News Flash

सांतिआगो द कॉम्पोस्टेलाची वारी

येशू  ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.

येशू  ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.

सांतिआगो द कॉम्पोस्टेला हे ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान.  सांतिआगोमध्ये कॅथेड्रल हा मुख्य आकर्षणबिंदू असला तरी शहरात इतर अनेक उद्याने, चर्च, विद्यापीठ, टाऊन हॉलसारखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. समुद्री जेवणाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच.

सांतिआगो द कॉम्पोस्टेला – येशू  ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. विशेषत: कॅथलिक पंथाच्या धार्मिकांसाठी हे तीर्थयात्रेचे ठिकाण. स्पेनच्या गॅलिशिया प्रांताच्या राजधानीचे हे शहर स्पेनच्या वायव्य भागात वसले आहे. १९८५ पासून युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा मानही या शहराला मिळाला आहे.

संत जेम्स ख्रिस्ताच्या १२ प्रेषितांपैकी एक. जेम्स द ग्रेट या नावानेही हे संत ओळखले जातात. ऐबेरियन द्वीपकल्पात (हा युरोपचा नऋत्य भाग – ज्यात पोर्तुगाल आणि स्पेन देशांचा बराचसा भाग येतो) ख्रिस्ती धर्माचा प्रचार संत जेम्सने केला असे मानले जाते. इसवी सन ४४ मध्ये संत जेम्सचा शिरच्छेद झाल्यावर त्यांचे शरीर गॅलिशियामध्ये आणण्यात आले. त्यांची समाधी कालांतराने विस्मरणात गेली. नवव्या शतकात या समाधीचा परत एकदा शोध लागला. यावेळी राजाश्रय मिळाल्याने तिथे एक छोटे चॅपलही बांधण्यात आले. हळूहळू या स्थानाचा विस्तार होऊन ख्रिस्ती धर्मासाठी हे एक प्रमुख तीर्थस्थान झाले. १०व्या शतकात इथले चर्च अल-मन्सूर इब्न अबी आमिरच्या हल्ल्यात नष्ट झाल्यावर परत एकदा चर्च उभारणीचे काम सुरु झाले. १३ व्या शतकाच्या पूर्वार्धात हे चर्च पूर्ण झाले. रोमनेस्क शैलीच्या या चर्चचे वैशिष्टय़ म्हणजे मातेओ या स्थापत्यकाराने घडवलेला पोर्टिको ऑफ ग्लोरी . या द्वारमंडपात तीन कमानी आहेत आणि यांत ख्रिस्त आणि इतर प्रेषितांच्या प्रतिमा तसेच त्यांच्याशी संबंधित कथा असलेली शिल्पं पाहायला मिळतात.

कालानुरूप या चर्चचा विस्तार होत गेला. विशेषत: १६ व्या ते  १८ व्या शतकातील बरोक शैलीतील बांधणीने सांतिआगोच्या कॅथ्रेडलला भव्य रूप प्राप्त झाले. ओब्राडॉयरो या नावाने हे पश्चिम द्वार प्रसिद्ध आहे. या द्वारासमोरील भव्य प्रांगणात उभे राहून कॅथ्रेडलकडे पाहिल्यावर त्याची भव्यता लक्षात येते. या कॅथ्रेडलचा अंतर्भागही भव्य आहे. आत मध्यभागी संत जेम्सची मूर्ती आहे. या मूर्तीपर्यंत जाऊन हात लावून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. या कॅथ्रेडलच्या मध्यभागी एक धूप जाळण्यासाठीचे पात्र पुलीच्या मदतीने छताला टांगले आहे. कॅथ्रेडलमधील पूजांमध्ये या पात्राचा वापर होतो. १७० पाऊंड वजनाचं हे पात्र पेन्डूलमसारखे झोके खाताना पाहणे हा एक सोहळा असतो आणि अनेक लोक हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. या कॅथ्रेडलमध्ये एक संग्रहालय देखील आहे. त्याचबरोबर ज्यांना कॅथ्रेडलमध्ये वपर्यंत जाऊन शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची इच्छा आहे, त्यांना कॅथ्रेडलच्या छतावर जाऊन हा आनंद घेता येतो.

