कंबोडिया हा देश आंग्कोरवॉट, आंग्कोरथॉम आणि ता-प्रॉहम् मंदिरांबरोबरच तरंगणाऱ्या खेडय़ांसाठीही प्रसिद्ध आहे. या खेडय़ांची जन्मकथा निर्वासितांचा प्रश्न अधोरेखित करणारी आहे. त्यांचे तरंगते जग पाहणे हा वेगळा अनुभव रतो.

कंबोडिया हा दक्षिण-पूर्व आशियात व्हिएतनामच्या शेजारी असणारा एक मोठा देश आहे. नकाशात पाहिले तर असे दिसते की हा देश ईशान्य भारताशी अखंड भूभागाने जोडलेला आहे. अलीकडच्या काळात भारत, म्यानमार (ब्रह्मदेश )आणि थायलंड यांच्या त्रिपक्षीय करारातून तिकडे जाणारा एक महामार्ग तयार केला गेला आहे. भारताच्या मणिपूर राज्यातील मोरेह या शहरापासून थायलंडमधील माईसोटपर्यंत हा महामार्ग जातो. त्यामुळे आता भारतातून म्यानमार आणि थायलंडमाग्रे खुश्कीच्या मार्गाने कंबोडियात जाता येते. पण या प्रवासात अनेक निम्न-हिमालयीन पर्वतराशी पार कराव्या लागतात. त्यामुळे हे मार्गक्रमण थोडे खडतर आहे, आणि या  प्रवासास वेळही जास्त लागतो. त्याऐवजी विमानाने सिंगापूरमाग्रे सरळ कंबोडियात दाखल व्हावे. कंबोडियाच्या सिएमरीप शहराच्या विमानतळाची इमारत अतिशय सुंदर आहे. तिकडच्या ‘ख्मेर’ संस्कृतीतील वास्तुकलेचा तो एक अप्रतिम  नमुना होय. ख्मेर लोक हे मूळचे पूर्व आशियायी काम्पुचियन वंशाचे लोक होत. त्यांची संख्या कंबोडियात सुमारे ९५ टक्के इतकी आहे. उर्वरित ५ टक्क्यांमध्ये चिनी, मुसलमान (चाम) आणि व्हिएतनामी निर्वासित लोकांचा समावेश होतो. हा देश आंग्कोरवॉट, आंग्कोरथॉम आणि ता-प्रॉहम् मंदिरांसाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच तो तिथल्या ‘तरंगणाऱ्या’ खेडय़ांसाठीही प्रसिद्ध आहे.

दक्षिण-पूर्व आशियाचा इतिहास असे सांगतो की १९५५ सालापासून व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये वंशवाद, प्रादेशिक सीमावाद आणि साम्यवादी प्रभुत्व यांवरून चकमकी घडत आलेल्या होत्या. उत्तर व्हिएतनाममध्ये साम्यवादी राजवट होती. दक्षिण व्हिएतनाम हे लोकशाहीवादी होते. पुढे या दोन देशांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. त्या युद्धात रशियाने उत्तर व्हिएतनामची बाजू घेतली, आणि अमेरिकेने दक्षिण व्हिएतनामची. त्यामुळे हे महाभयंकर युद्ध तब्बल वीस वर्षे चालले. फार मोठा मानवसंहार झाला. कालांतराने अमेरिकेने या युद्धातून माघार घेतली. १९७५ साली उत्तर व्हिएतनामने द. व्हिएतनामची राजधानी सायगाव ताब्यात घेतली, तेव्हा हे युद्ध थांबले. उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम यांचे विलीनीकरण झाले. परंतु अनेक वर्षे चाललेल्या त्या युद्धात सुमारे ३० लाख व्हिएतनामी लोक, ३ लाख कंबोडियन लोक, ६२ हजार लाओसी नागरिक, आणि सुमारे ५८ हजार अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडले. त्या काळात युद्धामुळे जर्जर झालेल्या व्हिएतनाममधून हजारो व्हिएतनामी निर्वासित जिवाच्या भीतीने पळून जाऊन कंबोडियात दाखल झाले. त्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नव्हते, किंवा नागरिकत्वाचा दाखलाही नव्हता. कंबोडिया आणि व्हिएतनाम या दोन देशांचे संबंध  मुळातच फारसे चांगले नव्हते. आणि निर्वासित म्हणून आलेल्या व्हिएतनामी लोकांना कंबोडियात नागरिकत्वाचे आणि जमीन विकत घेण्याचे हक्क नव्हते. त्यामुळे त्यांना कंबोडियन भूमीवर स्थायिक होणे अशक्य नव्हते. मग या निर्वासितांनी कंबोडियातील तत्कालीन कायद्यानुसार कंबोडियन भूमीऐवजी ‘टोन्लेसॅप’ नदीच्या पाण्यावर आसरा घेतला.

