्या सायकलच्या प्रत्येक भागाची माहिती जाणून घ्या आणि हळूहळू दुरूस्तीचंही काम शिकून घ्या.
सायकलसोबत हेल्मेट जरूर विकत घ्या. चांगले हेल्मेट थोडे महाग असते, पण नियमित वापर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
रात्री सायकल चालवणार असाल तर रेफ्लेक्टर्स नक्की वापरा. हेडलाईट आणि टेललाईटपेक्षा ते स्वस्त असतात. बजेटनुसार यापैकी एखादी गोष्ट जरूर विकत घ्या.
परदेशी ब्रॅण्डच्या सायकल विकत घेताना अनेक अॅक्सेसरीज घेण्याचा मोह होतो. कारण बहुतांशी परदेशी बनावटीच्या सायकलींना साईड स्टॅड, घंटी, कॅरीयर आणि अगदी मडगार्ड पण नसते. तसेच हॅन्ड ग्लोव्ज, पॅडेड शॉर्टस, सनग्लासेस, पंप, लॉक अशी ही यादी वाढतच जाते. परंतु, तुमच्या गरजेनुसारच त्यांची खरेदी करा.

जायचं, पण कुठं?
पॅराग्लायडिंग
विमानाव्यतिरिक्त हवेत उडण्याचा हा सर्वात स्वस्त पर्याय. योग्य वारा असणारी डोंगररांग हा यासाठी महत्त्वाचा घटक. त्यामुळे काही मोजक्याच ठिकाणी याचा आनंद घेता येतो.
कुठं जायचं : कामशेत, सिक्कीम, कुलू-मनाली, सिमला. कामशेत वगळता इतर ठिकाणी वाऱ्याचा वेग आणि भौगोलिक मर्यादा बऱ्याच आहेत. कामशेत येथे प्रशिक्षित पॅराग्लायडरच्या सोबतीने नवख्या व्यक्तीस टॅन्डम पॅराग्लायडींगचा आनंद तर घेता येतोच, पण पॅराग्लायडिंगचे तीनचार दिवसांचे प्राथमिक शिक्षणाचे अभ्यासक्रमदेखील आहेत.
केव्हा जायचं : डिसेंबर ते मे.

स्कुबा डायव्हिंग
नितळ खोल पाणी आणि पाण्याखालची भौगोलिक रचना यामध्ये सर्वात महत्त्वाची असते.
कुठं जायचं : स्कुबा डायव्िंहगचा अगदी मनमुराद अनुभव घ्यायचा असेल तर अंदमान व लक्षद्वीपला पर्याय नाही.
महाराष्ट्रात मालवण येथे एमटीडीसीनेदेखील स्कुबा डायव्हिंगचे उपक्रम सुरु केले आहेत.
केव्हा जायचं : मालवणसाठी अनुकुल कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी.
अंदमान-लक्षद्वीपसाठी नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल.

माउंटन बायकिंग
थेट डोंगरातलं सायकलिंग हा अजून तरी साहसी क्रीडा याच प्रकारात मोडणारा प्रकार आहे. पण डोंगरातील वाहतुकीच्या कच्च्या पक्क्य़ा रस्त्यांवरुन, अवघड घाटमार्गावर सायकलिंगचा अनुभव साहसी पर्यटकांना घेता येतो. मनाली
आणि परिसरात युथ होस्टेलचे अनेक उपक्रम सुरु असतात. कुलू ते सिमला हा मार्ग सध्या सायकलिंगसाठी लोकप्रिय आहे. तर मनाली ते खारदुंगला हा काहीसा अवघड सदरात मोडणारा मार्गदेखील हल्ली लोकप्रिय होत आहे.
केव्हा जायचं : एप्रिल-मे

प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 6:31 am

Web Title: tips for buying the right bicycle
Next Stories
1 ग्रामीण पर्यटनाचा सिक्कीमानुभव
2 दुचाकीवरून : एक पॅडल मारून तर पाहा..
3 विष्णूच्या शक्तींचे मंदिर : अन्वा
Just Now!
X