सांतिआगोला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. विशेषत: ठराविक तीर्थयात्रेच्या मार्गानी चालत सांतिआगोपर्यंत येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. कॅमिनो डी सांतिआगो अथवा द वे ऑफ सेंट जेम्स   या नावाने हे मार्ग ओळखले जातात. मध्ययुगीन काळापासून रोम आणि जेरुसलेम बरोबरच सांतिआगोची तीर्थयात्रासुद्धा प्रसिद्ध आहे. या तीर्थयात्रेची सुरुवात युरोपात अनेक ठिकाणांहून होते. बरेचसे लोक चालत प्रवास करतात, काही सायकलने तर काही अगदी घोडा किंवा खेचराचा वापरही करतात. अर्थात भाविकांबरोबरच पर्यटक,विशेषत: हायकर्स आणि सायकलिस्टनाही हा प्रवास अनुभवायला आवडतो.

या प्रवासात वाटेत अनेक दिशादर्शक पाटय़ा भाविकांना सांतिआगोचा मार्ग दाखवत असतात. या पाटय़ांवर एक शिंपल्याचे चिन्ह पाहायला मिळते. गॅलिशिया भागात मिळणारा हा scallop शिंपला सांतिआगोच्या तीर्थयात्रा मार्गाचे प्रतीक बनला आहे. सांतिआगो शहरामध्येही जागोजागी हे चिन्ह पाहायला मिळते.

सांतिआगोपर्यंत तीर्थयात्रेचे अनेक मार्ग असले तरी त्यात फ्रेंच वे  सगळ्यात लोकप्रिय आहे. सेन्ट जीन पाइड डी पोर्ट इथून सामान्यत: लोक प्रवास सुरु करतात. हा प्रवासाचा टप्पा बराच मोठा असला तरी वाटेत भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय स्वस्त दारात करणारी होस्टेल्स जागोजागी आढळतात. बरेच भाविक एक अधिकृत कागदपत्र घेऊन येतात, जेणेकरून त्यांना जागोजागी सवलती तर मिळतातच, पण त्याचबरोबर त्यांनी हा प्रवास पूर्ण केला त्याचा पुरावा म्हणून पण या कागदपत्रांचा उपयोग होतो. बऱ्याच होस्टेल्स आणि वाटेतील चर्चमध्ये त्यांना त्यांच्या या क्रेडीन्शिअलवर स्टॅम्प मिळतो. ज्यांना ही तीर्थयात्रा पूर्ण केल्याचे सर्टिफकेट (कॉम्पोस्टेला)  हवे असते, त्यांना हे स्टॅम्प्स दाखवल्यावर मगच सर्टििफकेट मिळते. हे कॉम्पोस्टेला मिळवण्यासाठी भाविकाला किमान १०० किलोमीटर चालावे लागते. रं११्रं हे त्यासाठी सर्वात सोयीस्कर ठिकाण असल्याने बरेच भाविक तिथूनच तीर्थयात्रेला सुरुवात करतात.

सांतिआगोला सततच भाविकांची गर्दी असते. पण होली कॉम्पोस्टेलन इयर्स ही सांतिआगोला जाण्यासाठी विशेष महत्वाची मानली जातात. ज्यावर्षी २५ जुलैला रविवार असतो ते वर्ष पवित्र मानले जाते. २०१० नंतर आता परत २०२१  मध्ये हे पवित्र वर्ष मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यात येईल.

सांतिआगोमध्ये कॅथ्रेडल हा मुख्य आकर्षणबिंदू असला तरी शहरात इतर अनेक उद्याने, चर्च, युनिव्हर्सिटी, टाउन हॉलसारखी ठिकाणे बघण्यासारखी आहेत. ज्यांना समुद्री जेवणाची आवड असेल त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणी आहे. विविध मासे, ऑक्टोपस ही इथली खासियत.

सांतिआगोला विमानतळ असल्याने बार्सलिोना किंवा माद्रिदहून दोन तासाच्या आतच सांतिआगोला पोहोचता येते. सांतिआगो हाय स्पीड नेटवर्कमध्ये असल्याने तिथपर्यंत रेल्वेप्रवास पण शक्य आहे. स्पेनच्या भेटीत सांतिआगो द कॉम्पोस्टेलाचा समावेश करून तीर्थयात्रेचे थोडे पुण्य कमवायला काय हरकत आहे!

श्रद्धा भाटवडेकर shraddha.6886@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:40 am

Web Title: tourism in santiago de compostela in galicia
Next Stories
1 लोक पर्यटन : येलघोल लेणी
2 वन पर्यटन : हातगड
3 पेंग्विन परेड
Just Now!
X