ही नदी टोन्लेसॅप नावाच्याच एका भल्या मोठय़ा तलावापासून उगम पावते, आणि पुढे ती मेकाँग या मोठय़ा नदीला जाऊन मिळते. टोन्लेसॅप नदी आणि तलाव या दोहोंच्या आसपास सखल असा दलदलीचा प्रदेश आहे. हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रदेशास ‘जैवविविधतेचा हॉटस्पॉट’ म्हणून मान्यताही दिलेली आहे. टोन्लेसॅप तलाव हा दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा तलाव आहे, आणि तो कंबोडियाचा आर्थिक आधारही आहे. आश्चर्य असे की या तलावातून उगम पावणारी टोन्लेसॅप नदी ही ऋतुमानानुसार दोन्ही दिशांनी वाहते. पावसाळ्यात जेंव्हा मेकाँग नदीस पूर येतो, तेव्हा ते पुराचे पाणी टोन्लेसॅप नदीतून वाहत टोन्लेसॅप तलावात येऊन पडते. आणि उन्हाळ्यात टोन्लेसॅप तलावातील पाणी या नदीतून विरुद्ध दिशेने वाहत जाऊन मेकाँग नदीत पडते! ज्या काळात टोन्लेसॅप तलाव भरलेला असतो त्या काळात तिथे मासेमारीला बंदी असते. कारण तो मासळीच्या प्रजननाचा काळ असतो. त्या वेळी हे व्हिएतनामी निर्वासित नदीच्या काठांवर थोडीबहुत शेती करतात. पण जेव्हा तलावाचे आणि टोन्लेसॅप नदीचे पाणी ओसरू लागते तेव्हा तलावात मासेमारी सुरू केली जाते. नदीचे पाणी ओसरू लागताच हे लोक तिथे एक उत्सव साजरा करतात. व्हिएतनामी भाषेत ‘सात डोक्यांच्या सर्पाचा उत्सव’ असे त्याचे नाव आहे. आणि त्या उत्सवानंतर नदीवरच्या तरंगत्या घरांमध्ये राहून ते मासेमारी सुरू करतात.

