News Flash

उन्हाळी भटकंती

भटकंती करताना काही खबरदारी घेणं गरजेचं असतं, नेमकं त्याबाबतच आपल्याकडे बरीच अनभिज्ञता दिसून येते.

उन्हाळ्यात पर्यटकांची पावले आपोआपच उत्तरेकडील राज्यांकडे वळू लागतात

वैशाख वणव्यापासून दूर जात चार घटका बर्फाच्छादित डोंगरांच्या परिसरात घालवण्याचा, अतिउंचावरील निसर्गसंपन्न परिसरात भटकण्याचा ट्रेण्ड हल्ली चांगलाच रुळला आहे. पण ही भटकंती करताना काही खबरदारी घेणं गरजेचं असतं, नेमकं त्याबाबतच आपल्याकडे बरीच अनभिज्ञता दिसून येते.

मध्य भारतातले वाढते तापमान, राजस्थानातील कडक उन्हाळा, सह्य़ाद्रीतील पाण्याची कमतरता यामुळे चढत्या उन्हाळ्यात पर्यटकांची पावले आपोआपच उत्तरेकडील राज्यांकडे वळू लागतात. हिमालयातील पदभ्रमण तर आता चांगलेच रुजले आहे. पण त्याचबरोबर अनेक नवनवीन पर्यटनस्थळांवरही सर्वसामान्य पर्यटकांची वाढती गर्दी दिसून येत असते. श्रीनगर, डलहौसी, धरमशाला, कुलू मनाली, सिमला, उत्तरांचलमधील चारधाम यात्रा आणि अरुणाचल, मेघालय, सिक्कीम ही ईशान्येकडील राज्ये, नेपाळ आणि भूतान हे पर्यटकांचे आणि डोंगरभटक्यांचेदेखील हॉटस्पॉट झाले आहेत. कधी ही भटकंती लोकवस्तीला धरून असते तर कधी दुर्गम भागात. त्यासाठीचा कालावधीदेखील मोठा असतो. पण तयारी करताना आजदेखील काही चुका हमखास होताना दिसतात.
हिमालयातील ट्रेकला जाताना बूट कुठले घ्यावेत, गरम कपडे किती घ्यावेत, छत्री घ्यावी की रेनकोट घ्यावा याबाबत योग्य निर्णय घेता येत नाही. तसेच उपयोगी व पुरेशा वस्तू कोणत्या व किती असाव्यात याबाबतही योग्य निर्णय घेता येत नाही. पर्यायाने भरपूर अनावश्यक सामान घेतले जाते. अशा अनावश्यक सामानाचा आपल्या पाठीवरून ट्रेक होत असतो, जो आपणास दमवणारा असतो. इतर पर्यटनासाठी जाणारे बहुतांश पर्यटकही आवश्यकतेपेक्षा जास्त सामान घेऊन जातात याचा अनुभव नेहमीच येतो. साधारणपणे पाच-सहा दिवसांच्या सहलीसाठीही पर्यटक १५-२० किलोचे सामान दोन-तीन बॅगांमधून भरतात. अशा या वजनी बॅगा अनेकांना उचलताही येत नाहीत आणि त्यांच्या पर्यटनाची मजा किरकिरी होऊन जाते. याच लोकभ्रमंती सदरातून सिक्कीम ग्राम निवास उपक्रमात सहभागी झालेल्या पर्यटकांची नुकतीच एक बैठक झाली. त्यात अनेकांनी सामान उचलण्याची सोय होईल का? असा प्रश्न विचारला. यावरून या समस्येची तीव्रता दिसून येते.
अनावश्यक सामान घेण्याची समस्या ही मानसिकतेशी संबधित आहे. रोज बदलण्यासाठी नवीन कपडय़ाचा जोड, जास्तीच्या चादरी किंवा शाली, जादा टॉवेल, फॅशनेबल जॅकेट, हवेची उशी, पुस्तके, जास्तीचा खाऊ, हेयर ड्रायर, चपलांचे जादा जोड, रिकाम्या पिशव्या, मेकअपचे सामान अशा अनेक वस्तूंनी सामानाची बॅग भरलेली असते. कोणतीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. परंतु अशा पर्यटनादरम्यानचा मुक्काम हा लोकवस्तीच्या ठिकाणीच होत असल्याने गरज लागेल त्या वस्तू त्या ठिकाणी मिळू शकतात ही मानसिकता ठेवली तर बरंचसं सामान कमी होऊ शकतं.
अशा अनावश्यक सामानापेक्षा अतिउंचावरील (आठ हजार फुटांपेक्षा अधिक) ठिकाणी जाताना काही सामाईक आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. अन्यथा अशा भटकंतीच्या आनंदावर विरजण पडलेच म्हणून समजावं.
हिमालयन ट्रेकची तयारी
हिमालयात प्रथमच ट्रेकला जात असाल तर त्यापूर्वी सह्य़ाद्रीतील एखाद्या किल्लय़ाचा सराव ट्रेक हिमालयात जाण्यापूर्वी करावा.
प्रवासाचा मार्ग, ट्रेकचा मार्ग, परिसरातील गावे, प्राणी-पक्षी जंगल, हवामान, लोकजीवन, वैशिष्टय़पूर्ण ठिकाणे इत्यादीची माहिती ट्रेकला निघण्यापूर्वी घ्यावी.
सोबत आवश्यक तेवढेच सामान न्यावे.
हिमालय परिसरात पाऊस केव्हाही पडतो. त्यामुळे सर्व सामान सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करावा.
पावसापासून बचावासाठी सॅकच्या वरून घेता येईल असा प्लास्टिकचा रेनकोट किंवा पोंचो घ्यावा. छत्री उपयोगी नसते.
हिमालयातील ट्रेक मार्ग निसरडा, दगडांचा, ओढे-नाले ओलांडणारा, बर्फातून जाणारा, पावसात भिजणारा, उन्हात तापणारा, थंडीने गारठणारा असा वैविध्याचा असू शकतो. अशा या विविधढंगी ट्रेक मार्गावरून आत्मविश्वासाने मार्गक्रमणा करण्यासाठी पायात रबर सोल असलेले बूट वापरावेत. प्लास्टिक सोल असलेले बूट जास्त घसरतात.
कपडे आवश्यक तेवढेच न्यावेत. साधारणपणे प्रवासाचे दोन जोड व ट्रेकचे दोन जोड कपडे पुरेसे होतात.
ट्रेकचे कपडे हे शक्यतो कॉटनचे असावेत. कारण ते उब धरून ठेवतात. ट्रेककरिता फूल पॅन्ट-शर्टच वापरावेत. उन्हाची टोपीही आवश्यक असते.
एक फूल स्वेटर, एक हाफ स्वेटर, मंकी/उलन कॅप, दोन जोड उलन हात मोजे, दोन जोड उलन पायमोजे (कॅम्पवर पोहोचल्यावर घालण्यासाठी), वजनाने हलकी शाल, विंडचीटर इत्यादी गरम कपडे साधारणपणे पुरेसे असतात.
बर्फाळ भागातून चालताना घालण्यासाठी गॉगल (निळ्या काचांचा नसावा.)
किमान दोन सेलचा टॉर्च व पुरेसे सेल घ्यावेत.
मोबाइल चार्जिंगसाठी योग्य ती तजवीज करावी. त्यासाठी छोटे सोलार चाìजग युनिट मिळते. त्याचा वापर करता येईल.
किमान एक लिटर क्षमतेची पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, ताट, वाटी, मग, चमचा, छोटी सुरी, साबण, पेस्ट, ब्रश, सुई दोरा, टिश्यू पेपर, कोल्ड क्रीम, व्हॅसलीन, नेहमीची औषधे इत्यादी सोबत घ्यावे.