१९७९ सालच्या युद्धानंतर इथे आलेल्या हजारो व्हिएतनामी निर्वासितांनी या टोन्लेसॅप नदीच्या पाण्यात लाकडी घरे उभी करून त्यांत राहण्यास सुरुवात केली. ही घरे एकतर नदीपात्रात खोलवर रोवलेल्या लाकडी खांबांवर उभारलेली असतात, नाहीतर ती पाण्यात तरंगणाऱ्या मोठय़ा बोटींवर शाकारलेली असतात. कालांतराने कंबोडियात अशा तरंगत्या घरांची संख्या वाढत गेली, आणि टोन्लेसॅप नदीच्या पात्रात अशा शेकडो लाकडी घरांची अनेक तरंगती खेडी निर्माण झाली. या तरंगत्या खेडय़ांतील रहिवासी इकडूनैतिकडे जाण्यासाठी होडय़ांचा किंवा छोटय़ा मोटरबोटींचा वापर करतात. या नदीच्या पाण्यात निरनिराळ्या प्रकारचे मासे, खेकडे, िझगे, मगरी, सुसरी, पाणकुत्री, पाणसर्प आदी जीव आढळतात. त्यांच्या व्यापारावरच या लोकांना गुजराण करावी लागते. अनेक संकटांचा सामना करीत या तरंगत्या खेडय़ाचे रहिवासी आपला जीवनक्रम पार पाडत असतात. त्यांचं खाणंपिणं, राहणं-झोपणं, शाळा, आणि दिवसभराचे सारे व्यवहार त्या तरंगत्या घरांतूनच चालतात. आम्ही कंबोडियाच्या सिएमरीप शहरातून टोन्लेसॅप नदीवर गेलो, आणि एका मोटरबोटीतून वेगवेगळ्या तरंगत्या खेडय़ांना भेटी देत दिवसभर नदीतून फिरलो. नदीच्या पाण्यावर वेगवेगळ्या आकारांच्या लाकडी बोटी उभ्या होत्या. काही खूप मोठय़ा, तर काही लहान. त्या बोटींवर छोटी-मोठी घरे शाकारलेली होती. काहींची छपरे लाकडी, तर काहींची पत्र्यांची होती. त्या घरांतून अनेक कुटुंबे राहत होती. पाण्यावरच्या त्या घरांच्या दर्शनी ओसऱ्यांवर विश्रांती घेत असलेले म्हातारे स्त्री-पुरुष दिसत होते. तसेच मासेमारीची जाळी वाळवणारे मच्छीमार होते. काही ठिकाणी धान्य निवडणाऱ्या किंवा घरकामांत ग्रस्त असणाऱ्या स्त्रिया होत्या. एकमेकांकडे जाण्यासाठी, किंवा किनाऱ्यावरच्या शेतांत जाण्यासाठी छोटय़ा छोटय़ा होडय़ा वापरल्या जात होत्या. अगदी लहान मुले-मुलीसुद्धा सराईतपणे होडय़ा वल्हवत होती. काही रुंद बोटी भल्या मोठय़ा दुकानांनी व्यापलेल्या होत्या. दररोजच्या घरगुती वापरासाठी लागणारा किराणा-भुसार माल, खाद्यपेये, धान्ये, वह्य़ा-पुस्तके, बादल्या, डबे अशा विक्रीच्या वस्तूंनी ती तरंगती दुकाने खचाखच भरलेली होती. काही होडय़ांवर नदीतून पकडून आणलेल्या डझनभर जिवंत सुसरी ठेवलेल्या होत्या. हे लोक खाण्यासाठी आणि विकण्यासाठी सुसरी पकडतात असे त्यांनी आम्हाला सांगितले. तिथे काही िपजाऱ्यांच्या बोटीही होत्या. त्या बोटींवर झोपण्यासाठीच्या गाद्यांमधील कापूस बाहेर काढून तो िपजण्याचे काम सुरू होते. काही बोटींवर विक्रीसाठी आणलेले नवे कपडे टांगून ठेवले होते. एका मोठय़ा बोटीवर ‘येथे गरीब लोकांना मोफत तांदूळ मिळेल’ अशा अर्थाचा मजकूर लिहिला होता. दुसऱ्या एका बोटीवर कॅथोलिक चर्च अशी पाटी होती. एका तरंगत्या घराच्या समोरच्या भागात दोन खांबांना बांधलेल्या हॅमॉकवर एक छोटी मुलगी उत्सुक नजरेने आमच्याकडे पाहत बसली होती.

ऋतुनिहाय कधी भरणाऱ्या आणि कधी रिकामा होणाऱ्या या टोन्लेसॅप तलावाने तिथे एका संपन्न नैसर्गिक परिसंस्थेला जन्म दिलेला आहे. त्या परिसंस्थेत निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती, वृक्षप्रजाती, गवते, गिब्बन माकडे, वाघ, अस्वले, काळे बिबटे हे सस्तन प्राणी, मगरी, सुसरी, अजगर यांसारखे सरिसृप, आणि आयबिस, करकोचे, पेलिकन्स, गरुड यांसारखे पक्षी आश्रयास येतात. टोन्लेसॅप नदी आणि तलाव यांत तरंगणारी ही निर्वासितांची खेडी अत्यंत स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर अशी आहेत. त्या जलमय जगात गरजेनुसार लागणाऱ्या शाळा, दवाखाने, दुकाने, प्रार्थनागृहे अशा सगळ्या सोयी त्यांनी निर्माण केल्या आहेत. जगातील सर्व राजकीय सत्तेच्या सीमेबाहेर राहून, तिथे स्वत:चे असे एक तरंगते, पण कार्यक्षम जग त्यांनी निर्माण केलेले आहे. हजारो तरुण स्त्री-पुरुष, वृद्ध माणसे, मुलेबाळे तिथल्या तरंगणाऱ्या लाकडी घरांत राहतात. त्या प्रतिकूल परिस्थितीत, आणि दारिद्रय़ातही तिथे त्यांचे संसार फुलतात, स्त्रिया बाळंत होतात, मुलेबाळे मोठी होतात, आजारांवर औषधपाणी होते, आणि कधी मृत्यूही होतात. अनेक वर्षांच्या राजकीय अस्थिरतेच्या आणि मानवसंहाराच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत, तिथेच त्यांची मुले शाळांमध्ये जातात, इथल्याच प्रार्थनागृहांत आराधना करतात, नदीच्या पाण्यात किंवा किनाऱ्यावरच्या दलदलीत खेळ खेळले जातात. सगळ्या अडचणींना तोंड देत या तरंगत्या खेडय़ांतील निर्वासित लोक आजही तिथे प्रयत्नपूर्वक जगत आहेत.

विजय दिवाण vijdiw@gmail.com