हे लक्षात ठेवा

हाय अल्टीटय़ूड सिकनेसचा त्रास होऊ नये म्हणून काही ट्रेकर्स घरातून निघाल्यापासून प्रतिबंधक गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. तसे करणे चुकीचे आहे. अतिउंचावर टप्प्या टप्प्याने योग्य प्रकारे वातावरणाशी जुळवून घेतल्यावर वरच्या उंचीवर जाणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे.
प्रवासात वापरलेले कपडे बेस कॅम्पला गेल्यावर धुऊन घ्यावेत म्हणजे ते पुन्हा वापरता येतात.
रात्री झोपताना वापरण्यासाठी हवेच्या पिशवीऐवजी बॅगेतील कपडे उशी म्हणून वापरावेत. म्हणजे हवेच्या पिशवीचे वजन
कमी होईल.
बर्फावरून स्लाइड करताना प्लास्टिकच्या पिशवीवर बसून स्लाइड करू नये. त्यामुळे स्वत:चा वेग नियंत्रित ठेवणे कठीण जाते.
अतिथंड हवामानात ओले कपडे अंगावर असले तर हायपोथर्मिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिथंड हवामानात ओले कपडे लवकरात लवकर बदलावेत.
हाय अल्टीटय़ुड सिकनेसची चिन्हे दिसत असतील तर सदर बाब इतरांच्या लक्षात आणून द्यावी व त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. हाय अल्टीटय़ुड सिकनेस कमी
होत नसेल तर लवकरात लवकर खालच्या उंचीवर जावे.
हृदयरोग, उच्च रक्तदाब, दमा, मधुमेह किंवा इतर काही आजार असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच अतिउंचीवरील हिमालयातील ट्रेकला जावे.
काही ट्रेकर्स जेवताना प्लेटवर अल्युमिनियम फॉईल घेतात किंवा लॅमिनेटेड पेपर प्लेट वापरतात व वापरून झाल्यावर तेथेच फेकून देतात. हा कचरा परिसरात पसरून पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे जेवणासाठी धातूच्या किंवा प्लास्टिकच्या प्लेट वापराव्यात व वापरानंतर पाण्याने धुवाव्यात.

हृषीकेश यादव – rishikeshyadav@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 1:40 am

Web Title: tips for summer traveling
Next Stories
1 ट्रेकिंग गिअर्स : ठोका तंबू!
2 दुचाकीवरून : सायकलचे ब्रेक्स
3 आडवाटेवरची वारसास्थळे : लोनाडची खांडेश्वरी लेणी
Just Now!
X